नागपूर : लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. कोरोनाबद्दल लोकांमध्ये अस्वस्थता आहे, नैराश्य आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ज्या भागात कोरोनाचा जास्त प्रभाव तो भाग वगळता शहराच्या उर्वरित भागातील व्यवहार टप्प्याटप्प्याने व सुरक्षितपणे तसेच नियमांचे पालन करून सुरू करण्यात हरकत नसल्याचे मत केंद्रीय महामार्ग, परिवहन व लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
रविवारी वृत्तपत्रांच्या संपादकांशी गडकरी यांनी ऑनलाइन संवाद केला. त्या चर्चेत ते बोलत होते. यावेळी आलेल्या सूचनांचे स्वागत करून समाजाचे मनोबल उंचावेल आणि सकारात्मक विचार आणि वागणूक यातून आपण या संकटावर निश्चितपणे मात करू, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. महामार्ग वाहतूक आता सुरू झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू होणार आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे, असे सांगताना कोरोना या आपत्तीचा इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. ज्या वस्तू आपल्याला आवश्यक आहे, त्या आपल्या देशातच तयार कराव्या लागणार आहेत. आयात बंद करण्याची आवश्यकता आहे. देशात तीन वर्षे पुरतील एवढे गहू, तांदूळ आहेत. त्यामुळे पीक पद्धती बदलून तेलबियांकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे. इथेनॉल-मिथेनॉलसारखे इंधन ज्या पिकांमधून मिळू शकते त्या पिकांकडे वळले पाहिजे. यामुळेच आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनची बनू शकते असेही गडकरी म्हणाले.
कोरोनाची लढाई आणि चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांना आपण आकर्षित केले पाहिजे. त्यामुळे परकीय गुंतवणूक आपल्या देशात वाढणार आहे. विदर्भाला न्याय देण्यासाठी नवीन काम आपण करू शकतो. एक दुसऱ्यावर विश्वास करून सकारात्मक वागा. राजकारण करू नका. एकमेकांना सहकार्य करा. कोरोनाविरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे. वृत्तपत्रांनी अशा स्थितीत समाजाला दिशा दाखवली पाहिजे. आतापर्यंत मी 3 कोटी लोकांशी संवाद साधला आहे. हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येणारच आहे, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.