एअरटेलचा तोटा गगनला भिडला; वाचा किती झालाय तोटा?

टीम ई-सकाळ
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भरावे लागणाऱ्या शुल्काचा तडाखा बसल्यामुळे भारती एअरटेलचा तोटा गगनला भिडला आहे.

पुणे : भारती एअरटेल या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीने सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत 23 हजार 045 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भरावे लागणाऱ्या शुल्काचा तडाखा बसल्यामुळे भारती एअरटेलचा तोटा गगनला भिडला आहे. या तिमाहीत सरकारला द्याव्या लागणाऱ्या लायसन्स शुल्कापोटी भारती एअरटेलला 28 हजार 450 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. जर या शुल्काचा भार नसता तर, कंपनीचा वास्तविक निव्वळ तोटा 1 हजार 123 कोटी रुपयांचाच तोटा झाला असता.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दंडावरील व्याजच 6 हजार कोटींच्यावर
मागील वर्षी याच कालावधीत एअरटेलला 119 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला होता. दुसऱ्या तिमाहीत भारती एअरटेलचा एकत्रित महसूल 4.7 टक्क्यांनी वाढून 21 हजार 199 कोटी रुपयांवर पोचला आहे. दूरसंचार विभागाला द्याव्या लागणाऱ्या शुल्कात मुद्दल रक्कम 6 हजार 164 कोटी रुपयांची असून त्यावरील व्याज 12 हजार 219 कोटी रुपयांचे आहे. तर दंडाची रक्कम 3 हजार 760 कोटी रुपये आहे. या दंडावरील व्याजाची रक्कम 6 हजार 307 कोटी रुपये इतकी आहे. या सर्व शुल्कासाठी भारती एअरटेलला तरतूद करावी लागल्यामुळे या तिमाहीत कंपनीला जबरदस्त तोटा झाला आहे.

ओकिनावाची इलेक्ट्रिक स्टुकर लाँच; जाणून घ्या फिचर्स 

इन्फोसिसचे सीईओ पुन्हा अडचणीत

यापूर्वीही बसलाय फटका
याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे एअरटेल, व्होडाफोन आयडिया या आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांना तब्बल 92 हजार 000 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. अॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू संदर्भात केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अरुण मिश्रा, एस अब्दुल नझीर आणि एम आर शाह यांच्या बेंचने केंद्र सरकारची बाजू मान्य केली आहे. यामुळे केंद्र सरकार आणि दूरसंचार कंपन्यांमधील 14 वर्ष जुना कायदेशीर लढा संपला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांना लायसन्स शुल्क आणि स्पेक्ट्रम युजेस चार्जेससाठी 92 हजार 641 कोटी रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. दोन्ही कंपन्यांना याचा चांगलाच आर्थिक फटका यामुळे बसणार आहे. दूरसंचार विभागाच्या युक्तिवादानुसार या शुल्कामध्ये व्याजातून मिळालेले उत्पन्न, लाभांश, मालमत्ता विकून मिळालेला नफा, विम्याचे क्लेम आणि परकी चलनातील उत्पन्न यांचा अॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूमध्ये समावेश करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharti airtel got huge loss in second quarter of financial year