Assembly Election 2024 sakal
विदर्भ

Assembly Election 2024 : तुतारी फुंकण्यास अनेकजण तत्पर...संधी मिळणार कुणाला? पक्षाने सर्वांनाच ठेवले आशेवर

Assembly Election 2024 : अहेरी विधानसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असून, पक्षाने सर्वांनाच आशेवर ठेवले आहे. पुढील काही दिवसांत कोणाला संधी मिळेल, याची उत्सुकता वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्यात तीन विधानसभा असल्या तरी अहेरी विधानसभा सर्वाधिक चर्चेत असून येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची तुतारी फुंकण्यासाठी अनेकजण तत्पर दिसून येत आहेत. या पक्षानेही सर्वांनाच आशेवर ठेवले असून ही तुतारी फुंकण्याची संधी कुणाला मिळेल हे कळायला आणखी काही दिवस लागणार आहेत.

विभाजित होण्यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागील निवडणुकीत विद्यमान मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम निवडून आले होते. मात्र आता ते अजित पवारांसोबत भाजपच्या महायुतीत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष संघाच्या तालमीत वाढलेले आणि भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे संदीप कोरेत यांना गळी लावण्याच्या तयारीत होते.

या पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार संदीप कोरेत यांच्या उमेदवारीचे आणि प्रचाराचेही नियोजन करत होते. एवढ्यात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी आपल्या वडिलांशीच उभा राजकीय दावा मांडत तुतारी फुंकण्याची तयारी दर्शवली. खरेतर मंत्री आत्राम यांची कन्या आणि जावई सिल्वर ओकच्या चकरा मारत असल्याची चर्चा फार पूर्वीपासूनच सुरू होती.

अखेर एका मेळाव्यात मंत्री आत्राम यांनीच आपल्या लेकीचा आणि जावयाचा डाव उघडकीस आणत त्यांना थेट नदीतच बुडवायचे आवाहन जनतेला केले. त्यानंतर कन्या भाग्यश्री आत्राम यांनी उघड बंड करत मोठा मेळावा घेत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला. यावेळी आपल्या वडिलांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही त्यांनी खडेबोल सुनावले. माझे वडील शेर, तर मी त्यांचीच कन्या असल्याने शेरणी आहे, असे सांगत आपण आक्रमकपणे राजकारण करू, असे संकेत दिले.

शिवाय हात कापण्याची भाषा करत आपण प्रसंगी महाकालीचे रूप घेऊ, अशीही तंबी दिली. एवढे सगळे सोपस्कार केल्यावर याच मेळाव्यात आपली उमेदवारी जाहीर होईल, असे त्यांना वाटले. पण राजकारणात मुरलेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अतिशय कौशल्याने त्यांची उमेदवारी जाहीर करण्याचे टाळले. अद्याप पक्षाकडून भाग्यश्री आत्राम यांच्या उमेदवारीचे कोणतेच संकेत पक्षाकडून मिळालेले नाहीत.

त्यांचाही उत्साह मावळल्यासारखा दिसत असून राजकीय पटलावर त्या फार सक्रिय असल्याचे दिसत नाही. दुसरीकडे माजी आमदार दीपक आत्राम यांनीही शरद पवारांच्या या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. आदिवासी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून सशक्त नेतृत्व म्हणून पुढे आलेले दीपक आत्राम यांना जनतेने एकदा संधी दिली होती. पण त्यांना त्या संधीचे सोने करता आले नाही. त्यामुळे पुढील निवडणुकीत जनतेने त्यांना नाकारले. आमदारकी गमावल्यानंतर त्यांचे सहकारी अजय कंकडालवार यांनीही त्यांची साथ सोडत आपले वेगळे स्थान निर्माण केले.

आता काँग्रेस पक्षात महत्त्वपूर्ण नेता होण्याची त्यांची धडपड सुरूच आहे. याशिवाय महायुतीकडून धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी मिळण्याचे जवळपास ठरल्याची चर्चा असल्याने धर्मरावबाबा आत्राम यांचे पुतणे तथा माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम चिडून आहेत. खरेतर जनतेने त्यांनाही एकदा निवडून आणले होते. भाजपने त्यांना राज्यमंत्री पदही दिले. पण दीर्घकाळ झोपेत एखादे गोड स्वप्न संपून जावे, तसे अम्ब्रीशराव आत्राम यांचे ते स्वप्नील दिवस बघता बघता संपले.

ते अहेरी इस्टेटचे राजे असले, तरी आमदार व नंतर राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांना जनतेचा राजा होण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. पण गोड स्वप्नाच्या धुंदीत त्यांचे अंमळ दुर्लक्षच झाले. शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पक्षफोडीच्या राजकारणात धाकली पाती महायुतीत आल्याने अम्ब्रीशरावांच्या अडचणी वाढल्या. त्यामुळे एका विधानसभा निवडणुकीनंतर मागितले नसतानाही भाजपला पाठिंबा देणारे शरद पवार अम्ब्रीशरावांनाही उमेदवारी देऊ शकतात, असे बोलले जात आहे. पण आता तुतारी नेमकी कोण फुंकणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सगळ्यांचे लक्ष इकडेच...

गडचिरोली, आरमोरी विधानसभेसंदर्भात महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये फारसे वाद दिसत नाही. पण अहेरी विधानसभेच्या बाबतीत चित्र वेगळे आहे. येथे प्रत्येकच पक्ष आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही काँग्रेसच्या उमेदवारीबद्दल सूतोवाच केले आहे. भाजपही मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. दुभंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आधीपासूनच या जागेवर दावा ठोकत आहेत. एकूणच सगळ्यांचे लक्ष याच विधानसभेकडे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT