नागपूर : केंद्र सरकारने कोरोना संसर्गामुळे विविध कार्यक्रमांवर घातलेली बंधने काही अंशी उठविली असून, गृह मंत्रालयातर्फे शनिवारी 'अनलॉक-4' चे नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. यात 21 सप्टेंबरपासून 'सोशल डिस्टनसिंग'च्या अटींवर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज'ला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पाच महिन्यांपासून बंद असलेला खेळाडूंचा सराव सुरू होण्याची शक्यता बळावल्याने शहरातील मैदाने गजबजणार आहेत.
मार्च महिन्यात लॉकडाउन लागल्यापासून शहरातील सर्व खेळाडू आपापल्या घरांमध्ये बंदिस्त झाले आहेत. या काळात स्पर्धा तर बंद आहेच, शिवाय खेळाडूंचा सरावही खंडित झाला आहे. पाच महिन्यांपासून चार भिंतीच्या आड असल्यामुळे खेळाडूंमध्ये नैराश्य व चिडचिडपणा वाढला आहे. दरम्यानच्या काळात एकेक 'ऍक्टिव्हिटी' सुरू होत असताना खेळांना अद्याप हिरवी झेंडी मिळाली नाही. उशिरा का होईना गृह मंत्रालयाने 21 सप्टेंबरपासून खेळांसाठी परवानगी दिल्यामुळे आता नागपूरकरांच्या आशा वाढल्या आहेत. केंद्राने दिशानिर्देश जारी केले असले तरी यासंदर्भातील अंतिम निर्णय राज्य सरकारच घेणार आहे. राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला तरच खेळाडू मैदानावर सराव करू शकतील.
केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना राष्ट्रीय अॅथलेटिक्स प्रशिक्षक रवींद्र टोंग म्हणाले, 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज' सुरू करण्यासंदर्भात घेतलेला निर्णय खूप चांगला आहे. त्यामुळे खेळाडूंना फार मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ते घरांमध्ये कोंडलेले आहेत. जमावबंदी असल्यामुळे या दिवसांत ते सरावासाठी मैदानावर जाऊ शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी फिटनेसच्या दृष्टीकोणातून आम्हाला निवडक खेळाडूंकडून छोट्या छोट्या बॅचेसमध्ये ग्रामीण भागांमध्ये हलका सराव सराव करवून घ्यावा लागला. आता शहरातील मैदानांवर त्यांना दर्जेदार सराव करता येईल. बॅडमिंटन प्रशिक्षक अमित राऊत यांनीही निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, सरकारने खेळांना परवानगी दिली खूप चांगले झाले. खेळाडूंची अवस्था लक्षात घेता हे आवश्यक होते. सरकार आऊटडोअरसोबतच इनडोअर गेमलाही परवानगी देईल अशी आशा आहे. काही दिवसांपूर्वी बॅडमिंटन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण त्यात आऊटडोअर बॅडमिंटन असा शब्द वापरल्याने संभ्रमाचे वातावरण होते. यावेळी तसे काहीही होणार नाही, अशी राज्य सरकारकडून आशा आहे.
आयुक्तांची घेणार भेट
शहरातील निवडक बॅडमिंटन प्रशिक्षकांनी काही दिवसांपूर्वी इनडोअर गेम सुरू करण्याविषयी मनपाला निवेदन दिले होते. यासंदर्भातील अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर अजून निर्णय झाला नाही. नवे आयुक्त राधाकृष्णन बी. यांचीही ते लवकरच भेट घेणार असल्याची माहिती अमित राऊत यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.