shetakari.
shetakari. 
विदर्भ

Video : शेतकरी पेरणी सोडून घेताहेत पेरलेल्या बियाण्यांचा शोध, काय असावे कारण?

बादल वाणकर

समुद्रपूर (जि. वर्धा) : वर्ध्यात बोगस खतांपाठोपाठ आता बोगस बियाण्यांचाही प्रकार पुढे येतो आहे. समुद्रपूर तालुक्‍यातील मांडगाव येथे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पेरलेले सोयाबीन उगवले नाही. या सर्वच शेतकऱ्यांनी समुद्रपूर येथील एका कृषी सेवा केंद्रातून नामांकित कंपनीचे बियाणे खरेदी केले. त्याची पेरणी करून 12 दिवस झालेत. पण, अद्याप पेरलेले बियाणे उगवलेच नाही. यामुळे शेतकऱ्यांकडून शेतात पेरलेल्या बियाण्यांचा शोध घेणे सुरू झाले आहे.

पाऊस आला, जमिनीतील ओल पाहूनच पेरणी केली. पेरणीला बारा दिवस उलटले तरी बियाणे अंकुरले नसल्याने शेतकरी बेचैन झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. मांडगाव येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी गावातील कृषी सेवा केंद्रातून तर काहींनी वर्धा शहरातील दुकानातून बियाण्यांची खरेदी केली. यंदा कपाशीबाबत घडलेल्या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीवर भर दिला. पावसाची चिन्हे दिसताच या भागातील शेतकऱ्यांकडून सोयाबीनचा पेरा झाला. बऱ्यापैकी पाऊस आल्याने पेरलेले बियाणे अंकुरणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही.

पेरलेले बियाणे बोगस असल्याचे म्हणत या बियाण्यांचा शोध घेण्याचा प्रकार येथील शेतकऱ्यांकडून सुरू झाला आहे. शेतात बियाणे कुठे हरवले हे शोधण्याचा प्रयत्न मांडगाव येथील शेतकरी संजय वांदिले, प्रशांत आदमने, सुधाकर तडस, प्रशांत गोलाईत, कैलास कापटे, उमेश विहिरकर, पांडुरंग दांडेकर, नामदेव तडस यांच्याकडून सुुरू आहे. हा शोध घेणारे एक दोन नाही तर तब्बल 35 शेतकरी आहेत. यातील एका शेतकऱ्याकडे किमान सहा ते सात एकर शेती आहे. यामुळे त्यांच्या पेरणीचा खर्च 50 हजाराच्या घरात आहे. एवढा खर्च करून या शेतकऱ्यांवर पेरणीचे दुबार संकट ओढवले आहे. या शेतकऱ्यांनी ईगल कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची लागवड केल्याची माहिती दिली. सोबतच धरतीधन व रोहितच्या बियाण्याचे लॉट देखील अंकुरले नसल्याची तक्रार या शेतक्‍यांकडून करण्यात आली आहे.



कृषी केंद्र चालकाने केले हात वर
पेरलेले उगवलंच नाही, अशी व्यथा घेऊन शेतकरी कृषी दुकानदारांकडे पोहोचले. पण, कृषी दुकानदाराने हात वर केले. त्याचप्रमाणे कृषी कंपनी कमी पावसाचे तसेच, खोलवर पेरणी केली असल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करीत आहे. परंतु, शेतात उकरून बघितले तर 50 टक्केच्यावर दाणे सडलेल्या अवस्थेत दिसतात. बाजूच्याच शेतात पेरणी यंत्राने दुसऱ्या कंपनीचे बियाणे पेरले असता ते बियाणे उगवले आहे. यामुळे नुकसान भरपाई मिळावी आणि बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

दुबार पेरणीसाठी शेतकरी बियाण्यांच्या विवंचनेत
आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे कृषी कंपन्यांनी जादा दर आकारून बियाण्यांची विक्री केली. त्यातच आता दुबार पेरणीसाठी कुठून बियाणे आणावे तसेच भांडवल कसे उभे करावे असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे. पहिल्या खरेदीत बियाणे कंपनीची लबाडी समोर आली. आता पुन्हा हिम्मत कशी करावी, याकरिता भांडवल कुठून आणावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

बियाणे उगवलेच नाही
मांडगाव परिसरात साधारणत: सोयाबीनचाच पेरा अधिक असतो. यानुसार यंदाही तसाच पेरा आम्ही केला. या पेरणीवर पाऊस पडला तरी बियाणे उगवले नाही. यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
- विजय आदमने,
शेतकरी, मांडगाव

जबाबदारी शासनाची

कृषी केंद्रातून शेतकऱ्यांनी खरेदी केलेली बियाणे शासनाने सर्टीफाईड केलेली आहेत. यामुळे ती उगविणे अथवा कुजणे याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची आहे. शासनाने आपली जबाबदारी समजून नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याची मागणी केली आहे.
हेमंत पाहुणे,
शेतकरी, मांडगाव  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT