सावनेर (जि.नागपूर) : आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे झळ पोहोचली. त्यातच आता कोरोनाचाही धसका बसला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच खचून गेला आहे. अशातच शेतात पडलेला माल तोडायचा कसा, बाजारात कसा आणायचा, आणि कसे जगायचे, असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना पडले आहेत. कोरोनाचे सावट हद्दपार झाल्यानंतर शासनाने आम्हा शेतकऱ्यांचा विचार करण्यासाठी शेतीविषयक धोरणाकडे विशेष लक्ष पुरवावे असे विचार शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शेतमाल व मजूर लॉकडाउनमध्ये; माल काढून विक्रीपर्यंत चिंताच
लॉकडाउनच्या स्थितीमुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी, मजूर व शेतीपूरक व्यावसायिक हैराण झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शेतमालाची खरेदी जरी सुरू झाली असली तरी बंद असल्यासारखी स्थिती आहे. जरी काही जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री सुरू असली तरी मात्र शेतीच्या कामावर मजुरांचा तुटवडा आहे. दळणवळणाची साधने नाहीत. बाजार व्यवस्था कोलमडली आहे. पडक्या भावाने मालाची विक्री करावी लागत आहे. फळे, फुले व भाजीपाला पिकांची नासाडी होत आहे.
खरीप हंगामाच्या तयारीचे काय?
टरबूज व खरबूज पिकांच्या मागणीत घट झालेली दिसत आहे. शेतीपूरक व्यवसाय डबघाईस आले आहेत. दूध, पोल्टीफार्म आदी व्यवसायाचे जबर नुकसान होत आहे. अनेकांच्या शेतात हरभरा, तूर, गहू आदी रब्बी पिकांचे ढिगारे अजूनही शेतात आहेत. ताडपत्रीच्या साहाय्याने झाकून ठेवलेले दिसत आहेत. मालाचे भाव वाढतील म्हणून वाट बघत राहणाऱ्या शेतकऱ्यांची तर निराशाच झाली आहे. गाव खेड्यातही कोरोनाच्या साथीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. असे असतानाही शेतकरी खरीप हंगामाची आस बाळगत आहेत.
मजुरांची वाणवा
बी बियाणे यांच्या वाढत्या किंमतीमुळे मशागतीपासून उत्पादनाच्या विक्रीपर्यंत येणारा खर्च वगळता बरेचदा आर्थिक बोजा सहन करावा लागतो. त्यातच कोरोनाचं सावट असल्याने शेतात माल तोडायला मजूरही मिळत नाही. यामुळे आमची चांगलीच फजिती झाली आहे.
संजय टेंबेकर
अल्पभूधारक शेतकरी
मालाला भाव मिळत नाही
नैसर्गिक आपत्तीमुळे शेती न परवडणारी झाल्याने परदेशासह देशांतर्गत फळ पिकाला मोठी मागणी असल्याने पिकांमध्ये बदल करून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोठ्या कष्टातून टरबूज व खरबूज पिकांची लागवड केली. शेतात पीक विक्रीला सज्ज झाले. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे यंदा पिकांना भाव मिळेल की नाही याची चिंता आहे.
कैलास नागरे
सधन शेतकरी
कोरोनाने लंबेच केले !
घरी अडचण असतानाही कपाशीचे भाव वाढेल, अशी आस असताना कोरोनाच्या स्थितीमुळे निराशाच झाली.
रोशन कुथे
अल्पभूधारक शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.