
इलेक्ट्रिक कारच्या निर्मिती क्षेत्रातील आघाडीची अमेरिकी कंपनी टेस्लाने अखेर भारतामध्ये एंट्री केली आहे. कर्नाटकातील बंगळूरमध्ये या कंपनीचे पहिले पाऊल पडले आहे.
अहमदाबाद - इलेक्ट्रिक कारच्या निर्मिती क्षेत्रातील आघाडीची अमेरिकी कंपनी टेस्लाने अखेर भारतामध्ये एंट्री केली आहे. कर्नाटकातील बंगळूरमध्ये या कंपनीचे पहिले पाऊल पडले आहे. टेस्लाने बंगळूरमध्ये संशोधन आणि विकास केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. टेस्लाच्या भारतातील आगमनानंतर आज ट्विटरवर विनोद आणि मेमेज यांचा अक्षरशः महापूर आला होता. देशातील ट्रॅफिक जॅमची समस्या आणि रस्त्यांची दुरवस्था यावर मिश्कील भाष्य करणारे ट्विट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.
यांच्याकडे नेतृत्व
टेस्ला इंडियाचे नेतृत्व हे वैभव तनेजा, व्यंकटरमन श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेइनस्टाइन यांच्याकडे आहे. तनेजा हे कंपनीचे मुख्य लेखाअधिकारी आहेत. फेइनस्टाइन यांच्याकडे कंपनीच्या जागतिक व्यवसाय विभागाच्या वरिष्ठ संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
हे वाचा - चिंता नको, Whatsappचा डेटा सर्वरमधून डिलिट करता येतो; जाणून घ्या प्रोसेस
आधीच होणार होती एंट्री
टेस्लाने २०१६ मध्येच भारतात प्रवेश करण्याचे नियोजन आखले होते पण तेव्हा हे शक्य झाले नाही. कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी देशातील नियामक यंत्रणेवर खापर फोडताना भारतात येणे टाळले होते.
या नावाने नोंदणी
‘रजिस्ट्रार ऑफ कंपनीज’कडे टेस्लाने अधिकृत नोंदणी देखील केली आहे. टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी प्रायव्हेट लि. या नावाने कंपनीची नोंदणी करण्यात आली आहे, असे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
हे वाचा - 350 आरोपी, 900 साक्षीदार; इटलीतल्या खटल्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष
‘मॉडेल-३’ भारतामध्ये?
या गाडीच्या किंमतीचा विचार केला तर टेस्लाचे ‘मॉडेल-३’ ची भारतामध्ये विक्री केली जाऊ शकते. या गाडीची किंमत साधारणपणे ७४ हजार डॉलर (५९ लाख २० हजार रूपये) एवढी असू शकते असे ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. याच कंपनीच्या छोट्या एसयूव्ही आणि मॉडेल- वायच्या गाड्याही भारतामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे वाचा -मुंडेच्या राजीनाम्याची मागणी ते कर्नाटकातला भ्रष्ट कारभार; देशविदेशातील घडामोडी एका क्लिकवर
अन्यत्रही विस्तार
बंगळूर व्यतिरिक्त देशाच्या अन्य भागांमध्ये टेस्ला विक्री केंद्रे सुरू करण्याच्या विचारात आहे. सध्या महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांची कंपनीच्या व्यवस्थापनासोबत बोलणी सुरू आहे. व्यवसाय वृद्धीसाठी कंपनीने स्थानिक पातळीवर देखील भागीदारी करण्याचे नियोजन आखले आहे.