अमरावती : मिरची उत्पादक पट्ट्यात कपाशीच्या विशिष्ट वाणाला चांगली मागणी असताना एमआरपीच्या तफावतीमुळे या बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आलेला आहे. परिणामी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर ज्यादा पैसे मोजून मध्य प्रदेश मार्गे आणलेल्या या बियाणे खरेदीची वेळ आलेली आहे.
राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना बियाणे खरेदी आर्थिकदृष्ट्या परवडणारी असावी, यासाठी बियाणांच्या किमती गतवर्षी कमी केल्या होत्या. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना इतर राज्यांच्या तुलनेत किमान दोनशे रुपये प्रति पाकीट कमी दराने कपाशीचे बियाणे उपलब्ध केले जात होते. मात्र यात कंपनीचा नफा कमी होत असल्याने कंपनीने अधिक नफा कमविण्यासाठी नामी शक्कल शोधून काढली आहे. महाराष्ट्रात संबंधित संकरित देशी वाणाच्या कपाशी बियाण्याचे कमाल विक्रीमूल्य (एमआरपी) 690 रुपये आहे; तर लगतच्या मध्य प्रदेशात त्याची एमआरपी 890 रुपये आहे.
म्हणजे मध्य प्रदेशमध्ये प्रति पाकीट दोनशे रुपये अधिक मिळतात. संबंधित वाण कापूस उत्पादक मिरची पट्ट्यात लाभदायी ठरले आहे. गतवर्षी हेक्टरी 23 क्विंटल उत्पादन आल्याने मेळघाटच्या पायथ्याशी या वाणाला यंदा विशेष मागणी आलेली आहे. त्यादृष्टीने मागणीचा कल लक्षात घेता किरकोळ विक्रेत्यांनी कंपनीकडे अग्रीम रक्कम देऊन या वाणाची मागणी नोंदविलेली आहे; मात्र कंपनीने तुटवड्याचे कारण पुढे करीत विक्रेत्यांना या वाणाचा नाममात्र पुरवठा चालविला आहे. एकीकडे अग्रीम देऊन व मागणी नोंदवूनसुद्धा बियाणे मिळत नसल्याची विक्रेत्यांची ओरड आहे; तर पैसे मोजूनही विशिष्ट बियाणे उपलब्ध होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आतापासून सुरू झालेली आहे.
या कृत्रिम तुटवड्याचा फायदा उचलत नफेखोरांकडून मध्य प्रदेश मार्गे या वाणाची खासगी पद्धतीने व ज्यादा दराने विक्री केली जाण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. "स्वदेशी"ची कास धरत आत्मनिर्भरतेकडे निघालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनाचे बघितलेले स्वप्न "अंकुर'ण्यापूर्वीच त्यांच्यावर नफेखोरीने घाला घातल्याचे एकूणच चित्र आहे.
बियाणे उत्पादक कंपन्या कृषी विभागाला दरवर्षी पुरवठा आराखडा देतात. त्यांनी जेवढा पुरवठा करण्याचे मान्य केले आहे; तेवढा त्यांना बियाणे पुरवठा करावा लागतो. बियाणे नाही, असे म्हणण्याची त्यांच्याकडे कुठलीही सोय नसते. त्यामुळे संबंधित कंपनीचा पुरवठा आराखडा किती बियाणे उपलब्ध करून देण्याचा होता, हे तपासण्याची वेळ कृषी विभागावर आलेली आहे.
विचारणा केली जाईल
खासगी कंपनीच्या संबंधित वाणाला फक्त मिरची उत्पादक पट्ट्यात विशेष मागणी आहे. तथापि कंपनीने विक्रेत्यांकडून अग्रीम घेऊन मागणी नोंदविलेली असेल तर पूरवठ्याबाबत वितरकांकडे विचारणा केली जाईल, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी कुर्बान तडवी यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.