नागपूर : निव्वळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने खेळाडू घडविणारे प्रशिक्षक नागपूर व विदर्भात जागोजागी पाहायला मिळतात. मात्र, पैशाचा हव्यास न बाळगता प्रामाणिकपणे खेळाडू घडावा, अशी भावना क्वचितच प्रशिक्षकांमध्ये दिसून येते. आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स प्रशिक्षक रवींद्र टोंग (coach ravindra tong) त्यापैकीच एक. त्यांनी पैशाच्या मागे न धावता सकाळ-संध्याकाळ मैदानावर मेहनत घेऊन असंख्य उत्तम खेळाडू तयार केले. उल्लेखनीय म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमजोर अनेक खेळाडूंना त्यांनी नेहमीच मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकीही जपली आहे. (Guru Purnima 2021 ravindra tong give training to players from own money in nagpur)
वसंतनगर, जुना बाबुळखेळा परिसरात राहणारे रवींद्र यांनी उमेदीच्या काळात राज्य व राष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून देशभरातील मैदाने गाजविली. अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेल्या रवींद्र यांनी राष्ट्रीय स्तरावर छाप सोडली. मात्र ‘टॅलेंट’ असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाकडून खेळण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी पोहोचू शकलो नसलो तरी, भविष्यात एकदिवस नक्कीच ऑलिंपिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवेन, असा मनाशी निर्धार करीत त्यांनी खेळाडू घडवायला सुरवात केली. त्यांच्या तालमीत घडलेल्या निकिता राऊतने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेऊन आपल्या गुरूचा शब्द खरा करून दाखविला. आता आपल्या शिष्याने आशियाई किंवा ऑलिम्पिकमध्ये देशाला नावलौकिक मिळवून द्यावा, ही एकच त्यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांचा सध्या खटाटोप सुरू आहे.
४५ वर्षीय रवींद्र टोंग हे गरिबीतून वर आले आहेत. १४ वर्षांचे असताना वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्यानंतर कठीण परिस्थितीत शिक्षणासोबत कॅटरिंगचा व्यवसाय, रिक्षा चालविणे व दगडमातीची कामे करून त्यांनी आईला आर्थिक हातभार लावला. त्यामुळे गरिबी त्यांनी जवळून पाहिली आणि अनुभवली आहे. खेळाडूंच्या परिस्थितीची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच ते अनेक गोरगरीब खेळाडूंना सढळ हाताने आर्थिक मदत करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावत आहेत. नाममात्र शुल्क आकारून किंवा गरीब खेळाडूंना निःशुल्क प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांचा डाएट व शैक्षणिक खर्च ते स्वतःच्या खिशातून करीत आहेत. सध्या नागपूर ग्रामीण पोलिसमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या टोंग यांनी गोरगरीब खेळाडूंसह आर्मी, पोलिस, वन विभाग व होमगार्ड्सलाही प्रशिक्षण दिले आहे.
मैदानी स्पर्धांमध्ये 'ट्रॅकस्टार'चा जलवा -
स्पोर्ट्स कोट्यातून पोलिस विभागात नोकरीला लागलेले व सध्या नागपूर ग्रामीण पोलिसमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या टोंग यांनी २००८ मध्ये ट्रॅकस्टार क्लबची सूत्रे हाती घेतल्यानंतर क्लबने गरुडझेप घेतली. अवघ्या चार मुलांपासून सुरुवात झालेल्या या क्लबमध्ये आजच्या घडीला निकिता, विक्रम बंगेरिया, शादाब पठाण, शीतल भगत, ऋतुजा शेंडे, उत्कर्षा लेंडे, प्राची गोडबोलेसह ७० च्या वर युवा खेळाडू नियमित ‘प्रॅक्टिस’ करीत आहेत. अनेक खेळाडूंनी मैदानी स्पर्धा गाजवून क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यामुळेच आज ट्रॅकस्टारची शहरातील आघाडीच्या क्लबमध्ये गणना होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.