Manjiri Chaudhary
Manjiri Chaudhary Sakal
वुमेन्स-कॉर्नर

माझिया माहेरा : हळवा कोपरा

सकाळ वृत्तसेवा

लाडक्या गं लेकी, बापासंगं जेवू नको... जाशील परघरा, लई माया लावू नको!

- मंजिरी चौधरी, पुणे

लाडक्या गं लेकी, बापासंगं जेवू नको... जाशील परघरा, लई माया लावू नको!

... असं म्हणत म्हणत, मायेत गुंतवतं... ते माहेर! माझ्या मनाचा एक हळवा कोपरा. इतका हळवा, की आज माहेरघर फोटोत जाऊन बसल्यावरही, आठवणी दाटल्या, की तो हळवा कोपरा जलमय होऊन जातो.

माझे आई-बाबा, धाकटा भाऊ आणि मी असं आमचं छोटंसं चौकोनी कुटुंब. आई अरुणा आणि बाबा भगवानराव कामिरे. दोघंही उच्चविद्याविभूषित, पुण्यातल्या एका नामवंत शाळेत अध्यापक. अत्यंत कष्टानं शिक्षण घेऊन, स्वबळावर, कुणाच्याही आधाराशिवाय शून्यातून विश्व निर्माण केलेलं.

माझी आई तर लग्न झालं, तेव्हा इंग्रजी चौथीपर्यंतच शिकलेली; पण बाबा हाडाचे शिक्षक. त्यामुळे त्यांनी तिला सक्तीने एमएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण करायला लावले. त्यांचा दोघांचा इथपर्यंतचा प्रवास अगदी जवळून बघतच आम्ही लहानाचे मोठे झालो आणि कळतनकळत शिक्षणाचं संस्कारांचं महत्त्व मनावर खोलवर ठसत गेलं. त्याचा उपयोग मला आजही होतोय. मला आठवतंय, त्या काळात शिक्षकांना आजच्याइतके पगार नव्हते आणि मानही नव्हता. आईचं शिक्षण आणि नोकरी दोन्हीही चालू होतं. बाबांचा तुटपुंजा पगार; पण... या सगळ्याची झळ त्या दोघांनी आम्हाला कधीच लागू दिली नाही.

मे महिन्याच्या सुट्टीत पगार झाल्यावर, एकदा चौघांनी ‘कावरे’मध्ये जाऊन आईस्क्रीम खायचं, १ मेला माझ्या वाढदिवसाला घरात पहिल्यांदा आमरस व्हायचा! गाडीवरून दोघांसाठी कलिंगडाच्या दोन फोडी आई आणायची, ही आमची ‘समर एन्जॉयमेंट!’; पण तरीही आम्ही भलते खूश असायचो. पगारानंतरच्या पहिल्या रविवारी फिश करी, दुसऱ्या रविवारी चिकन करी, तिसऱ्या रविवारी अंडा करी! अशा महिन्यातून ३-३ पार्ट्या करायचो आम्ही.

हॉटेलिंग म्हणजे ‘स्वीट होम’मध्ये २-३ महिन्यातून एकदा जाऊन तिथली प्रसिद्ध साबुदाण्याच्या खिचडीवर ताव मारणे. दिवाळीत तर वेगळीच मज्जा! बोर्डाचे पेपर तपासणे, बोर्डाची सुपरव्हिजन, ट्युशन्स असे जास्त मिळणारे पैसे आई राखून ठेवायची आणि आम्ही दिवाळीच्या सुट्टीत छान छान गाजलेली नाटकं बघायचो. डॉ. श्रीराम लागूंचे ‘नटसम्राट’, काशीनाथ घाणेकरांचे ‘इथे ओशाळला मृत्यू’, प्रभाकर पणशीकरांचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ ही सगळी नाटकं आम्ही चौघांनी एकत्र बघितली. त्यामुळे छोटं असलं, तरी कुटुंबातल्या माणसांचं एकमेकांच्या नात्यांमधलं दृढत्व किती मोलाचं आहे, हे मला कळत गेलं आणि मग... लग्नानंतर बारा माणसांच्या एकत्र कुटुंबात स्वतःला सामावून घेणं मला अवघड वाटलं नाही.

शालेय जीवनात पाचवी ते दहावीपर्यंत अनेक नाट्यस्पर्धा गाजवलेली मी. अकरावीमध्ये आईने या वर्षी कशातही भाग घ्यायचा नाही, असं बजावूनही, जिल्हा परिषदेच्या नाट्यस्पर्धेत तिच्या नकळत भाग घेतला आणि त्यानंतर जो काही स्फोट झाला!.... पण तरीही शाळेची गैरसोय टाळण्यासाठी माझ्याकडून चांगले गुण मिळवण्याची कबुली घेऊन, स्वतःमधील शिक्षिकेचं आणि आईचं कर्तव्यही पार पाडणारी अशी होती माझी आई! मऊ मेणाहूनही आणि... कठीण वज्रासही भेदणारी. बाबा तर नुसतेच मऊ मेणाहुनी. त्यांना मी कधी रागावलेलं, कुणाशी आवाज चढवून बोललेलं पाहिलंच नाही. प्रत्येक वाढदिवसाला सकाळी ६ वाजता पहिला फोन बाबांचा असायचा!

बीएस्सीनंतर मला बीएडला प्रवेश मिळाला आणि माझं लग्न ठरलं. १७ मेला लग्न आणि १७ जूनला कॉलेज सुरू. मनात आलं, संपलं आता आपलं शिक्षण; पण बाबांनी बैठकीतच माझ्या सासू-सासऱ्यांना अट घातली, की पुढचं वर्ष माझ्याकडेच राहून ती तिचं शिक्षण पूर्ण करेल.

त्या काळात, मी स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून त्यांनी धरलेला हट्ट, भविष्यात माझ्यासाठी वरदान ठरला. माझ्या जीवावरच्या दुखण्यात, स्वतः हार्ट पेशंट असतानाही, ‘ती बरी होईपर्यंत मी हॉस्पिटलमधून हलणार नाही,’ असा निश्चय ठामपणे करणारे माझे बाबा, आणि शेवटच्या अश्विनीला, हातातला वॉकर सांभाळत मला औक्षण करणारी माझी आई.

खरंच... किती किती हवी असतात ना माहेरची ही दोन दैवतं आपल्याला. अगदी कायमची... पण ‘मरण कल्पनेशी थांबे खेळ जाणत्याचा, दोष ना कुणाचा’ हे वास्तव स्वीकारायचे आणि त्यांच्या आठवणींची शिदोरी सांभाळायची. एवढं आणि एवढंच उरतं आपल्या हाती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT