यवतमाळ : कुख्यात म्हणून ओळख असलेल्या अक्षय राठोड याच्यासह टोळीतील सदस्यांनी पोलिस अधिकाऱ्यावर गोटमार करून जखमी केले. ही घटना शनिवारी (ता. आठ) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पोलिसांच्या "ऑल आउट' ऑपरेशनदरम्यान शहरातील जुन्या बसस्थानक चौकात घडली. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करून चौघांना अटक केली.
पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने शनिवारी (ता. आठ) सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, सुरेश मेश्राम, रितूराज मेडवे, सलमान शेख, सुधीर पुसदकर यांची पेट्रोलिंगसाठी ड्युटी लावण्यात आली होती. यवतमाळ शहरातील बसस्थानक चौकात पेट्रोलिंग करीत असताना रेकॉर्डवरील अक्षय राठोड आणि त्याचे सहकारी बसस्थानक चौकात उभे होते. पोलिसांनी त्यांच्याजवळ जाऊन नाव व पत्ता विचारला. सहायक पोलिस निरीक्षक देशमुख यांनी त्यांची अंगझडती घेऊन फोटो काढायचे आहे, असे म्हटले. झडती घेण्यास सुरुवात करीत असताना पोलिस कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला.
अक्षय राठोड याने सहायक पोलिस निरीक्षक देशमुख यांना धक्का देऊन पळू लागला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पाठलाग सुरू करताच अक्षयच्या टोळीतील सदस्यांनी रस्त्यावर पडलेले गोटे उचलून पोलिसांच्या दिशेने भिरकावणे सुरू केले. यात अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील डीबी पथकात कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख जखमी झाले. पोलिसांनी बळाचा वापर करून गुंडांना ताब्यात घेतले. पेट्रोलिंगवरील इतर कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळ गाठले. त्यानंतर अक्षय राठोडची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे धारदार चाकू आढळून आला. धारदार चाकू जवळ बाळगून पोलिसांसोबत हुज्जत घातली. अश्लील शिवीगाळ करीत गोटमार करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेची तक्रार डीबी पथकाचे सुधीर पुसदकर यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून अक्षय आत्माराम राठोड (वय 30, रा. चांदोरेनगर, मोहा फाटा), शुभम हरिप्रसाद बघेल (वय 24, रा. वैभवनगर, वाघापूर), बगीरा ऊर्फ आशीष रमेश दांडेकर (वय 30, रा. चमेडीयानगर, यवतमाळ), सचिन मेघश्याम वाढवे (वय 31, रा. यवतमाळ) यांना अटक केली. या घटनेने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अक्षय राठोड याची पोलिसदप्तरी कुख्यात म्हणून नोंद आहे. त्याच्यावर खून, खंडणी, मारामारी अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. काही वर्षांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याचे त्याने पिस्तूल पळविले होते, तर एका पोलिस निरीक्षकावर पिस्तूलही रोखली होती. अक्षय राठोड याने अलीकडे गुन्हेगारीत सक्रिय होत, आपली टोळी वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख यांनी झडती घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्यावेळी अक्षयने पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. "तुम हमे पहचानते नही क्या, हम यवतमाल के भाई हैं, मैं अक्षय राठोड हूं. मेरे बारे में किसी को भी पुछ लो' अशाप्रकारे फिल्मिस्टाइल डॉयलॉगबाजी सुरू करीत शिवीगाळ केली.
चौघेही आरोपी पळून जात असताना रोडवर पडले. त्यामुळे शुभम बघेल याच्या डोक्याला व सचिन वाढवे याच्या डोळ्याच्या खाली किरकोळ जखम झाली. जखमींना रात्रीच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.