विदर्भ

पीक वाळले, स्वप्ने करपली अन्‌ जगण्याची उमेदही संपली

प्रवीण धोपटे

साहेबराव करपेंच्या सहकुटुंब आत्महत्येमागील वास्तव

वर्धा - चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील साहेबराव पाटील करपे यांनी पत्नी व चार मुलांसह दत्तपूर (वर्धा) येथील मनोहर कुष्ठधामात आत्महत्या केली. महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. या घटनेला रविवारी (ता. १९) ३१ वर्षे पूर्ण होत आहेत.

४० एकर शेतीचा मालक असलेला साहेबराव आत्महत्येच्या निर्णयाप्रत का आला, या प्रश्‍नाने संवेदनशील मनांना अस्वस्थ करून सोडले होते. या घटनेनंतर राज्यात शेतकरी आत्महत्यांची जी साखळी सुरू झाली, ती आजही अव्याहतपणे सुरू आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आत्महत्येपासून बोध घेत सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी करेल, असा आशावाद साहेबराव  करपे यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नोंदवले होते. 

पण, तो आशावाद प्रत्यक्षात आला का, याचे उत्तर मात्र दुर्दैवाने अजूनही होकारात आलेले नाही. 

चिलगव्हाणचे ११ वर्षे सरपंच राहिलेले, संगीत विशारद असलेले, उत्तम भजन गाणारे साहेबराव करपे यांचा गावात मोठा वाडा; पण भग्नावस्थेत. त्या वाड्यातच त्यांचा संसार होता. थकीत बिलापोटी एमएसईबीने वीजजोडणी खंडित केली. ४० पैकी १५ एकरांतील पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू-चणा वाळला अन्‌ सोबतच साहेबरावांची स्वप्नेही करपलीत. कर्ज फेडण्याच्या चिंतेने ते  सैरभैर झाले. मनाने खचले. दोन्ही पती-पत्नीने काहीतरी मनाशी ठरवले व मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडले.

करपे पाटील नेहमी मनोहर कुष्ठधामात यायचे. १९ मार्च १९८६ रोजीही ते पत्नी व चार मुलांसह कुष्ठधामात आले. तिथे खोली घेतली. खोलीतच टाळ, हार्मोनियमच्या साथीने भजने गायली.  सोबत आणलेल्या स्टोव्हवर पत्नीने भजे केलीत. त्यात एन्ड्रीन मिसळले. मुलांना भजे खायला दिले. एक-एक करीत चारही मुलांनी व पाठोपाठ पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. यानंतर साहेबराव यांनी शेतकऱ्यांच्या हलाखीच्या स्थितीचे वर्णन करणारी चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी हा निर्णय का घेतला, याविषयी सविस्तर लिहिले. तसेच दोन मुले, दोन मुली (लहान मुलगी सात-आठ महिन्यांचीच होती) व पत्नीच्या मृत्यूचा घटनाक्रमही लिहिला. खोलीत एका रांगेत पत्नी आणि मुलांचे मृतदेह ठेवून त्यांच्या कपाळावर त्यांनी एक-एक रुपयाचे नाणे ठेवले. इतका टोकाचा निर्णय घेतानाही या प्रकरणात कुणी अकारण अडकू नये, याचे भान साहेबराव करपे यांनी ठेवले. दाराबाहेर दगडाला दोरीने बांधून फेकलेल्या चिठ्ठीच्या वरच्या भागातच त्यांनी कुणीही दार उघडू नये, पोलिसांना कळवावे, असे लिहून ठेवले होते. नंतर एन्ड्रीन मिसळलेले भजे खाऊन त्यांनीही तडफडत मृत्यूला कवटाळले.
 

सिस्टीम हालेल; पण... 
दुसऱ्या दिवशी, २० मार्च १९८६ ला सकाळी हा घटना माहीत पडली. मी व माझे पती राधेश्‍यामजी अग्रवाल आम्ही लगेच जिल्हा रुग्णालयात गेलो. तिथे साहेबरावांचे वृद्ध आणि पायाने अधू वडील, गावातील चारपाच लोक आले होते. शवचिकित्सेनंतर आम्ही एका ट्रकने सहाही मृतदेह चिलगव्हाण येथे नेले. त्याच दिवशी सायंकाळी अंत्यसंस्कार झाले. आपल्या आत्महत्येने सिस्टीम हालेल, असे साहेबरावांना वाटत होते; पण तसे काही न घडले नाही. उलट शेतकरी आत्महत्यांच्या साखळीने महाराष्ट्र काळवंडून गेला.
 - सुमनताई अग्रवाल, ज्येष्ठ कार्यकर्त्या, शेतकरी संघटना, वरुड (जि. वर्धा) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: स्टार्कने दिल्लीला दिला दुसरा मोठा धक्का! धोकादायक फ्रेझर-मॅकगर्कला धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT