Deathbody sakal
विदर्भ

Gadchiroli News : खाटेवर मृतदेह ठेवत नाला केला पार

भामरागड तालुक्यातील घटना; इथे मृतदेहाचे हाल बघून मृत्यूही ओशाळला.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - सरकार विकासाचा कितीही डांगोरा पिटत असले, तरी गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील दुर्गम भागांत जिवंत माणसे सोडाच पण मृतदेहाचेही हाल होतात आणि हे हाल बघितल्यावर मृत्यूदेखील ओशाळतो. अशीच एक घटना भामरागड तालुक्यात उघडकीस आली असून येथील नदीसारख्या महाकाय असलेल्या गुंडेनूर नाल्यावर पूल नसल्याने ग्रामस्थांना मृतदेह खाटेवर बांधून हा दुथडी भरून वाहणारा नाला पार करावा लागला. या जिल्ह्यातील विदारक परीस्थिती कथन करणारा या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

एकीकडे देशाचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत. नदी,नाल्यांवर पूल नसल्याने तुडुंब भरलेल्या नदीतून जीव धोक्यात टाकून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. एवढेच नाही तर गावातील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह गावकऱ्यांना खाटेवर आणावा लागला.

अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त अशी भामरागड तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र राज्याच्या शेवटचा टोकावर असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाते. याच लाहेरीवरून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडेनूर नाल्यावर पूल नसल्याने गुंडेनूर परिसरातील आदिवासींना पावसाळ्यात या नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो.

गुंडेनूर नाल्या पलीकडे कुवाकोडी, दामनमर्का, फोदेवाडा, बिनागुंडा, पुंगासुर, पेरमलभट्टी, गुंडेनूर आदी गावांचा समावेश आहे. पावसाळ्यात या गावांतील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ४ ऑक्टोबर रोजी गुंडेनूर येथील कटिया कारिया पुंगाटी (वय ५०) या व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने गावातील नागरिकांनी त्याला सकाळी १० वाजताच्या सुमारास उपचारासाठी लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तत्काळ लाहेरीवरून भामरागड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना रात्रीच्या सुमारास कटिया पुंगाटीचा मृत्यू झाला. रात्रीच्या सुमारास मृतदेह गावाकडे घेऊन जाणे शक्य नसल्याने ५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास गावकऱ्यांनी गावातील ट्रॅक्टरच्या साहाय्याने मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

पण सगळे गुंडेनूर नाल्यापर्यंत पोहोचले, तर पावसाळ्याचे दिवस असल्याने हा नाला तुडूंब भरून वाहत होता. एरवीही हा नाला बाराही महिने वाहता असतो. त्याचा आकार नाल्यासारखा नसून एखाद्या नदीसारखाच आहे. त्यामुळे कोणताच पर्याय नसल्याने ग्रामस्थांनी काळजावर दगड ठेवून कटिया पुंगाटीचा मृतदेह खाटेवर बांधला आणि हा महाकाय नाला पार करून गुंडेनूर गाठले.

दर वेळेस जीव मुठीत...

येथील आदिवासी बांधवांना महत्त्वाच्या कामासाठी कुठे जायचे असल्यास पूल नसलेला हा नाला व मार्गातील इतर नदी, नाले जीव मुठीत घेऊन पार करावेच लागतात. काही महिन्यांपूर्वी याच परिसरातील आदिवासींना अंत्यदर्शनासाठी कोयर गावात जायचे होते. मात्र,नदी,नाले तुडुंब भरून वाहत असल्याने गावकऱ्यांनी नाल्याच्या दोन्ही बाजूच्या झाडांना दोर बांधून स्वतःचा जीव धोक्यात टाकून नाला पार केला होता.

त्या घटनेचाही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाजमध्यमात व्हायरल झाला होता. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी तुडूंब भरलेल्या नाल्यातून चक्क मृतदेह खाटेवर घेऊन जाण्याची वेळ आदिवासींवर ओढवल्याचे दिसून आले. त्यामुळे या भागातील नदी,नाल्यावर पुलाचे बांधकाम कधी होणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT