यवतमाळ : संत गाडगे महाराज यांनी हातात झाडू घेऊन समाजाला स्वच्छतेचे धडे दिले. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुद्धा "स्वच्छ भारत अभियान' हाती घेऊन देशातील प्रत्येक गाव आणि शहर स्वच्छ व्हायला पाहिजे, असा संदेश दिला. तसाच संदेश यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील वाई येथील एक "स्वच्छतादूत' देत आहे. गेल्या 22 वर्षांपासून हातात झाडू घेऊन ते विना मोबदला गावात स्वच्छता करीत आहेत.
भाऊराव गेडाम असे या "स्वच्छतादूता'चे नाव आहे. आज ते 73 वर्षांचे आहेत. 940 लोकसंख्या असलेल्या वाई या लहानशा गावात 269 कुटुंबांकडे शौचालय आहेत. पूर्वी गावातील व्यक्ती शौचासाठी गावाबाहेर जायचे. ती घाण माशा-कीटक आणि हवेच्या माध्यमातून गावात पसरायची. त्यामुळे गावात रोगराई पाचविलाच पुजली होती. मात्र, भाऊराव गेडाम यांनी गावकऱ्यांना केलेले प्रबोधन व पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम करून वापरदेखील सुरू केला.
वाई गावात प्रवेश करताच गावातील सर्व लहान-मोठे रस्ते, ग्रामपंचायत परिसर, मंदिर आणि शाळा सर्व चकचकीत दिसते. याचे सर्व श्रेय भाऊराव गेडाम यांनाच जाते. त्यांच्या या महान कार्यामुळेच पंचक्रोशीतील नागरिक त्यांना "गाडगेबाबा' म्हणून ओळखतात. 22 वर्षांपूर्वी आपल्या गावात पाहुणे येणार म्हणून भाऊराव गेडाम यांनी गाव स्वच्छ करण्यासाठी हातात झाडू घेतला. तो झाडू आजतागायत त्यांच्या हातात कायम आहे. म्हणजेच आजही ते गाव स्वच्छतेचे काम तेवढ्याच तत्परतेने करीत आहेत. सूर्योदयापूर्वी उठून हातात झाडू घेऊन सर्व गाव आणि गावातील रस्ते-नाल्या ते झाडून काढतात. अगदी पहाटे सुरू झालेले त्यांचे गाव स्वच्छतेचे कार्य सकाळी आठवाजेपर्यंत चालते. त्यानंतर ते गावालगत कुणाच्या शेतात काम लागले तर मजुरीला जातात आणि कामावरून परत आल्यावर पुन्हा सायंकाळपासून रात्री नऊ वाजेपर्यंत गाव स्वच्छ करतात. कुणी व्यक्ती उघड्यावर शौचास जाताना दिसल्यास त्याला स्वच्छतेचे महत्त्व ते पटवून देतात. त्यामुळेच वाई गावातील रस्ते, नाल्या, परिसर चकाचक दिसते. त्यांचे हे कार्य समाजाला नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे.
दुसऱ्याला काम सांगण्यापेक्षा ते आपणच केलेले चांगले. स्वच्छता दिसली की मनही प्रसन्न राहते. घरात आणि गावात रोगराई येत नाही. याच उद्देशातून मी गावात साफसफाई करीत असतो. ती केल्याशिवाय मला चैन पडत नाही.
-भाऊराव गेडाम, वाई, ता. पांढरकवडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.