चंद्रपूर : कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी शासनाने सर्वत्र टाळेबंदी सुरू केली. सिनेमागृह, उपहारगृह ही कोरोना प्रसाराची मुख्य ठिकाणे प्रामुख्याने बंद करण्यात आली. लॉकडाऊन 5 मध्ये उपहारगृहांना परवानगी नाकारण्यातच आली, केवळ पार्सल स्वरुपात सेवा देण्यास परवानगी असताना चंद्रपुरातील काही उपहारगृहांनी शासनाचे नियम डावलून ग्राहकांना हॉटेलमध्ये बसण्याची व्यवस्था करून दिली आणि त्यांना मनपाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्रत्यक्ष दुकानात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या उपाहारगृहे, खाद्यगृहांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. केवळ पार्सल देण्याच्या स्पष्ट सूचना असताना ग्राहकांसाठी दुकानाच्या आत बसण्याची व्यवस्था करणाऱ्या शहरातील कॅफे मद्रास व रसराज हॉटेल या प्रतिष्ठानांवर बुधवारी (ता. 10) मनपा पथकातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी शासनातर्फे पूर्णवेळ लॉकडाउन लागू करण्यात आले होते. दरम्यान, परिस्थिती पूर्वपदावर यावी, याकरिता मागील काही दिवसांपासून यात शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत दुकाने सुरू ठेवण्यात येत असून उपाहारगृहे, खाद्यगृहे, घरगुती खानावळ, स्वीट मार्केट, फरसाण सेंटर, चहा नाश्ता सेंटर यांना केवळ पार्सल स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. प्रत्यक्ष दुकानात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्थेस मनाई आहे. अशा स्वरूपाचे शासनातर्फे स्पष्ट निर्देश असतानाही शहरातील काही उपहारगृहे, खाद्यगृहे, हॉटेलचालक ग्राहकांना दुकानाच्या आत बसून नाश्ता, जेवण करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.
कोरोना संसर्गातून पसरू शकतो, त्यामुळे शारीरिक दूरी ठेवणे अतिशय अनिवार्य आहे. त्यादृष्टीने दुकानमालकांनी ग्राहकांना केवळ पार्सल द्यावे, ग्राहकांची गर्दी होऊ देऊ नये, एकावेळी 5 पेक्षा अधिक लोकांना दुकानात प्रवेश देण्यात येऊ नये, फिजिकल डिस्टन्सिंग पाळत दोन ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर ठेवावे, विहित वेळेत दुकाने सुरू व बंद करावी, पूर्णतः स्वच्छता राखावी यासारख्या अटींचे पालन करावयाचे आहे. मात्र, काही उपहारगृहे, खाद्यगृहे, हॉटेलचालक या सूचनांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आल्याने मनपातर्फे कारवाई करण्यात येत आहे.
कारवाईनंतरही नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्याचे मनपाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.