Time
Time Sakal
वुमेन्स-कॉर्नर

‘पॉवर’ पॉइंट : ‘टाइम’ आणि ‘स्पेस’चा गुंता

हर्षदा स्वकुळ

‘तसंही तू घरीच असायचीस की, तुला कसला आलाय लॉकडाऊनचा त्रास...’ फॅमिली फ्रेंड्सच्या डिनर पार्टीमध्ये तो सहज तिला मजेत बोलून गेला. तसं त्याच्या मनात काही नव्हतं; पण मनात काही नसताना सहज तोंडातून निघालेली गोष्टच, मनात अगदी खोलवर असते. ‘आपण काय घरीच असतो, काय होणारे’ ही धारणा तिची तिनंही करून घेतली होती.

...ओटा साफ करून रात्री आडवं झाल्यावर ती विचार करायला लागली. ‘खरंचच मी तर नेहमी घरीच होते, संसाराची ३० वर्षं झाली. मुलं मोठी झालीयेत. त्यांच्या बाळंतपणासाठी कधी अमेरिकेत गेले तरी आपलं घरं ते विमान, विमान ते अमेरिकेतलं घर आणि पुन्हा तोच प्रवास.. म्हणजे प्रवास झाला बराच आयुष्यभर; पण चार भिंतीतली माझी व्यवधानं समोरच्याला व्यवधानं का वाटली नसावीत?’ ...तिनं पटकन झोपण्याची तयारी केली. कूस बदलली तरी झोप लागत नव्हती.

ही एक मजा असते ना.. रात्री झोप येत नसते, आजूबाजूला पंख्याचे आवाज येत असतात, तेव्हा घरातला एकेक कोपरा न्याहाळावा, शांत झालेलं घर काहीतरी बोलतंय असं वाटतं. ही शांतता ऐकण्यासाठी ती हल्ली जरा उशिराच झोपायची; पण तिला ही शांतता का हवी होती? दिवसभर घरातच असूनही आत्ताच का शांतता हवी आहे असा विचार करताना तिला एकदा जाणवलं, दिवसभर ती घरात ‘एकटीच’ असायची. ‘आपलं’ असं कितीही असलं तरी घरच्या व्यक्तीच्याच स्पेसमध्ये २४ तास असणं, किंवा आपल्या स्पेसमध्ये आपली घरातली व्यक्ती २४ तास असणं, हे ‘अडकल्यासारखं’ होतं का?

स्वत:च्या विचारांनी ती एकदम दचकली. मग हळूहळू तिलाच उत्तरं मिळत गेली. ‘‘तसंही तू घरातच असायचीस’’, असं तो सकाळी म्हणाला तेच तर मुख्य कारण आहे. फक्त ‘मीच’ घरात असायचे. तू दिवसातले १२ तास बाहेरच होतास. मग मला घरातल्या प्रत्येक कोपऱ्याची आणि माझी त्या कोपऱ्यांना सवय झाली. जिन्यातून कोण किती वाजता जातं, स्वयंपाकघरात बरोबर पोळ्या लाटायला सुरूवात केली, की खिडकीसमोरच्या रस्त्यांवरून कोणती गाडी कधी टर्न घेते, किती वाजता तहानलेले पक्षी गॅलरीत येतील, या वेळा फक्त माझ्या मलाच माहिती होत्या. माझ्या माझ्यापुरत्या असलेल्या या वेळांमध्ये, आळसावलेल्या पावलांमध्ये, शांत क्षणांमध्ये आता तू आलायस..

प्रत्येकाच्या डोक्यात स्वत:चं असं घड्याळ असतं. त्या घड्याळात आपण आपल्या माणसांना ठराविक जागा दिलेल्या असतात. जवळची व्यक्ती असली तरी पूर्ण घड्याळच व्यापून टाकण्याची मुभा स्त्री-पुरूष कुणीच एकमेकांना देत नाही. त्यामुळे आयुष्यभर फक्त ‘माझ्याच’ हक्काच्या असलेल्या क्षणांबद्दल चारचौघात असं बोलून त्यानं हलक्यात काढणं, यात खरं त्याची चूक नाहीये. तर त्याच्या डोक्यातल्या घड्याळाला ‘माझ्या’ क्षणांनी व्यापल्याची अस्वस्थता आहे, ती त्याला मांडता येत नाहीये, या विचारांनीच ती सुखावून गेली. रस्त्यावरून ट्रक गेल्याचा आवाज आला. ‘‘साडेचार वाजले वाटतं’’ म्हणत तिनं पुन्हा कूस बदलली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT