Goldsmiths have to starve due to lockdown
Goldsmiths have to starve due to lockdown 
नागपूर

टाळेबंदीमुळे सराफा व्यवसाय ठप्प, कारागिरांवर उपासमारीची वेळ 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाने सगळेच व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सराफा व्यापाऱ्यांसह सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिरांसाठी मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने अच्छे दिन घेऊन येतात. सोनेरी दिवसातील तब्बल 50 दिवसांच्या टाळेबंदीमुळे सोन्यावर नक्षीकाम करणाऱ्या जिल्ह्यातील 20 हजार कारागिरांवर बेरोजगारीची संक्रांत आली. त्यामुळे परिवाराचा गाडा कसा चालवायचा असा गंभीर प्रश्‍न उभा ठाकला आहे. 

नागपूर मध्य भारतातील सराफांची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. गलाई, गठाई, डाय कटिंग करणाऱ्यांसह सोन्याचे दागिने तयार करणारे जवळपास 20 हजारांपेक्षा अधिक कारागीर शहरात आहेत. यातील बहुतांश कारागीर मूळचे पश्‍चिम बंगालचे तर गलाई आणि गठाई करणारे कोल्हापूर व सोलापूरचे आहेत. सर्व कारागीर विखुरले असून शहरात राहूनच कुटुंबाचे पालनपोषण करतात. तीन महिन्यांच्या सीझनसाठी कारागिरांचे जानेवारीपासूनच काम सुरू होते. पण, टाळेबंदीमुळे त्यांना कामच मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. 100 टक्के काम बंद झाल्याने परिवाराचा गाडा आता कसा हाकायचा असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. 
त्यांच्या हाताला कामच नसल्याने त्यांना मदत करण्यास प्रारंभी काही प्रमाणात व्यापारी आणि सामाजिक संस्था पुढे आल्यात. त्या त्यांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करीत आहेत. पण, ही मदत आता किती दिवस मिळणार, हा गंभीर प्रश्न आहे. स्वाभिमानाने जगणाऱ्या कामगारांवर हातात कामच नसल्याने पुढे काय करायचे, याची चिंता सतावत आहे. 
कारागिरांच्या हातात रोख रक्कम नसल्याने औषध उपचार आणि आवश्‍यक वस्तूंची खरेदी करणे शक्‍य नाही. कारागीर संघटित नसल्याने सरकारकडून मदतही मिळणार नाही. या कारागिरांना नवयुवक सराफा असोसिएशनच्या माध्यमातून धान्यांची किट वाटप करण्यात आले आहे. त्याच्याजवळील किटही आता संपल्या असल्या तरी कारागिरांना मदत करण्यासाठी असोसिएशनने कंबर कसली आहे, असे असोसिएशनचे संस्थापक सदस्य राजेश दाभाडे यांनी सकाळला सांगितले. 
लग्नसराईसाठी सराफा व्यापारी सज्ज झाले होते. साडेतीन मुहूर्तापैकी असलेला गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे दोन्ही महत्त्वाचे दिवसही टाळेबंदीमुळे वाया गेले. परिणामी यंदाच्या मोसमात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अक्षय तृतीयेला काही व्यापाऱ्यांनी ऑनलाइन व्यवहार केले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला असला तरी त्यात उत्साह नव्हता. टाळेबंदीमुळे व्यवसायाची साखळी तुटली आहे. नागपूर जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा जास्त छोट्या सराफा व्यावसायिकांवरही आर्थिक संकट आले आहे. त्यातील अनेकजण कारागीर आहेत. लग्नसराई नसल्याने दागिन्यांचे ऑर्डरच बंद आहेत. 

कलाकुसरीत हातखंडा 

चपलाकंठी, बांगड्या, अष्टपैलू पाटल्या, बदामी अंगठ्या, नथ, कंठी मंगळसूत्र, डोरले आदींच्या निर्मितीत नागपुरातील कारागिरांचा हातखंडा आहे. जेवढे काम करेल, तेवढीच कारागिरी त्यांना मिळत असते. टाळेबंदीमुळे संपूर्ण खरेदीचा सीझनच थांबल्याने कुणाकडेही काम नाही. त्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. मात्र, संघटित नसल्याने मदत कशी मिळेल असाही त्यांचा सवाल आहे. त्यामुळे कलाकुसरीत कौशल्य मिळविलेल्या कारागिरांसमोर आर्थिक, सामाजिक अशा दोन्हीच्या अडचणीत ते सापडले आहेत. 
टाळेबंदीमुळे सोन्याचे दागिने तयार करणारे कारागीर आर्थिक संकटात सापडले आहेत. देशस्तरावरील संघटना जेम्स आणि ज्वेलरीतर्फे त्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. कारागिरांचे आधार कार्ड घेऊन मुंबई कार्यालयाला पाठवून त्यांच्या खात्यात 1500 रुपयांची रोख रक्कम दिली जात आहे. या माध्यमातून शहरातील अधिकाधिक कारागिरांना मदत करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत देशातील हजारो कारागिरांना आर्थिक मदत केली असून ती सहा कोटी रुपयांची मदत केली आहे. 
राजेश रोकडे, संचालक, जेम्स ऍण्ड ज्वेलरी असोसिएशन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT