गडचिरोली : जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली उपविभागाअंतर्गत येणाऱ्या कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पैडी जंगल परिसरात पोलिसांचे सी-६० दल (C-60 contingent) व नक्षलवाद्यांच्या दरम्यान शुक्रवारी झालेल्या चकमकीत पोलिस जवानांनी तब्बल १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या घटनेमुळे नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले असून ही पोलिस विभागासाठी मोठे यश असल्याचे नमूद करत गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल (Ankit Goyal) यांनी आपल्या सी-६०च्या जवानांना कौतुक, अभिनंदनाचे प्रोत्साहनपर पत्र पाठविले आहे. (Superintendent of Police sends letter of encouragement to C-60 personnel)
पोलिस जवानांना मिळालेल्या या यशाचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच राज्याचे नगरविकासमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गडचिरोली पोलिसांचे कौतुक केले होते. गडचिरोली पोलिस विभागाचे नेतृत्व करणारे पोलिस अधीक्षक गोयल यांनी स्वत: सी-६० जवानांना पत्र लिहून त्यांचा उत्साह वाढविला आहे. शुक्रवारी सकाळी ६ ते ७.३० वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांवर गोळीबार केला.
पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. ही चकमक जवळपास दीड तास चालली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी या परिसरात शोध अभियान राबविले असता घटनास्थळी ६ पुरुष नक्षली व ७ महिला नक्षली अशा एकूण १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. तसेच एके ४७, एसएलएआर, कार्बाईन, ३०३, १२ बोअर रायफल आदी शस्त्रे व भरपूर स्फोटके तसेच नक्षलवाद्यांच्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले.
पोलिसांनी यमसदनी धाडलेल्या १३ नक्षलवाद्यांवर एकूण ६० लाखांचे बक्षीस सरकारने जाहीर केले होते. यात कसनसूर एलओएस दलमची एसीएम नंदिनी उर्फ प्रेमबत्ती मडावी, कंपनी - ४ चा डीव्हीसीएम सतीश उर्फ अडवे देवू मोहंदा, कंपनी - ४ चा पीएम किशोर उर्फ शिवा उर्फ शिवाजी बारसू गावडे, कसनूसर एलओएस दलमचा उपकमांडर रूपेश उर्फ लिंगा मस्तारी गावडे, कसनसूर एलओएस दलमची पीएम सेवंती हेडो, पैदी एरीया जनमिलिशीचा किशोर होळी, कंपनी - ४ ची पीपीसीएम गुनी उर्फ बुकली धानू हिचामी, कसनसूर एलओएस दलमची पीएम रजनी ओडी, कसनसूर एलओएस दलमचा एसीएम उमेश परसा, चातगाव दलमची पीएम सगुना उर्फ वसंती उर्फ वत्सला लालू नरोट, कसनसूर एलओएस दलमची सदस्य सोमरी उर्फ सुनीता उर्फ सविता पापय्या नैताम, कसनसूर एलओएस दलमचा पीएम रोहित उर्फ मनेश उर्फ मानस उर्फ सोनारू सत्रु कारामी यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे या चकमकीत मारला गेलेला कंपनी - ४ चा डीव्हीसीएम सतीश उर्फ अडवे देवू मोहंदा हा महत्त्वाचा जहाल नक्षलवादी असून १ मे २०१९ रोजी जांभूळखेडा येथे नक्षलवाद्यांच्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलिस जवान शहीद झाले होते. त्या घटनेत याचा समावेश होता. या चकमकीमुळे कसनसूर दलम जवळपास नष्ट झाले आहे. अतिशय उत्कृष्ट नेतृत्व करत बुद्धिकौशल्याचा वापर करून पोलिस विभागाचे कोणतेही नुकसान होऊ न देता हे यश मिळविल्याबद्दल पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रात सर्व जवानांचे कौतुक केले आहे.
लवकरच मिळेल पदक व पदोन्नती
पैडी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत अभूतपूर्व शौर्य दाखवत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या सी-६० पोलिस दलातील जवानांना लवकरच शौर्य पदक मिळणार असून यातील काहींना पदोन्नतीसुद्धा मिळणार आहे. या जवानांचे कार्य पोलिस दलाची प्रतिमा उंचावणारे असल्याने आम्हाला या जवानांचा अभिमान आहे, असे पोलिस अधीक्षक अंकित गोयल ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले.
पोलिस विभाग निरंतर राबवीत असलेले जनकल्याणकारी उपक्रम, नागरिकांना सातत्याने दिलेला मदतीचा हात यामुळे आता जनतेच्या मनात आम्हाला स्थान मिळाले आहे. तसेही नागरिक त्यांच्यातील निष्पापांचे प्राण घेणाऱ्या नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांनी त्रस्त झाले आहेत. आता आमचे गुप्त माहितीचे जाळेही भक्कम झाले आहे. शिवाय वाघासारखे निर्भयपणे जंगलात फिरत कडवी झुंज देत नक्षलवाद्यांना टिपणारे आमचे शूर पोलिस जवान असल्याने हे यश मिळत आहे. आमच्या जवानांना असे कुठलेही यश मिळाले की, त्यांना पत्र पाठवून कौतुक करायला मला आवडतं.- अंकित गोयल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली
(Superintendent of Police sends letter of encouragement to C-60 personnel)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.