Majhia Mahera Parli Vaijnath Sakal
वुमेन्स-कॉर्नर

माझिया माहेरा : अस्सं माहेर सुरेख बाई...

प्रत्येक स्त्रीच्या मनातील हळुवार व नाजूक कप्पा म्हणजे तिचं माहेर. माझं माहेर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ.

सकाळ वृत्तसेवा

प्रत्येक स्त्रीच्या मनातील हळुवार व नाजूक कप्पा म्हणजे तिचं माहेर. माझं माहेर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ.

- सुनंदा वसेकर, पुणे

प्रत्येक स्त्रीच्या मनातील हळुवार व नाजूक कप्पा म्हणजे तिचं माहेर. माझं माहेर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ. माझ्या माहेरचं घर जंगम गल्लीतील मोठा वाडा. वाड्यात मध्यभागी मोठं लिंबाचं झाड, ज्यावर संध्याकाळी कावळ्यांची शाळा भरत असे. मोठं स्नानगृह- जिथं आड आहे व त्याला भरपूर पाणी आहे, गरम पाण्यासाठी वत्तल- जो भल्या पहाटेपासूनच पेटवला जाई. स्वयंपाकघर, देवघर, मोठं घर, डेऱ्याचं घर, पाहुण्यांसाठी बैठकघर व मुख्य दरवाजासमोर दोन मजली माडी.

तळमजल्यावर बाळंतिणीचं घर- जिथं फरशी नसून शेणानं सारवावं लागे. आमचं एकत्र कुटुंब होतं. बाप्पा (मोठे काका) बापू (मधले काका) व माझे वडील ज्यांना आम्ही सर्वजण तात्या म्हणत असू. बाप्पांना तीन मुली, दोन मुलगे, बापूंना चार मुली, दोन मुलगे; तसेच आम्ही सात बहिणी व एक भाऊ असं पंचवीस-तीस जणांचं एकत्र कुटुंब होतं. सख्खं, चुलत असं काहीच कळत नसे. घरात पोत्यांनी धान्य यायचं. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचा राबता असायचा, आलेल्या पाहुण्यांना जेवण केल्याशिवाय पाठवलं जात नसे. ‘अतिथी देवो भव’ हा संस्कार लहानपणीच मनावर रुजला. घरात पहिल्यापासून व्यवसाय होता. माझे वडील व बाप्पांचे रेडिमेड कपड्यांचं दुकान, बापूंचं गुळाचं दुकान, बाप्पांचा सर्वांत मोठा मुलगा म्हणजे आमचा सगळ्यात मोठा भाऊ अण्णा यांचं अडत दुकान होतं- जिथं लाकडी पाट असलेला मोठा तराजू होता. त्यावर आम्ही बसून सी-सॉसारखं खेळत असू.

सर्व पुरुष मंडळी सकाळी नऊ वाजता जेवण करून घराबाहेर पडत असत व रात्री नऊनंतर घरी येत. मोठी आई (मोठी काकू), काकू (मधली काकू) व माझी आई जिला सर्वजण ‘ताई’ म्हणत. सर्व स्त्रिया सकाळी लवकर आंघोळ करून कामाला लागत. स्वयंपाकघरात दोन चुली होत्या, सर्व स्वयंपाक चुलीवरच केला जाई. कामाची विभागणी असे; पण कधी ‘तू- मी’ झालेलं आठवत नाही. मोठ्या वहिनी आम्हा सर्व मुलींच्या वेण्या घालून देणं, जेवायला वाढणं, अभ्यास घेणं अशी कामं पाहत असत.

गावातील सर्वांत मोठा सण महाशिवरात्र घरोघरी साजरा केला जाई. सर्वांच्या घरी खूप पाहुणे येत असत. रात्री बारानंतर आंघोळ करून वैद्यनाथाच्या दर्शनासाठी जात, रांगेत उभे राहून दर्शन घ्यावं लागे. दिवसभर फराळाचं करणं, वाढणं व खाणं हेच चालत असे. सहा-सात दिवस गावात जत्रा भरत असे. मंदिराच्या खालच्या बाजूला सर्व प्रकारची दुकानं लागत. वाड्यातील मोठा सण म्हणजे नागपंचमी. लिंबाच्या झाडाला चार-पाच दिवस अगोदरपासूनच मोठा झोका बांधला जाई. गल्लीतील सर्व बायका व मुली; तसंच आमच्या सर्व मैत्रिणी झोका खेळण्यासाठी वाड्यात जमत असत. दिवाळी सणाची आम्ही सर्वजण आतूरतेनं वाट बघत असू- कारण सर्वांना नवीन कपडे व फटाके मिळत असत. मी घरातील सर्वांत लहान शेंडेफळ होते- त्यामुळे सर्वांची लाडकी. सर्व बहिणीचं नववी-दहावीपर्यंत शिक्षण झालं व नंतर लगेच लग्न झालं. माझ्यापेक्षा मोठी बहीण मीनाताईनं मात्र ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. घरातील सर्वांचा विरोध पत्करून बीएड केलं व शिक्षिका झाली.

माझं दहावीपर्यंतचं शिक्षण घराजवळील वैद्यनाथ विद्यालयात झालं. आम्ही सर्व मैत्रिणी मिळून शाळेत येत-जात असू. वैद्यनाथ कॉलेजमधून मी बीएस्सी पूर्ण केलं. लग्नानंतर बीएड पूर्ण केलं व नूतन बाल शिक्षण संघ, कोथरूड माध्यमिक शाळेत मुख्याध्यापिका या पदावर काम पाहिलं.

परळीत नटराज नाट्यगृह, लक्ष्मी, प्रभात व नाथ टॉकीज अशी सिनेमा थिएटर्स आहेत. प्रसिद्ध जिजामाता उद्यान जिथं शंकराची मोठी मूर्ती व पाण्याचे कारंजं आहे. सावळाराम, काळाराम, गोराराम असे रामाची तीन मंदिरं आहेत. राम जन्माच्या दिवशी मिरवणूक निघत असे- ज्यात काही जण हनुमानाचं सोंग घेत असत. राम-सीता-लक्ष्मण यांचे देखावे केले जात. सावता माळी मंदिर, सोमेश्वर मंदिर, डोंगर तुकाई, कालरात्री देवीचं मंदिर अशी छोटी-मोठी अनेक मंदिरं गावात आहेत.

वैद्यनाथाचं दर्शन घेतल्यानंतर मेरू पर्वत प्रदक्षिणा करणं पुण्याचं समजलं जाई. मंदिराच्या मागच्या बाजूला हरिहर तीर्थ आहे- ज्याला भरपूर पाणी असतं. असं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेलं माझं गोकुळासारखं माहेर- ज्याच्या नुसत्या आठवणीने अजूनही मनात ही कविता येते... ‘रुणझुणत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा!’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT