नागपूर : रामदासपेठेतील विद्यापीठ ग्रंथालयाजवळील तुटलेल्या पुलाऐवजी नवीन पूलनिर्मितीसाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दक्षिण नागपूरसह बेसा, बेलतरोडीतील हजारांवर नागरिकांना सिव्हिल लाईनला जाण्यासाठी तसेच परत येण्यासाठी वर्षभर प्रत्येकी एक किमीचा फेरा घ्यावा लागणार आहे. परिणामी दररोज दोन किमीच्या अतिरिक्त फेऱ्यामुळे वर्षभरात एका वाहनचालकांना ७३० किमीचा अतिरिक्त फेरा घ्यावा लागणार आहे.
विद्यापीठ ग्रंथालयाजवळील रामदासपेठेतील कॅनलवरील पूलाचा भाग पावसामुळे ८ ऑगस्टला कोसळला. त्यामुळे पुलावरील वाहतूक घटनेच्या दिवशीच बंद केली. विशेष म्हणजे दक्षिण नागपूर, वर्धा रोड तसेच बेसा, बेलतरोडी येथून सिव्हिल लाईनमध्ये विविध कार्यालयातील चाकरमाने, अधिकाऱ्यांसाठी हा प्रमुख मार्ग होता. परंतु पुलावरील वाहतूक बंद केल्याने हजारो दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना पुलाजवळून डाव्या बाजूला वळावे लागते. त्यानंतर अलंकार टॉकीज चौक, येथून उजव्या बाजूला वळून पुन्हा ग्रंथालय चौकापर्यंत येऊन महाराजबाग मार्गाने सिव्हिल लाइन्समध्ये जावे लागत आहे. याच मार्गाने नागरिकांना परत यावे लागत आहे.
एकावेळेला एका वाहनधारकाला एक तर ये-जा करताना दोन किमीचा फेरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे वर्षभरात एका नागरिकाला ७३० किमीचा फेरा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे पेट्रोल खरेदीचा अतिरिक्त भुर्दंड नागरिकांच्या खिशावर पडणार आहे. दरम्यान, महापालिका येथे हा पूल पूर्णपणे तोडून नवीन पूल तयार करणार आहे. यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू झाली असून पुढील महिन्यात पूर्ण होणार आहे. परंतु प्रत्यक्ष काम सुरू होण्यास ऑक्टोबर महिना उजाडणार आहे. संपूर्ण काम होऊन पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पूल वाहतुकीस सुरू होण्याची शक्यता अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी व्यक्त केली.
खर्चाची आकडेवारी
-७३० किमीचे अतिरिक्त फेऱ्या
-इंधनावरील खर्च २० लाखांचा
-सरासरी १९ लिटर पेट्रोल,डिझेलचा भूर्दंड
-मेंटनन्स खर्च वेगळाच
पुलासाठी ८ कोटींची मंजुरी
विद्यापीठ ग्रंथालयाजवळील पुलाचा भाग कोसळून बंद होण्यापूर्वीच महापालिकेने नव्या पूलनिर्मितीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या पुलासाठी ८ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी सांगितले. निविदा काढण्यात आल्या असून पुढील महिन्यात कंत्राटदाराची निवड होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.