wagh baras esakal
उत्तर महाराष्ट्र

International Tigers Day : इथे चक्क वाघाची केली जाते पूजा, उ.महाराष्ट्रातल्या आदिवासींची 'वाघबारस'ची अनोखी परंपरा

रतन चौधरी

निसर्गपूजा ही संपूर्ण भारताची संस्कृती आहे. भूतदयेची शिकवण आपण सगळ्या जगाला दिली आहे. इतकेच नव्हे तर प्राणिमात्रावर दया करताना त्यांची पूजा करायची परंपरा फक्त आपलीच. शेतात राबणाऱ्या बैलाची पूजा करायचा बैलपोळा ते नागदेवतेची पूजा करायचा नागपंचमी असे सणवार संपूर्ण जगात फक्त भारतातच पाहायला मिळतात.

असाच एक सण म्हणजे वाघबारस.

वाघदेवतेच्या पुजनाने सुरू होते आदिवासी बांधवांची दिवाळी. वाघबारशीच्या निमित्ताने गावसीमेवर गावोगावी होते वाघदेवतेची पूजा. आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे. निसर्ग हाच देव मानव जातीचा तारणहार आहे. "आले निसर्गाच्या मना तेथे कोणाचे चालेना" आदिवासी बांधवांची शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. जल, जंगल, जमीन यावर आदिवासी समाज पिढ्यांपिढ्या हक्क सांगत आला आहे. त्यामुळे आदिवासींच्या जीवनातील पावन दिवस म्हणजे वाघबारस.

हिंदू धर्मात अनेक सण रीतिरिवाजाप्रमाणे साजरे केले जातात. मात्र आदिवासी समाजात वेगळया तऱ्हेने दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी म्हटली की, नवीन कपड्यांची खरेदी, गोड धोड पदार्थ, लक्ष्मी पूजन म्हणजे पैसा अडका, दागदागिने, सोने-नाणे यांची पुजा हिंदू धर्मानुसार केली जाते. पण, आदिवासी बांधव हाच सण परंपरेनुसार वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची पद्धत आजही कायम आहे.

आदिवासी बांधव संपत्तीचा संचय करीत नाहीत. मिळेल तेवढयात समाधान मानून जीवन जगत असतो.त्यामुळे लक्ष्मी पुजन म्हणजे संपत्तीचे पुजन नव्हे, तर गोमातेचे पूजन होय. आदिवासी बहुल तालुक्यात कोकणा, महादेव कोळी, वारली, भिल्ल या जमातीचे आदिवासी बांधव दिवाळीची सुरूवातच वाघबारशीने करतात. तालुक्यात पिंपळसोंड, बर्डीपाडा, करंजुल, खिर्डी, भाटी, अलंगुण, प्रतापगड, कुकूडणे, मांधा या गुजरात सिमावर्ती भागात आजही वाघबारस पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. या गुरे चारणारे बाळदी नेहमी प्रमाणे गायी चरण्यासाठी जंगलात घेऊन जातात. या दिवशी सर्व बाळदी(गुराखी) उपवास करतात. गाव सीमेवर 'बारस' पूजली जाते. गावातील भगतासह जूनी जाणकार माणसे सिमेवर जमा होतात. गावातून शेरभर तांदूळ घरोघरी जाऊन जमा करतात. त्याला ' इरा 'असे म्हणतात.

पाच कोंबडीचा बळी वाघदेवाला चढवून पूजा केली जाते. पाच वाजेच्या सुमारास सावरीचा खांब गाय दांडावर उभा करून त्या जागी शेणाने सारवून तांदळाच्या पुंजक्या पाडतात. आदिवासी बांधव स्वास्तिक काढत नाहीत. शेंदूर चढवून पुजा केली जाते. वाघदेवाला भगताकडून विनवणी केली जाते. ''या वर्षी आमच्या लक्ष्मीच (गायीच) रक्षण तू जंगलात केलस तसेच, रक्षण पुढे पण कर.'' , अशी विनवणी वाघदेव, नागदेव, मोर, सूर्य, चंद्र यांना केली जाते. त्या  ठिकाणी अंडे किंवा  कोंबडीचे जिवंत पिल्लू ठेवून गाय दांडावरून ढोल वाजवून, हाकाटून गायी, गुरांचा कळप भडकावून दिला जातो. कळप सैरावैरा पळतो अन् कळपाच्या पायाखाली अंडे किवा पिलाला तुडवून बळी दिला जातो.

नंतर बाळदीला अंघोळी घालून भाताचे कुटारीचा गंजीला आग लावली जाते. त्या आगीच्या ज्वालामधून धावत पळत जावे लागते. अशी परिक्षा गुराख्याची घेतली जाते. जेणे करून वाघाच्या जबडयातून, तावडीतून, जंगलात लागलेल्या आगीतून, पुरातून बाळदी आपल्या गुरांची सुखरूप  सुटका करण्याची पात्रता त्याच्या अंगी आहे का हे प्रत्यक्ष अनुभवातून खात्री केली जाते. त्यानंतर इरा शिजवून लहान थोर एकत्र जमवून जेवण करतात.

मंतरलेले गोमूत्र तांदूळाचे दाणे घरोघरी जाऊन गोठ्यात टाकले जाते व गोठा पवित्र केला जातो. वाघदेवाच्या मुर्तीवर चंद्र, सूर्य, वाघदेव, नागदेव, मोर यांची चित्रे  कोरलेली असतात. वाघदेवाला या दिवशी शेंदूर लावला जातो. शेतात पिकलेल्या नवीन धान्याची कणसे नागली, भात, उडीद, वाहिले जाते. येथे जंगलातील रानभूत, डोंगऱ्यादेव,निळादेव, पाणदेव, हिरवा देव, कणसरा, रानवा, गावदेवी, लक्ष्मी (गाय) या सर्व ज्ञात, अज्ञात देव-देवता, भूत-खेत या सर्वांची विधीवत पुजा केली जाते.

याचा हेतू असा की,''आदिवासी व त्यांची गुरे वर्षेभर रानावनात,दऱ्या खोऱ्यात,काटाकुट्यात हिंडत असतात. त्यांना या वन्य प्राण्यांपासुन इजा होऊ नये. त्यांचे भक्ष्य ठरू नये. आदिवासींच्या लक्ष्मीला म्हणजे गायी, गुरांना इजा होऊ नये .गुरांना व गुराख्यांना सुख शांती लाभावी हाच एकमेव उद्देश या निसर्ग पुजे मागे असतो.


गायीचे गोडवे गात घरोघरी रात्री मागतात धिंडवाळी. !
वाघबारशीच्या दिवसापासुन लक्ष्मी पूजनापर्यंत आदिवासी बाळदी रोज रात्री परिसरातील गावोगावी जाऊन गाय, वाघोबा, नागोबा यांच्या गोडव्याची गाणी गात गायीच्या नावाने धिंडवाळी मागतात. घरात व गायीच्या गोठ्यात गोमूत्र शिंपडून घर पवित्र  केले जाते. या पाच दिवसात गायीच्या  रुपाने लक्ष्मी घरात येते अशी आदिवासी बांधवांची धारणा आहे. गुराखी धिंडवाळी गातांना कोणत्याही वाद्याचा वापर करीत नाहीत. अगदी तालासुरात मुखानेच गोडवे गायले जातात. धिंडवाळी मागणाऱ्यांना आदिवासी महिला मनोभावे ओवाळतात.

अखंड दिव्याकरिता तेल देतात. त्याचबरोबर सुपात नागली, भात असा निवद, इरा (नैवेद्य) दक्षिणा दिली जाते. अशा रितीने आदिवासी भागात पारंपरिक रितीने वाघदेवाची निसर्गपुजा केली जाते. वाघबारशीच्या सकाळी लहान मुले एका दुरडीत झेंडूची फुलांची माळ टाकून वाघ्याची ''भायरो, दूध भात खायरो, वाघ्या गेला रागीत डांगर मागी''  हे गाणे गात नाचत गात दिवाळी मागतात.

आदिवासी जंगलात, दरीखोऱ्यात, कडेकपारीत निसर्गाच्या कुशीत ऊन, थंडी, वादळ-वारा, पाऊस याची तमा न बाळगता आनंदाने निसर्गाकडून मिळेल त्यात समाधान मानून जीवन जगत आहे. अत्यंत भोळा, प्रामाणिक, समाधानी म्हणून असलेली त्याची ओळख आजही संस्कृती टिकवून आहे.

त्यामुळेच आदिवासी बांधव आनंदाने म्हणतात, ''आदिवासी आम्ही जंगलवाशी, चंद्रा, सूर्यापासून आदिवासी'' मात्र, अलीकडे प्रकल्पाच्या नावाखाली आदिवासीवर अन्याय केला जात आहे. आपली आदिवासी म्हणून असलेली ओळख पुसली जाईल की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच जल, जंगल,जमिनीवर आपला हक्क सांगत आहे. मात्र विकासाच्या नावाखाली आदिवासी समाजाची कुचंबणा केली जात आहे.  आदिवासी हेच खरे पर्यावरणाचे, निसर्गाचे रक्षण कर्ते आहेत हे नाकारता येणार नाही.      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT