नागपूर ः गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज बाधितांच्या संख्येत किंचित घट झाली असतानाच कोरोनाबळींची संख्या मात्र वाढत आहे. गेल्या २४ तासात ३५ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा, महापालिका हादरली. विशेष म्हणजे सर्वाधिक २३ बळी शहरातील असल्याने नागपूरकरांचीही झोप उडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आज ३ हजार २३२ बाधितांची नोंद करण्यात आली असून शहरातील मेडिकल, मेयोसह खाजगी रुग्णालयांसह ग्रामीण भागातही रुग्णालयांतही उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
लॉकडाउननंतरही सातत्याने बाधित अन् कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा, महापालिका, जिल्हा प्रशासन चिंतेत सापडले आहे. जिल्ह्यात आज बळींच्या संख्येने मागील काही महिन्यांतील उच्चांक नोंदविला. गेल्या २४ तासांमध्ये ३५ बळींची नोंद करण्यात आली. यात शहरातील २३ जणांचा तर ग्रामीणमधील ९ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्याबाहेरील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे बळींची एकूण संख्या ४ हजार ५६३ पर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे यात शहरातील बळींची संख्या तीन हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरातील एकूण २ हजार ९३१ जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले. ग्रामीणमध्ये ८२१ तर जिल्ह्याबाहेरील ८११ जण कोरोनाचे बळी ठरले. गेली दोन दिवस शहरात तीन हजारांवर बाधित आढळून आले. या दोन दिवसांच्या तुलनेत आज बाधितांच्या संख्येत किंचित घट झाली असली तरी आजही बाधितांचा आलेख ३ हजार २३५ वर पोहोचला. यात शहरातील २ हजार ५२४ तर ग्रामीण भागातील ७०८ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्याबाहेरील तिघे बाधित आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या १ लाख ८५ हजार ७८७ पर्यंत पोहोचली. या शहरातील बाधितांची संख्या १ लाख ४८ हजार २७६ वर पोहोचली असून उद्या दीड लाख पार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागातील बाधितांची एकूण संख्या ३६ हजार ५१८ पर्यंत पोहोचली. जिल्ह्याबाहेरील बाधितांची संख्या ९९३ पर्यंत पोहोचली. दरम्यान, १६ हजार ६६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
या चाचण्याचा अहवाल आज आला. यातून ३ हजार २३५ बाधित आढळून आले. दरम्यान, सक्रीय रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. आज २५ हजार ५६९ सक्रीय रुग्ण असून यातील सहा हजार ४६१ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. १९ हजारावर रुग्ण अद्यापही गृह विलगीकरणात असून अनेकजण बाहेर फिरत असल्याने कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बरे होणाऱ्यांच्या दरात घसरण कायम
जिल्ह्यात आज १ हजार २४५ बाधित कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ५५ हजार ६५५ पर्यंत पोहोचली. परंतु कोरोनातून बरे होणाऱ्यांचा दर कायम घसरत असल्याचे दिसून येत आहे. काल, गुरुवारी बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
महिनाभरात तीनशेवर मृत्यू
मागील १९ फेब्रुवारीला एकूण मृत्यूची संख्या ४ हजार २६१ होती. यात गेल्या महिनाभरात ३०२ बळींची भर पडली. याशिवाय बाधितांच्या संख्येत महिनाभरात ४४ हजारांनी वाढ झाली. १९ फेब्रुवारीला एकूण बाधितांची संख्या १ लाख ४१ हजार ७८२ होती. आज बाधितांची एकूण संख्या १ लाख ८५ हजार ७८७ पर्यंत पोहोचली.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.