Artificial intelligence - भारतीय संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंब परंपरा ही पूर्वापार चालत आली आहे. यात मुलांना आजी-आजोबांसह काका-काकू, आत्या-मामा, मामा-मामी, दादा, वहिनी अशा अनेकांचा सहवास लाभत होता.
आज व्यावसायिकतेमुळे हा सहवास दुरापास्त झाला आहे. हीच मेख लक्षात घेत नागपूरमधील नऊ वर्षीय चिमुकले अनय व अबीर रामकृष्णन् या जुळ्या भावंडांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करीत आपल्या प्रिय व्यक्तीशी बोलण्याचे ‘इमवर्स’ ॲप विकसित केले आहे.
नागपूरकर असलेले अनय व अबीर चौथीत शिकत आहेत. त्यांचे वडील आर. रामकृष्णन् इन्वेस्टमेंट बँकिंग क्षेत्रात असून आई प्रीती आयटी क्षेत्रात कार्यरत होत्या. अनय व अबीरला संवाद साधण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची कल्पना सुचली आणि आईवडिलांसमोर त्यांनी ती बोलून दाखविली.
त्यांनाही ती आवडली. पुढे अभियंत्यांच्या मदतीने इमवर्स हे तंत्रज्ञान साकार झाले. आपल्या सहवासात नसलेल्या व्यक्तींशी संवाद कसा साधायचा याची माहिती नव्हती. मात्र, आम्ही संशोधन सुरू ठेवले. सहा महिन्यापूर्वी हे तंत्र साकारण्याचा प्रवास सुरू झाला. येत्या दोन महिन्यांमध्ये हे ॲप सर्वांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती अनय व अबीरने दिली.
इमवर्समध्ये काय?
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करीत चॅट जीपीटी सारखे मजकुरामध्ये उत्तर देणारे तंत्र विकसित झाल्याचे आपण सर्वच जाणतो. इमवर्समध्ये मात्र प्रत्यक्ष व्हिडिओ स्वरूपात आपल्याला अपेक्षित व्यक्ती उत्तर देईल.
जागतिक स्तरावरील थोर व्यक्तींशी संवाद
इमवर्सच्या माध्यमातून जगभरातील थोर व्यक्तींचे तत्त्वज्ञान त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा आधार घेण्यात आल्याने इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे ते संवाद साधणार आहेत. सध्या ॲपल कंपनीचे स्टीव्ह जॉब्स, राष्ट्रपिता महात्मा गांधी, अमेरिकन ॲस्ट्रॅनॉमर कार्ल सेगन, स्वामी विवेकानंद यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
आजी-आजोबांच्या विरहातून कल्पना
अनय व अबीरच्या आजीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले. तर, कोरोना काळात आईच्या वडिलांना (आजोबा) देखील त्यांनी गमविले. निरागस जिवांना ‘व्यक्ती सोडून का जातात?’ याचे उत्तर मिळेना. प्रत्यक्षात ती व्यक्ती समोर नसली तरी आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास, अस्तित्व आपल्याला सतत जाणवत राहावे, या अर्थाने हे दोघेही अनेक दिवस विचार करीत होते. यातूनच ही संकल्पना पुढे आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.