नागपूर ग्रामीणः जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यंदा पाऊस चांगला होत असल्याने पिकपाणी व्यवस्थित आहे. परंतू गेल्या आठवड्यापासून पाऊस ठाण मांडून असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सोयाबीन पिकावर अचानक रोगाने आक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे विघ्न ठाकले आहे. खापा, सावनेर, नरखेड, कुही, कामठी तालुक्यात तर या रोगाने थैमाण घातले आहे.
जलालखेडाः आतापर्यंत जोमात असलेल्या सोयाबीनने मागील आठ दिवसांपासून आपला रंग बदलविला तसेच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडण्यास सुरुवात झाली. सोयाबीन पिकांवर पिवळा मोझाईक व मूळकुंज या रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सोयाबीन पूर्णतः पिवळे पडले आहे. आता या सोयाबीनपासून कुठलेच उत्पन्न होणार नाही. या निराशेपोटी शेतकऱ्यांनी उभ्या पिकात गुरे चारण्यास सुरुवात केली आहे. नरखेड तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात १३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. पेरणीनंतर काहींचे बियाणे खराब निघाल्यामुळे सोयाबीन उगवलेच नाही व त्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. या संकटातून निघूनसुद्धा शेतकऱ्यांनी त्यांचे पीक जमविले होते. फुलावर येईपर्यंत पीक जोमात दिसत होते. पण त्यानंतर ते पिवळे पडणे सुरु झाले. यासाठी उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी महागडी फवारणी केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही व आता तर त्यांचा लावलेला खर्चही निघणे कठीण होऊन बसले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पिकावर रोटावेटर चालविण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्यामुळे काहींनी पिकात गुरेदेखील सोडली आहेत.
सगळे उपाय ‘फेल’
सोयाबीन पिकाची अशी परिस्थिती पाहून नागपूर कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सर्वेक्षणासाठी या भागात गेले होतो. त्यांच्या असे लक्षात आले की या भागातील सोयाबीन पिकांवर पिवळा मोझाईक व मूळकुंज रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे सोयाबीन पीक पूर्णतः पिवळे पडत आहे. पिके वाळत चालली आहेत. सध्या सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे व या रोगांच्या प्रादुर्भावाने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. या किडीचा प्रभाव कसा असतो व त्यावर उपाययोजना काय, याबद्दलची माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली. पण आता हे सर्व उपाय ‘सपशेल’ फोल ठरले आहेत, असे या भागातील शेतकऱ्यांना वाटत आहे.
कसा असतो ‘येलो मोझॅक’ व्हायरस?
सुरुवातीला कोवळ्या पानांवर सौम्य विखुरलेले पिवळ्या रंगाचे डाग दिसतात. डाग हळूहळू आकारात वाढतात आणि शेवटी काही पाने पूर्णपणे पिवळी होतात. संक्रमित पानेदेखील ‘नेक्रोटिक’ लक्षणे दर्शवितात. रोगग्रस्त झाडे उधळली जातात. झाडे उशिरा प्रौढ होतात आणि फारच कमी फुले व शेंगा तयार करतात. फळ आकाराने कमी केले जातात आणि पिवळ्या रंगाचे होतात. यामुळे पीक होत नाही.
जुळवाजुळव करून पेरणी केली, हाती काय आले?
खापा: परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून कधी रिमझिम तर कधी मुसळधार पावसामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरातील भेंडाळा, खापा, वाकोडी, कोदेगाव आदी परिसरातील सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याने पैशाची जुळवाजुळव करून सोयाबीनची पेरणी केले. पण पीक हातात येण्याच्या आधीच पिकांची नासाडी होत असल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कृषी विभागाने या परिसराची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भेंडाळा येथील किरण मुसळे, माणिक धुर्वे, विलास ठाकरे तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
अधिक वाचाः व्वा रे कोरोना... आयटीआयच्या 20 हजार विद्यार्थ्यांवर आणली ही वेळ…
कृषी विभाग करतो काय?
पचखेडीः कुही तालुक्यात सोयाबीन पिकावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होऊन पिकाचे फार नुकसान होत आहे. जे पीक निरोगी दिसत आहे, त्या एकेका झाडाला दहा ते बाराच शेंगा दिसून येत आहे. त्यामुळे कृषी विभागाने पाहणी करून तात्काळ या रोगाची दखल घ्यावी, अशी मागणी जि.प.सदस्य बालू ठवकर यांनी केली आहे.
शासनाने नुकसानभरपाई द्यावी !
सोयाबीन पिकाच्या बाबतीत दरवर्षी हे संकट येते. शेतकरी ठगला जातो. तरी पण यावर इतक्या कृषी विद्यापीठ असतानादेखील काही संशोधन न होणे हाच खरा संशोधनाचा विषय आहे. शेतकरी बिचारा आपल्या जवळचे सर्वकाही पिकासाठी खर्च करतो, पण त्याच्या हाती काहीच येत नसेल तर त्याची परिस्थिती न विचारलेली बरी. आता तरी ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला असेल त्याला पिकविमा शासनाने मिळून द्यावा.
दिलीप काळमेघ,
शेतकरी, जामगावसाठ हजार खर्च आला, पण पाण्यात गेला
सहा एकरात सोयाबीनची पेरणी केली होती. फुल येईपर्यंत पीक चांगले होते. यामुळे त्यावर खर्च ही केला. आतापर्यंत ६० हजार रुपये खर्च झाले. पण अचानकच पीक पिवळे पडण्यास सुरुवात झाली. यानंतरदेखील ते वाचावे म्हणून फवारणी करण्यात आली. पण
काहीच उपयोग झाला नाही व आता यात गुरे चरण्यासाठी सोडण्यात आली आहे. पिकविमा काढण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असतानादेखील ‘साईट’ २९ जुलैलाच बंद पडल्यामुळे पिकविमा देखील काढता आला नाही.
राजेंद्र माळोदे
शेतकरी, पेठ मुक्तापूरपुन्हा पाहणी करणार
बहुतेक ठिकाणी सोयाबीन पीक पिवळे पडले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही, हे खरे आहे. यासाठी सर्वेक्षण देखील सुरु करण्यात आले आहे. कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पाहणी केली आहे व ते पुन्हा पाहणी करण्यासाठी तालुक्यात येणार आहेत. हा पिवळा मोझाईक व मूळकुंज रोगांचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी शास्त्रज्ञ यांचा निष्कर्ष आहे.
डॉ.योगीराज जुमडे
तालुका कृषी अधिकारी, नरखेड
संपादन : विजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.