esakal | भारतीय अर्थव्यवस्थेची सुधारणा अपेक्षेपेक्षा सकारात्मक; रिझर्व्ह बँकेचा आशावाद
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

कोरोनाच्या संकटापूर्वीच अर्थव्यवस्थेची उतरती कळा अनेक अर्थतज्ज्ञांनी दाखवून दिली होती. कोरोनाच्या महासंकटामुळे अर्थव्यवस्थेवरील हे संकट अधिकच भीषण झालं.

भारतीय अर्थव्यवस्थेची सुधारणा अपेक्षेपेक्षा सकारात्मक; रिझर्व्ह बँकेचा आशावाद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीचे धाडसी निर्णय घेतले. मात्र या धाडसी निर्णयांनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व असे फटके बसल्याचे चित्र दिसून  आले. वाढती बेरोजगारी, सकल राष्ट्रीय उत्पन्नातील घट या बाबी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. कोरोनाच्या संकटापूर्वीच अर्थव्यवस्थेची उतरती कळा अनेक अर्थतज्ज्ञांनी दाखवून दिली होती. कोरोनाच्या महासंकटामुळे अर्थव्यवस्थेवरील हे संकट अधिकच भीषण झालं. मात्र, आता कोरोना संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्था लवकर सुधारणा करत असल्याचा आशावाद भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. 

हेही वाचा - दूरदर्शी नेतृत्वाने देशाला नेलं अभूतपूर्व उंचीवर; वाजपेयींच्या जयंतीनिमित्त PM मोदींनी केलं नमन

भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने सुधारणा करत असून देशाचा विकास दर तिसऱ्या तिमाहीत सकारात्मक नोंदला जाण्याबाबतचा आशावाद रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केला आहे. याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेचा वेग हा सकारात्मक असेल असं म्हटलं होतं. मात्र तो शून्य टक्क्यांच्या आसपास राहिल, असं काही दिवसांपूर्वी नमूद केलं होतं. गेल्या दोन्ही तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वेग हा उणेच राहिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने काल गुरुवारी आपल्या  'भारतीय अर्थव्यवस्था' या शीर्षकाखाली प्रकाशित केलेल्या नियतकालिकात म्हटलंय की, भारतीय अर्थव्यवस्था कोविड-19 च्या जागतिक महामारीच्या महासंकटातून सावरत आहे. तसेच आता काहीच दिवसांत संपणाऱ्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये भारताचा विकास दर हा 0.1 टक्के नोंदला जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाचे महासंकट हे सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत'चा नारा दिला होता. या मोहिमेमुळे क्रयशक्ती वाढण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे नमूद करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या या अहवालात पुढे म्हटलंय की, लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर जनजीवन सुरळीत होत असून त्यास पूरक असलेल्या धोरणांच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्था रुळावर येत असल्यास मदत  होत आहे. 

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी 9 कोटी खात्यावर पाठवणार 2 हजार रुपये

'इंडिया रेटिंग्ज'मुळे आशावाद उंचावला
इंडिया रेंटिंग्जने भारताबाबतच्या तिसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबत आशावाद व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा सरस असा विकास दर नोंदवून आशा उंचावल्या आहेत. इंडिया रेटिंग्जच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये देशाचा विकास दर हा -7.8 टक्के असेल. याआधी इंडिया रेटिंग्जने या कालावधीसाठी -11.8 टक्के विकास दर वर्तवला होता. 

loading image