One and only Breeding center of ducks is in Gadchiroli
One and only Breeding center of ducks is in Gadchiroli  
विदर्भ

काय सांगता! इथे चक्क बदकं देताहेत अनेकांना रोजगार; राज्यातील एकमेव पैदास केंद्र

मिलिंद उमरे

गडचिरोली : जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले जात असताना गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्‍यातील बदक पैदास केंद्राच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण राज्यातील एकमेव बदक पैदास केंद्र आहे.

ग्रामीण भागात बदक पालनास चालना मिळण्याच्या दृष्टीने ८ ऑगस्ट १९८५ रोजी देसाईगंज येथे बदक पैदास प्रक्षेत्र स्थापन करण्यास मान्यता मिळाली. प्रक्षेत्राची आवश्‍यक ती बांधकामे पूर्ण होईपर्यंत या प्रक्षेत्राचे कामकाज ३० ऑगस्ट १९९३ पर्यंत नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामार्फत करण्यात येत होते. त्यानंतर वळू माता प्रक्षेत्राने विसोरामध्ये हस्तांतरित केलेल्या आठ हेक्‍टर जागेवर आता हे बदक पैदास केंद्र कार्यरत आहे. 

जैविक रोग नियंत्रणअंतर्गत मोठ्या जनावरांमधील पिन्नस रोग व चपट्या कृमींमुळे यकृतातील विविध रोगांवर नियंत्रण ठेवणे, सुधारित जातीची बदक पिल्ले निर्मिती व विक्री करणे, ग्रामीण भागांत बदक पालन व्यवसायास चालना व तांत्रिक मार्गदर्शन देणे, बदक पालन व्यवसायास शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणे या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे विशेषत: नागपूर विभागातील तलावांच्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून हे केंद्र सुरू करण्यात आले. 

सध्या येथे खाकी कॅम्पबेल प्रजातीचे ३०० नर व ५० मादी बदके आहेत. त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात अंडी मिळतात. ही अंडी १० रुपये प्रती नग विकली जातात. तसेच पिल्लू ३० रुपये प्रती नग विकले जाते. विशेष म्हणजे येथील अंडी व बदकांच्या पिल्लांना संपूर्ण महाराष्ट्रासह नजीकच्या छत्तीसगड राज्यातून मोठी मागणी आहे. 

अंडी उत्पादनाच्या दृष्टीने बदकांच्या ‘खाकी कॅम्पबेल’ व ‘इंडियन रनर’ या देशी जाती महत्त्वाच्या आहेत. मांस उत्पादनासाठी व्हाइट पंकिन (चीन), आयलसबरी (इंग्लंड) व रोअेन (फ्रांस) या विदेशी प्रजातीची बदके उपयुक्त आहेत. काही दिवसांत येथे व्हाइट पंकिन प्रजातीची बदकेही आणण्यात येणार आहेत. राज्यातील एकमेव असलेल्या या केंद्राचा विकास करून अधिकाधिक शेतकऱ्यांना बदक व्यवसायासाठी प्रवृत्त करण्याचा मानस येथील पशुविकास अधिकारी डॉ. सुकारे यांनी व्यक्त केला.

हे होते मुख्य कारण

राज्यात एका मोठ्या आकाराच्या विशिष्ट प्रकारच्या गोगलगायींमुळे जनावरांमधील आजार वाढले होते. या गोगलगायी दलदल, ओलसर जमीन व पाण्यात राहत असल्याने त्यांच्यावर कीटकनाशकाचा वापर करणे अशक्‍य झाले होते. पण बदके या गोगलगायी मोठ्या आवडीने खातात. म्हणून या उपद्रवी गोगलगायींवर बदकांमार्फत नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण आणण्यासाठी राज्यात हे केंद्र सुरू करण्यात आले. मात्र सुरवातीपासून लक्ष न दिल्याने या केंद्राचा म्हणावा तसा विकास झाला नाही. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT