नागपूर : कोरोनाबाधित किंवा संशयितांवर उपचारासाठी मेडिकल आणि मेयोतील डॉक्टरांचा पुढाकार असतो. महापालिकेचा आरोग्य विभाग केवळ जनजागृती करतो, तर सार्वजनिक आरोग्य विभाग आकडेवारी गोळा करतो. अशावेळी कोरोना संशयितांवर उपचार करणाऱ्या मेडिकल, मेयोतील डॉक्टरांना पर्सनल प्रोटेक्शन किट पुरवण्याचे आश्वासन सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दिले होते. परंतु, किट देण्यात आरोग्य उपसंचालक कार्यालय नापास झाले. आश्वासनावर विसंबून असल्याने एचआयव्ही नियंत्रणासाठी असलेल्या "किट'चा वापर मेडिकलचे डॉक्टर करीत असल्याची माहिती उघडकीस आली.
स्वाइन फ्लू असो की, बर्ड फ्लू साथ आजारांवर मेडिकलचे डॉक्टर उपचार करतात. मात्र, दरवेळी या साथ आजारांच्या काळात सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री असो की, अधिकारी साहित्य पुरवठा करण्याचे आश्वासन देऊन मोकळे होतात. स्वाइन फ्लूचा प्रकोप झाल्यानंतर 2015 मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मेडिकलसाठी पीसीआर यंत्र खरेदी करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी आश्वासन पाळले नाही. याचवेळी मनपाने किमान एक व्हेंटिलेटर मेडिकलला उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु, तेही पोहोचले नाही. अलीकडे कोरोनाच्या संकटाची चाहूल लागली असताना मेडिकल, मेयोसह महापालिकेतील डॉक्टरांना उपचारादरम्यान आवश्यक पर्सनल प्रोटेक्शन किट पुरवण्याचे आश्वासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागपूर उपसंचालक कार्यालयातून दिले गेले, मात्र अद्याप या किट पोहोचल्या नाहीत. मात्र, कोरोना संशयितांची गर्दी वाढत असल्याने विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पर्सनल प्रोटेक्शन किट नसल्याने एचआयव्ही नियंत्रणासाठी आवश्यक किटचा वापर केला जात असल्याची माहिती सांगण्याची वेळ अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्यावर आली. ही माहिती सांगताना एचआयव्ही किट कोरोना संशयितांवर उपचारासाठी सक्षम असल्याचा दावा त्यांनी केला, हे विशेष.
स्वाइन फ्लूचा प्रकोप झाला त्यावेळी महापालिकेचा आरोग्य विभाग समन्वयाची भूमिका वठविण्यात नापास झाल्याचे वास्तव पुढे आल्यानंतर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिशय समंजस भूमिका घेत मागे होऊन गेले ते सोडून देऊ या असे सांगत कोरोनाचा पराभव करण्यासाठी आता नव्याने कामाला लागूया. हे सांगताना खासगी डॉक्टरांच्या आयएमएसह विविध संघटनांसह आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे सांगत मुंढे यांनी जी खासगी रुग्णालये दिलेले आदेश पाळणार नाही, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे सांगितले.
आयएमए या खासगी डॉक्टरांच्या संघटनेसोबत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बैठक घेतली. मात्र, या बैठकीचे निमंत्रण विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनला देण्यात आले नव्हते. विशेष असे की, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनशी संलग्न डॉक्टरांची मोठी खासगी रुग्णालये आहेत. त्यांच्याच संघटनेला नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने आयुक्तांच्या बैठकीत बोलावलेच नव्हते, ही माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.