नागपूर : कोरोना आजाराच्या प्रादूर्भावाच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तींनी परिपत्रक काढून न्यायालयीन कामकाजाबाबत उपाययोजना आखण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, उच्च न्यायालयाचे आणि जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाम आता दोन तास चालेल. न्यायालयीन कामकाज थांबविण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ असल्याची माहिती न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी "दै. सकाळ'ला दिली.
जगभरामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला असतानाच भारतातसुद्धा त्याचा प्रादूर्भाव वाढत आहे. पुढील दोन आठवडे या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. राज्यातील नागपूरसह, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, यवतमाळ, रायगड या शहरांमध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसह राज्य शासनाने सूचना जारी करीत अनेक निर्बंध आणले. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी परिपत्रक काढत न्यायालयीन कामकाजात मुख्य प्रकरणावरच सुनावणी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आजपासून उच्च न्यायालयाचे दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि जिल्हा न्यायालयाचे दुपारी 11 ते 2 वाजेपर्यंत कामकाज चालले.
जिल्हा न्यायालयामध्ये नागपूर जिल्हासह शहरातील विविध 31 पोलीस ठाण्याचे प्रकरणावर सुनावणी होते. तर, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विदर्भातील नागपूरसह अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, वाशीम या 11 शहरांतील विविध फौजदारी प्रकरणी आणि जनहित याचिकांवर सुनावणी होते. तसेच नागपूर खंडपीठात दोन हजारांपेक्षा जास्त वकील आपला वकिली व्यवसाय करीत असून, दररोज अनेक पक्षकारदेखील सुनावणीदरम्यान उपस्थित राहतात.
त्यामुळे सहाजिकच संपूर्ण परिसरात गर्दी पहायला मिळते.
मात्र, सोमवारपासून संपूर्ण चित्र याच्या उलट पाहायला मिळत आहे. महत्त्वाच्या प्रकरणांवरच सुनावणी असल्यामुळे नेहमी वकिलांच्या उपस्थितीने गजबजलेल्या बार रूम पूर्ण रिकाम्या दिसत आहेत. तर, सूचनेनुसार पोलिस प्रशासनाने पक्षकारांना उच्च न्यायालयाच्या परिसरात प्रवेशबंदी केली आहे.
प्रशासनाचे योग्य पाऊल
मी नागपूर शहरामध्ये 1968 सालापासून वकिली व्यवसाय सुरू केला. त्यावेळेपासून मी या क्षेत्रात आहे. 31 मार्चपर्यंतचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. इतक्या वेगाने पसरणारा विषाणू यापूर्वी कधीही आला नव्हता. न्यायालयाचे कामकाज थांबविल्याची इतिहासातील पहिलीच वेळ आहे. कोरोनाच्या दृष्टीने प्रशासन योग्य पाउल उचलत आहे.
विकास सिरपूरकर, माजी न्यायमूर्ती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.