अमरावती : सुमारे 130 वर्षांपूर्वी अमरावतीची सांस्कृतिक ओळख करून देणारे व स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान देणारे इंद्रभुवन थिएटर आता अखेरचा श्वास घेत आहे. किर्लोस्कर नाटक कंपनी, दीनानाथ मंगेशकर, संगीतसूर्य केशवराव भोसले, पाटणकर नाटक कंपनी व बालगंधर्वांना त्याकाळी साथ देणाऱ्यांमध्ये इंद्रभुवन थिएटर अग्रस्थानी होते. किर्लोस्कर व बालगंधर्वांना कर्जमुक्त करणाऱ्या आणि मंगेशकर कुटुंबीयांना साथ देणाऱ्या या थिएटरने स्वातंत्र्यलढ्यातही साथ दिली. पुण्यानंतर पहिला सार्वजनिक गणेशोत्सव याच थिएटरमधून सुरू झाला. लोकमान्य टिळक, बाबू अरविंद घोष, डॉ. ऍनी बेझंट, दादासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी, मिस गार्नर अशा स्वांतत्र्यसेनानींना क्रांतीची मशाल पेटविण्यात साथ देणारेही इंद्रभुवनच होते.
1890 नंतरच या जागेला थिएटरचे रूप
कापसाची मोठी बाजारपेठ असलेले अमरावती शहर रसिकांचे शहर होते. 1890 पूर्वी जुन्या अमरावतीत (त्याकाळची उमरावती) एकही थिएटर नव्हते. सामाजिक कार्यकर्ते सोमेश्वर पुसदकर सांगतात, की 1889 पर्यंत ही जागा सेठ पुरणमल यांचा गायवाडा होता, त्याचा उपयोग त्या काळी वक्तृत्वोत्तेजक सभांसाठी होत होता. त्याला त्यावेळी थिएटरचे स्वरूप आले नव्हते. 1890 नंतरच या जागेला थिएटरचे रूप आले असावे, कारण 1 जानेवारी 1898 ला त्याकाळी नावाजलेल्या किर्लोस्कर नाटक मंडळीचा संगीत नाटकाचा पहिला प्रयोग येथे झाला. त्यानंतर अनंत केशव असनारे यांनी ही जागा विकत घेतली व नंतर ती 1920 मध्ये देविदास मारोती बोके पाटील या मालगुजारास विकली.
1923 मध्ये थिएटर बांधले
श्री. बोके यांनी 1923 मध्ये थिएटर बांधले व नाटक कंपन्यांना सोयिस्कर अशी व्यवस्था करून दिली. 12 मे 1923 ला उद्घाटन समारंभास पाटणकर नाटक कंपनीने श्रीकृष्ण लीला, या नाटकाचा प्रयोग केला. त्या काळातील आठवणी सांगताना भालचंद्र रेवणे सांगतात, की इंद्रभुवन थिएटरमध्ये वीर वामनराव जोशींची नाटके सादर केली जात. बालगंर्धवांसह दीनानाथ मंगेशकर, संगीतसूर्य केशवराव भोसले, किर्लोस्कर, पाटणकर यांच्या नाटकांचे हे थिएटर फार मोठे आश्रयस्थान बनले. 1923 मध्ये याच थिएटरमध्ये पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. त्याकाळी वीज नव्हती, त्यामुळे तो जनरेटरवर दाखविला गेला.
राम गणेश गडकरींचे एकच प्याला बालगंधर्वांनी प्रथम येथेच सादर केले. त्यातील सिंधूची त्यांची भूमिका बघण्यासाठी रसिकांची तोबा गर्दी व्हायची व तिकीट मिळत नव्हते. पूर्ण हॉल हाउसफुल्ल असायचा. गोविंद बल्लाळ देवल यांचे संगीत शारदा, प्र. के. अत्रेंचे उद्याचा संसार, वीर वामनरावांचे रणदुदंभी, राक्षसी महत्त्वाकांक्षा, गडकरींचे भावबंधन, संगीतसूर्य केशवराव भोसलेंचे संगीत मान-अपमान अशा सर्व नाटकांचे प्रयोग या थिएटरने बघितलेत नव्हे तर गाजवलेत. 1942 पर्यंत हा नाटकांचा सुवर्णकाळ होता. 1943 ला दीनानाथांचे निधन झाले व 1955 ला बालगंधर्वांचा अखरेचा प्रयोग झाला.
उतरती कळा
याच कालावधीत शहराबाहेर गणेश थिएटर बांधल्या गेले. काही प्रयोग तेथेही होऊ लागलेत. कालांतराने गणेश थिएटरपाठोपाठ चित्रा थिएटर, राजकमल थिएटर बांधण्यात आलीत व इंद्रभुवनच्या सुवर्ण वाटचालीस उतरती कळा लागली. शहराच्या पर्यायाने परकोटाच्या आतमधील वसाहत शहराबाहेर वसू लागली व प्रेक्षकांनी पाठ फिरवणे सुरू केल्याने इंद्रभुवनला प्रेक्षकांचा ओघही मंदावला. सिनेमांचे प्रस्थ वाढू लागल्याने नाटकांचा रसिक त्याकडे वळू लागला व थिएटरचे रूप टॉकीज, असे होऊ लागले.
स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
नाट्यक्षेत्राला बळकटी देणाऱ्या इंद्रभुवनने स्वातंत्र्यलढ्यातही योगदान दिले. 1900 मध्ये पहिला सार्वजनिक गणेशोत्सव याच थिएटरमधून सुरू झाला. याच वर्षी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या मिस गार्नर यांचे वर्ष 1906 मध्ये भाषणही याच थिएटरमध्ये झाले. बाबू अरविंद घोष व डॉ. ऍनी बेजंट यांच्याही स्मृती येथे आहेत.
अक्षम्य दुर्लक्ष
स्वातंत्र्यानंतर बदलत्या काळात सुसज्ज थिएटर्स उभे झाले, मात्र ऐतिहासिक वारसा असलेल्या इंद्रभुवनकडे सर्वांचेच अक्षम्य दुर्लक्ष झाले. आज ही वास्तू मोडकळीस आली असून बांबूच्या टेक्यावर उभी आहे. वास्तूच्या एका भागात इंग्रजी माध्यमाची खासगी शाळा मात्र उभारल्या गेली आहे. महापालिकेने वास्तूचा जुना भाग शिकस्त म्हणून घोषित केला आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याकडे मात्र सांस्कृतिक क्षेत्रासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचेही दुर्लक्ष आहे, ही दुर्दैवाची बाब ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.