वर्धा : लॉकडाउनमुळे अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडल्याने प्रथा परंपरेच्या नावाखाली होणारी बहुगुणी वृक्षाच्या कत्तलीला पायबंद बसला. हळदीच्या मांडवावर जांभळाच्या झाडाच्या एक-दोन फांद्या टाकून विवाह सोहळे पार पडले. या पुढेही लग्न कार्यात नागरिकांनी मान म्हणून जांभळाच्या वृक्षाच्या एक-दोन डहाळी टाकाव्यात. त्यामुळे पर्यावरणास हातभार लागेल, वृक्षाची कत्तल होणार नाही, असे वृक्षप्रेमी बोलत आहेत.
भारतीय संस्कृतीत धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सवात मोठ्या प्रमाणात बहुगुणी वृक्षांची कत्तल केली जाते.
दसऱ्याला आपट्याची पाने, पोळ्याला पळसाची झाडे, प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात आंब्याची पाने वापरली जातात. तर लग्न सोहळ्यात हळदीच्या मांडवावर जांभळीच्या झाडांच्या फांद्या टाकण्याची पूर्वापार परंपरा आहे. याच मांडवात हळदीचे जेवण आणि वऱ्हाड्यांच्या बसण्याची व्यवस्था केली जाते.
लग्नाच्या एक दोन दिवसापूर्वीच गावात कुणाच्या शेतात जांभळाचे झाड आहे, याचा शोध घेतला जातो. हळदीच्या दिवशी वऱ्हाडी व कुटुंबीय भल्या पहाटे बैलजोडी घेऊन जांभळ्याच्या फांद्या आणायला जातात. फांद्या तोडण्यापूर्वी जांभळाच्या झाडाचे पूजन करून नैवेद्य ठेवला जातो. यानंतर त्याच झाडावर कुऱ्हाडीने वार करून फांद्या तोडल्या जातात. पूर्ण झाडच बोडखे केले जाते. गत काही वर्षांत गावखेड्यातील जांभळाची झाडेही कमी झाली आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तीन महिने लॉकडाउन होते. नेमका हाच विवाह सोहळ्याचा हंगाम होता. त्यामुळे अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडले. अनावश्यक खर्चाची बचत झाली. त्यातच पर्यावरणालाही हातभार लागला आहे. अनेकांनी हळदीच्या मांडवावर जांभळाच्या झाडाच्या एक-दोन फांद्या टाकून ताडपत्री टाकली. लॉकडाउनचा पर्यावरणाला असाही सकारात्मक फायदा झाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने नागरिकांनी यापुढेही विवाह समारंभात मान म्हणून झाडाच्या फांद्या नव्हे, तर एक दोन डहाळ्याच टाकाव्या, असे वृक्षप्रेमींचे म्हणणे आहे.
यंदा राज्यात लॉकडाउन असल्याने माझा मुलगा राहुल याचा विवाह सोशल डिस्टन्सिंगचे बंधन पाळून अगदी 25 लोकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामुळे अनावश्यक खर्चाची बचत झाली आहे. विशेष म्हणजे, हळदीच्या मांडवाकरिता जांभळ्याच्या झाडाच्या फांद्यांचा वापर केला नाही.
प्रेमराज चाफले
रा. हिंगणघाट
पूर्वी गावाभोवती आमराई होती. 200 ते 300 झाडे आंब्याची असायची. आमराईत जांभळाची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे वृक्षतोडीचा पर्यावरणावर फारसा परिणाम होत नव्हता. गत काही वर्षांत विकासाच्या नावाखाली वनसंपदेची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे. त्या तुलनेत वृक्षारोपण व संवर्धन होत नाही. तर प्रथा परंपरेच्या नावावर बहुगुणी झाडांची कत्तल होते. यंदा लॉकडाउनमुळे विवाह समारंभ साध्या पद्धतीत पार पडले. जांभळाच्या वृक्षाची कत्तल थांबली. यापुढे नागरिकांनी मान म्हणून हळदीच्या मांडवावर जांभळाच्या डहाळ्या टाकल्या तर पर्यावरणास हातभार लागेल.
आशीष भोयर
पर्यावरण संवर्धन संस्था, हिंगणघाट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.