tendupatta
tendupatta  
विदर्भ

तेंदूपत्ता संकलनात लाखोंचा गैरव्यवहार! काय आहे लिलावाचे गौडबंगाल?

सकाळ वृत्तसेवा

एटापल्ली (जि. गडचिरोली) : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र तेंदूपत्ता संकलनाला सुरुवात झाली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदा लिलाव प्रक्रिया न राबविता अनेक ग्रामसभांनी परस्पर तेंदूपत्ता कंत्राटदारांशी चर्चा करून तेंदूपत्ता युनिटची विक्री केली. परंतु ग्रामसभेच्या आर्थिक फायद्याचा विचार न करता केवळ पदाधिकाऱ्यांच्या आर्थिक हितासाठी तेंदूपत्ता खरेदीची प्रक्रिया राबविल्याचा आरोप केला जात आहे.
एटापल्ली तालुकातील एक नगरपंचायत व 31 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात तेंदूपाने संकलन केले जात आहे. कोरोनासाठी शासनाने घोषित केलेल्या टाळेबंदीचा फायदा घेत काही ग्रामसभा पदाधिकारी व कंत्राटदारांनी संगनमताने लिलाव प्रक्रिया न  राबविताच परस्पर करारनामा करून तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू केले. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची ओरड सुरू असून मजुरांची महसुली रक्कम हडप करण्याचाही डाव असल्याची शंका व्यक्त केली जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्र रोजगारविरहित असल्याने स्थानिक रहिवासी नागरिकांना तेंदूपाने संकलन हाच वर्षातील एकमेव नगदी रक्कम मिळवून देणारा हंगाम आहे. मात्र, यंदा कंत्राटदार व ग्रामसभांच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना समस्येचे कारण पुढे करून कोणत्याही प्रकारच्या लिलाव पद्धतीचा अवलंब न करता नियमबाह्य तेंदूपाने ट्रेडिंग कंपन्यांशी करारनामा करून मजुरांची दिशाभूल केली आहे. दरवर्षी तेंदूपाने संकलन व विक्री प्रक्रिया राबवताना वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करून ग्रामपंचायत पातळीवर जाहीर लिलाव केला जात होता. लिलाव बोलीत सर्वानुमते मंजूर रकमेतून अर्धी मजुरी व अर्धी रक्कम महसूल म्हणून मजुरांना अदा केली जात होती. परंतु यावर्षी कोरोना संसर्ग महामारीच्या संचारबंदीमुळे पाचपेक्षा जास्त व्यक्त एकत्र गोळा होण्यास शासनाने प्रतिबंध घातला आहे. याचा फायदा घेत अनेक ग्रामसभा पदाधिकारी व कंत्राटदारांनी परस्पर नियमबाह्य करारनामे करून तेंदूपत्ता संकलन सुरू केले. यासंदर्भात काही ग्रामसभांच्या कारभारावर आक्षेप घेत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारीसुद्धा करण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामसभांनी परस्पर केलेली तेंदूपत्ता युनिटची विक्री संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
बोनसला मिळणार ठेंगा
तेंदूपाने संकलन केलेल्या मजुरांना दरवर्षी ग्रामसभांकडून बोनस दिला जातो. मात्र, यंदा चुकीच्या पद्धतीने पार पडलेल्या प्रक्रियेचा मजुरांना आर्थिक फटका बसणार आहे. अर्ध्या दिवसाची महसुली रक्कम कपात करून मजुरांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे परस्पर झालेल्या तेंदूपत्ता संकलनाच्या गौडबंगालातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची ओरड केली जात आहे. उन्हाचे चटके सहन करून तेंदूपाने संकलन करणा-या मजुरांना यंदा तेंदूपानांचा भाव चांगला मिळत असला तरी बोनस मिळणार की, नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT