file photo 
नागपूर

काय म्हणताय, चार महिन्यांपासून घुंगरांची छनछनच बंद! 

नरेंद्र चोरे

नागपूर : त्याने कुटुंबीय व समाजाची पर्वा न करता पायात घुंगरू बांधले. लावणीसारखी बायकी कला आत्मसात केली. या कलेच्या भरवश्‍यावर संपूर्ण महाराष्ट्रात अफाट लोकप्रियता मिळविली. लोप पावत चाललेल्या या लोककलेला विदर्भातच नव्हे, राज्यभर नवी ओळख करुन दिली. मात्र कोरोना आला आणि त्याच्या सर्व आशेवर पाणी फिरले. लॉकडाउनमुळे गेल्या चार-पाच महिन्यांपासून घुंगरांची छनछनच पूर्णपणे बंद झाल्याने अनेक लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. 


ही कहाणी आहे अमरावती येथील प्रख्यात लावणी कलावंत व अभिनेता स्वप्नील विधाते व त्याच्या सहकलावंतांची. 29 वर्षीय स्वप्नीलचा "मदमस्त गुलछडी' नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये 10 ते 12 मुली व 7-8 मुले आहेत. छोट्यामोठ्या गावांसह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांमध्ये स्वप्नीलचे शो होतात. लावणीच्या कार्यक्रमांवरच बहूतेकांचा उदरनिर्वाह सुरू आहे. कोरोनापूर्वी कार्यक्रमांची रेलचेल असल्यामुळे बक्‍कळ पैसा येत होता. सीझनमध्ये महिन्याला प्रत्येक कलावंत दीड ते दोन लाख रुपये सहज कमवायचा. मात्र लॉकडाउन लागल्यापासून कमाईच बंद झाली. चैत्राच्या महिन्यात स्वप्नीलचा ग्रुप बारामती व पुणे दौऱ्यावर जाणार होता. सर्वांनी जय्यत तयारी केली होती. या परिसरात तब्बल 45 दिवसांचे कार्यक्रम बुक होते. दुर्दैवाने सर्व शो रद्‌द करण्यात आले. चैत्र महिन्यात तिथे मोठी जत्रा व यात्रा असते. दिवसाला दोन भरगच्च शो चालतात. लग्नाचा हंगाम कमाईविनाच गेला आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता गणपती व नवरात्रोत्सवावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोनामुळे गोंधळ, जागरण, लावणीसह सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम सध्या बंद आहेत. 


स्वप्नीलचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. शो करण्यासंदर्भात ते सारखे फोन करीत असतात. मात्र जमावबंदीमुळे आपण त्यांची मागणी पूर्ण करू शकत नसल्याचे स्वप्नीलने सांगितले. लॉकडाउनपासून स्वप्नील व त्याचे अन्य सहकारी कलावंत घरीच सराव करीत आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. दुसरे काम ते करू शकत नाही. जवळच्या जमापुंजीने कसेबसे दिवस काढलेत. यापुढे उदरनिर्वाह कसा करायचा, असा त्यांना प्रश्‍न पडला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता आता पोटासाठी ते दुसऱ्या रोजगाराच्या शोधात आहेत. सरकारने अनेक दुकानांना परवानगी दिलेली आहे. काही प्रमाणात शुटिंगही सुरू झाले. त्यामुळे "सोशल डिस्टन्सिंग'च्या अटीवर सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी मिळावी, अशी अपेक्षा त्याने व्यक्‍त केली. लावण्यांच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी राहात असली तरी, आयोजक आवश्‍यक काळजी घेऊ शकतात. महाराष्ट्र गौरव पुरस्कारविजेता स्वप्नील वयाच्या 14 व्या वर्षांपासून लावणी करतोय. स्वप्नीलचे वडील पहेलवान असून, शेती करतात. मात्र त्यांचा विरोध झुगारून स्वप्नीलने लावणी ही कला आत्मसात केली. पोराने नाव कमावल्याने आता त्याचे आईलवडिलही खुश आहेत. 


शासनाकडून मदतीची अपेक्षा 


लॉकडाउन लागल्यापासून स्वप्नील व त्याचे सहकारी सध्या घरीच आहेत. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या अडचणीच्या प्रसंगी त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. लावणीसारख्या पारंपरिक लोककलेची जपणूक करणाऱ्या कलावंतांना आर्थिक सहकार्य करावे, अशी त्याने यानिमित्ताने शासनाकडे मागणी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT