नागपूर : विदर्भातील (Vidarbha) घामफोड उन्हाळ्याची चर्चा केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर होते. दरवर्षी पारा ४६-४७ अंशांवर जातो. मात्र, यंदा ही परंपरा खंडित झाली आहे. उन्हाळा संपत आला तरीही पाऱ्याने पंचेचाळिशी गाठली नाही. ठिकठिकाणी नियमितपणे तयार होत असलेल्या 'सिस्टिम्स'मुळे यावर्षी विदर्भात अपेक्षेप्रमाणे कडक ऊन तापले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (temperature decreasing even in summer due to global warming in vidarbha region)
गेल्या काही वर्षांतील विदर्भातील हवामानाच्या इतिहासावर नजर टाकल्यास येथील कमाल तापमान नेहमीच ४५ ते ४७ च्यादरम्यान राहिले आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऱ्याने ४८ डिग्रीपर्यंतदेखील उसळी घेतल्याचा वैदर्भीयांनी अनुभव घेतलेला आहे. मात्र, यंदा आतापर्यंत तरी उन्हाचा तडाखा जाणवलेला नाही. उन्हाळा संपत आला आणि पावसाळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला तरीही तापमान ४४ अंशांच्या वर गेले नाही. २८ एप्रिल रोजी नागपूरचा पारा ४३.१ अंशांवर गेला होता. त्यानंतर एकदाही उन्हाची लाट आली नाही.
यासंदर्भात प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले, यावर्षी अधूनमधून 'सिस्टिम्स' किंवा कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने विदर्भात फारशा उष्णलाटा बनल्या नाहीत. कोरडे वातावरण असले तरच तापमान वाढते. दुर्दैवाने ते चित्र यावेळी दिसून आले नाही. मात्र, लवकरच नवतपा सुरू होत असल्याने पुढील आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु, त्याचवेळी २५-२६ मेच्या आसपास पुन्हा बंगालच्या उपसागरात 'यास' नावाचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने विदर्भातील उष्णलाटेवर परिणाम होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे ऋतुचक्र बदलत चालल्याचेही ते म्हणाले.
मॉन्सूनवर परिणाम होणार नाही -
विदर्भात यावेळी अपेक्षेप्रमाणे ऊन तापले नसले तरी त्याचा आगामी मॉन्सूनवर विपरित परिणाम होणार नसल्याचेही साहू यांनी यावेळी स्पष्ट केले. साहू यांच्या मते, मॉन्सूनचा पाऊस विदर्भ किंवा अन्य ठिकाणच्या उन्हाळ्यावर अवलंबून राहात नाही. भारतातील एकूण वातावरणाशी त्याचा संबंध असतो. भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच यंदा देशभर चांगला पाऊस राहणार असल्याचे भाकित वर्तविले आहे. त्यामुळे विदर्भातही सर्वसाधारण पाऊस राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आठ वर्षांपूर्वी चंद्रपूर होते ४८ डिग्रीवर
विदर्भातील तापमानाने आतापर्यंत अनेकवेळा देशात नवनवे उच्चांक नोंदविले आहे. आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २२ मे २०१३ रोजी चंद्रपूरचा पारा तब्बल ४८ डिग्रीवर गेला होता. विदर्भाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील तो सर्वात उष्ण दिवस ठरला. त्याच्या एक दिवसानंतर (२३ मे रोजी) नागपुरातही कमाल तापमानाने ४७.९ अंशांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.
दशकातील नागपूरचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
वर्ष तापमान
२०११ ४४.८
२०१२ ४६.९
२०१३ ४७.९
२०१४ ४४.६
२०१५ ४७.१
२०१६ ४६.६
२०१७ ४६.२
२०१८ ४६.७
२०१९ ४५.७
२०२० ४७.०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.