Yeola
sakal
येवला: माझी वसुंधरा अभियानाचे विभागाचे पहिले पारितोषिक मिळालेल्या येवला पालिकेने पुढचे पाऊल टाकले आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत पालिकेने प्लॅस्टिक बंदी कठोरपणे राबविण्याचा निर्धार केला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे व नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्या अध्यक्षतेखाली शहर स्वच्छतेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहर अधिक स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीदरम्यान शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
विशेषतः नगरपालिका घंटागाडी कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत तसेच घराघरातून कचरा संकलन आणि कचरा विलगीकरण प्रभावीपणे राबविण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा देण्याचे आवाहन करण्याबरोबरच स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरातील वाढते प्लास्टिक प्रदूषण लक्षात घेता शहरात प्लास्टिकबंदी प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. प्लास्टिक वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी दुकानदार व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यापूर्वी शहरात नगरपालिकेने प्लास्टिक जप्तीसह दंडात्मक मोहीम राबवून कारवाई केली आहे. यापुढील काळात अधिक कठोरपणे कारवाई करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, मुख्याधिकारी तुषार आहेर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, स्वच्छता सभापती पारुल गुजराती, नगरसेवक प्रवीण बनकर, शंकर मांजरे, नगरसेविका लक्ष्मीबाई जावळे, गुड्डू जावळे, गणेश गायकवाड, नगरसेवक निसार शेख, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, दत्ता निकम, स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामुळे येवला शहरात स्वच्छता मोहिमेला अधिक गती मिळणार आहे. प्लॅस्टिकमुक्त शहर घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. नागरिकांनीही प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा व माझी वसुंधरा अभियानासह स्वच्छ शहरासाठी सहकार्य करावे.
- तुषार आहेर, मुख्याधिकारी, येवला पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.