typha eradiction work in progress
typha eradiction work in progress esakal
नाशिक

नांदूरमधमेश्‍वर'मधील Typha निर्मूलनाचे काम पक्ष्यांच्या विणीच्या हंगामात!

आनंद बोरा

नाशिक : नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यातील टायफा पानवनस्पती पक्ष्यांच्या विणीच्या काळात म्हणजे पाऊस सुरू असताना काढण्याचे काम केल्याने अनेक पक्ष्यांच्या घरटी, अंडी, पिल्लांचा प्रश्‍न तयार झाला आहे.

त्याचवेळी पक्ष्यांचा स्थलांतरकडे कल वाढला आहे. यासंबंधाने संपर्क साधल्यावर ‘मला माहिती नाही, पक्षी अभयारण्यात चाललेल्या कामाची माहिती घेतो आणि मग सांगतो’, असे वन्यजीवचे वनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी सांगितले. (Typha eradication work in Nandur Madhmeshwar during breeding season of birds Nashik Latest Marathi News)

खानगाव थडी येथे गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर १९११ च्या सुमारास दगडी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे निर्माण झालेल्या जलाशयाच्या परिसरास १९८६ मध्ये अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. १००.१२ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या अभयारण्यास पक्ष्यांच्या अधिवासामुळे आणि दुर्मिळ पक्ष्यांच्या अस्तित्वामुळे हे क्षेत्र महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.

बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, जागतिक वन्यजीव निधी आणि महाराष्ट्राचा वन विभाग यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने निर्माण झालेले नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी एक उत्कृष्ट असे स्थान आहे.

अभयारण्याला ‘रामसर’ दर्जा मिळाला आहे. अभयारण्यात चारशेहून अधिक विविध प्रकारच्या वनस्पती, २६० हून अधिक जातीचे पक्षी, जलाशयात ३० हून अधिक प्रकारचे मासे, बिबट्या, उदमांजर, कोल्हा, मुंगूस, रानडुक्कर, रानससे, विविध प्रजातींचे साप, कासव आढळतात.

अभयारण्यात तीन वर्षांपासून पानवनस्पती टायफा आणि पानवेली वाढल्याने पक्ष्यांना बसण्यास जागा नव्हती. अनेकदा मागणी करूनही ती काढली जात नव्हती. ही वनस्पती उन्हाळ्यात काढणे आवश्यक असताना वन विभागातर्फे पक्ष्यांचा अभ्यास केला आहे काय? पक्ष्यांच्या विणीच्या काळात पोकलँडद्वारे पक्ष्यांची अंडी असणाऱ्या परिसरात कामास का सुरवात केली?

टायफा काढताना अनेक वृक्षांचा विचार झाला काय? बाभळीवरील सुगरणीच्या घरट्यांकडे डोळेझाक झाली काय? असे विविध प्रश्‍न पक्षीमित्र उपस्थित करत आहेत. त्याचवेळी पाऊस सुरू असताना या कामाची गरज होती का? याही प्रश्‍नाने पक्षीमित्रांमध्ये रुंजन घातले आहे. त्याचवेळी मनोरे आणि इतर सुविधांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

पावसाळ्यात वीण करणारे पक्षी

- वारकरी

- हळदी-कुंकू

- कमळ पक्षी

- तापसच्या तीन प्रजाती

- जांभळा करकोचा

- मुनिया

- वटवट्या

- जांभळी पाणकोंबडी

- ग्रे हेरॉन

- वंचक

- प्रीनिया

- शिंपी

- पाईड मैना

- हळद्या

- सुगरण

"विणीच्या काळात पक्षी अभयारण्यातील टायफा वनस्पती काढण्याचा निर्णय चुकीचा आहे. ही वनस्पती उन्हाळ्यात काढायला हवी होती. वनाधिकारी असे निर्णय घेतात, याचे मला आश्चर्य वाटले. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी निर्माण झालेल्या अभयारण्यात अशी घटना घडली, याचे मला दुःख आहे." -दिगंबर गाडगीळ (ज्येष्ठ पक्षीमित्र)

"अभयारण्यातील बेशरमी काढणे आवश्यक होते. टायफा वनस्पती पूर्ण काढणे चुकीचे असून, त्यामध्ये अनेक पक्षी वीण करत असतात. अधिकारी ऐकत नसल्याने मी सहा महिन्यांपासून अभयारण्यात गेलो नाही." - दत्ताकाका उगावकर (ज्येष्ठ पक्षीमित्र)

"कोणताही अभ्यास न करता अभयारण्यातील विकासकामे होत आहे. आता अनेक पक्ष्यांची वीण गेल्याने त्याची जबाबदारी वनाधिकाऱ्यांनी घ्यायला हवी. त्यामुळे संबंधितांविरुद्ध काय कारवाई होणार, हा खरा प्रश्‍न आहे." - उमेशकुमार नागरे (पक्षीमित्र)

"पक्षी अभयारण्यातील विकासकामे घाईगर्दी न करता अभ्यास करून करायला हवीत. टायफा वनस्पती काढणे आवश्यक असेल तर त्याचे नियोजन अगोदर करणे आवश्यक होते. पावसाळ्यात काढणे योग्य नाही. यासंबंधाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत." - डॉ. जयंत वडतकर (अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना)

"अभयारण्यातील मुख्य समस्या पानवेली काढणे ही होती. पण टायफा वनस्पती काढताना वेळ चुकीची होती. पानवेली काढल्या नाहीत, तर हिवाळ्यात पक्ष्यांना बसायला जागा राहणार नाही. त्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होऊ शकते." - अमोल दराडे (गाइड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT