जयश्री हेमंत कविमंडन
आज संपूर्ण देशावर भारतीय संस्कृतीचा पगडा आहे. पण, या स्वातंत्र्यसंग्रामात कित्येक वीरपुरुषांनी आहुती दिली. त्यातील महत्त्वपूर्ण आहुती म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. २८ मे रोजी जन्मलेल्या सावरकरांच्या काव्यातून वीरश्री पाझरते. जाणून घेऊया त्याविषयी...
सावरकरांची काव्यवृत्ती नैसर्गिक होती, हे निर्विवाद सत्य असले तरी ती असामान्य कोटीतील होती. वयाच्या आठव्या वर्षी कवितेची धुळपाटी सावरकरांनी हाती घेतली आणि दहाव्या वर्षाच्या आधीच तिच्यावर कवितेची धुळाक्षरे त्यांनी गिरवली. मूळची काव्यवृत्ती आणि काव्यलेखनासाठी मिळालेला प्रदीर्घ काळ यांचा समन्वय साधला तर त्यांनी आपला काव्यप्रपंच प्रचंड प्रमाणावर मांडावयास हवा होता. तसा तो मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु परिस्थितीने प्रबळ झालेल्या त्यांच्यातील राजकारणी पुरुषाने त्यांच्यातील कवीवर मात केली आणि दहा ते अकरा हजार ओळींपेक्षा जास्त काव्यलेखन ते करू शकले नाही.
सावरकरांचे चरित्र मूलतःच काही आकस्मिक असल्याने त्यांच्या कवितेवर ती झळाळी उतरलेली आहे. मग ती देवघरात तथाकथित दैवी सामर्थ्य संचारून कविमुखातून बाहेर पडलेली असो की, चाफेकर-रानडे यांच्या हौतात्म्याने गहिवरून ती अश्रूंनी चिंब भिजलेली असो, ती समुद्रमार्गात लिहिलेली असो, अंदमानाच्या तुरुंगातील दगडावर सुंदर शिल्पासारखी ती कोरली गेली असो. त्यामुळे सावरकरांची कविता खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाची सहचारी झाली होती. सावरकरांच्या व्यक्तित्त्वातील ज्या तीन प्रमुख तत्त्वांवर त्यांची काव्यसृष्टी विकसित झाली त्या निष्ठा म्हणजे स्वातंत्र्यनिष्ठा, देशनिष्ठा आणि हिंदुत्वनिष्ठा. हीच स्वातंत्र्यनिष्ठा उरी बाळगून ते स्वतंत्रतेचे स्तोत्र गातात.
तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधी देशील वरदे?
अशा या मायभूमीच्या उद्धाराच्या विचारातून त्यांच्या कविता स्फुरण पावतात. ‘सागरा प्राण तळमळला’ कवितेत त्यांची उत्कट देशभक्ती ओसंडून वाहताना दिसते. ‘गोमांतकात’ कोकण प्रदेशाला कशी टवटवी आली आणि हिंदूंच्या विजयाचे चौघडे अटकेपार कसे वाजले याचे वीरश्रीयुक्त वर्णन आढळून येते. बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ सावरकरांची मतप्रणाली त्यांच्या कवितेतही बदलत नाही. ‘प्राण्यांचे रक्षण करतो तोही देवच आणि त्यांचे भक्षण करतो तोही देवच’. गोमांतक काव्यात सृष्टीचे वर्णन याच स्वरूपात आढळते.
‘ना! कविता निजभक्ता त्यागिना कधी
भक्त तिला त्यागो, ती त्यागिना तया’
विशिष्ट रंगाची काच सप्तरंगात्मक प्रकाशातील विशिष्ट रंगच जसा शोषून घेते तशीच पद्धती सावरकरांची विविध अनुभूती घेण्यामध्ये येते. सावरकर म्हणजे भारतमातेच्या चरणी वाहिलेले दिव्य असे न सुकणारे सहस्त्रदली कमळ! ज्याचा प्रत्येक दल पीयूषाची खाण आहे. अशा स्वातंत्र्यवीराला शतशः प्रणिपात!
-मो. ७७९८७८९८८८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.