Coronavirus - युरोपातून बीडच्या युवकाचा तो व्हिडिओ आला, महाराष्ट्र खडबडून जागा झाला...

rahul wagh
rahul wagh

एक महिन्यापूर्वी कोरोना विषाणूने महाराष्ट्राचे दार ठोठावले तेव्हाच जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या बीडमधील राहुल लिंबराज वाघ यांनी फेसबुक लाईव्हद्वारे मित्रांना सावध केले होते. मात्र, हा व्हिडिओ थोड्याच दिवसात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचला. मराठवाड्यातील एका ग्रामपंचायतीने तर सकाळी व सायंकाळी माईकवर ग्रामस्थांना हा व्हिडिओ ऐकविला. त्यामुळे जनजागृती होण्यास मोठी मदत झाली. याविषयी राहुल वाघ यांच्याशी सकाळने साधलेला संवाद....

प्रश्न - तुमचा व्हिडिओ महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरला. कसा अनुभव येतोय? 
राहुल वाघ -
युरोपात कोरोनाचे संकट गंभीर रूप धारण करीत असताना भारतात अन् महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रवेश झाला होता. मात्र, लोक नेहमीप्रमाणे वागत होते. कुणालाच गांभीर्य वाटत नव्हते. त्यामुळे मी एक दिवस युरोपात काय परिस्थिती आहे, हे सांगण्यासाठी फेसबुक लाईव्ह करून व्हिडिओ बनविला. काही दिवसातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. कोट्यवधी लोकांनी पाहिला. मला फेसबुकवर दररोज हजारो फ्रेंड रिक्वेस्ट येऊ लागल्या. अगणित मेसेज येऊ लागले. यात सगळ्या वयोगटातील लोकांचा समावेश होता. महाराष्ट्राच्या तळागाळात हा व्हिडिओ पोचला आणि लोकांनीही गांभीर्याने घ्यायला सुरवात केली. परभणीपासून दोन किलोमीटर अंतरावर बलसा खुर्द नावाचे गाव आहे. तेथील ग्रामपंचायतीने माझा व्हिडिओ दररोज सकाळ-सायंकाळी माईकवर मोठ्या आवाजात ग्रामस्थांना ऐकवला. मला ते फार भावले. आपले लोक फार समंजस आहेत. एक साद घातली आणि अख्ख्या महाराष्ट्राने मनावर घेतले. याशिवाय मलाही दररोज काळजी घेण्याबाबत मेसेज येऊ लागले. मी पुन्हा एकदा तेच सांगू इच्छितो की कोरोनाची दाहकता अतिशय गंभीर आहे अन् याची तीव्रता वाढतच आहे. त्यामुळे सगळ्यांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घ्यावी.

प्रश्न - बीड ते युरोपातील शिक्षणापर्यंतचा प्रवास कसा राहिला?
राहुल वाघ -
मी मूळचा बीड जिल्ह्यातील वाघेबाभूळगावचा (ता. केज) रहिवासी. प्राथमिक शिक्षण गावच्या झेडपीत, माध्यमिक शिक्षण बीडच्या श्री विद्यालय व अहमदपूरच्या (जि. लातूर) यशवंत विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या वाडिया महाविद्यालयात पूर्ण केले. सध्या ब्रेमेन विद्यापीठात (ब्रेमेन, जर्मनी) शिक्षण घेतोय. २०१५ मध्ये मला युरोपियन युनियनची आयबीआयईएस नावाची स्कॉलरशिप मिळाली. याचदरम्यान मी येथून MA European Studies and International relations हा अभ्यासक्रम पूर्ण केला. इमिग्रेशन पॉलिसीज ऑफ जर्मनी या टॉपिकवर वर्षभर यूनिकॉम (ब्रेमेन) या सोशल सायन्स इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रोफेसर वोल्फ यांच्या मार्गदर्शनात काम केले आहे. मी पीएच.डी.साठी प्रयत्नात असतानाच कोरोनाचे संकट कोसळले अन् विद्यापीठे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. 

प्रश्न - युरोपीय देश या संकटातून कधी बाहेर पडतील?
राहुल वाघ -
युरोपमध्ये इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी या मोठ्या अन् युरोपियन युनियनचा कणा असणाऱ्या देशांना मोठा फटका बसलेला आहे. सध्या जर्मनीमधील परिस्थिती सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळल्याने मृत्यूदर खूप कमी आहे. इटलीमध्ये दररोज साधारण पाचशे लोक मरत आहेत. हा आकडा कमी झाला आहे. कारण मागच्या आठवड्यात हा आकडा ९०० च्या घरात होता. आता वातावरण निवळत चाललेय. लॉकडाऊनमुळे नियंत्रण येताना दिसतेय. स्पेनमध्येही हा आकडा आता ५०० च्या आसपास स्थिरावलाय. सध्या हाय रिस्कला फ्रान्स व ब्रिटन हे देश असून इथे दररोज एक हजार लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन वाढविले आहे. संपूर्ण परिस्थिती निवळण्यास किमान तीन महिने तरी लागतील, असा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

प्रश्न - कोरोनानंतर अपेक्षित बदल काय आहेत? 
राहुल वाघ -
आता आर्थिक आघाडीवरही जागतिक सहकार्याची नितांत गरज आहे. अर्थव्यवस्था आणि पुरवठा साखळ्यांचे जागतिक स्वरूप पाहता प्रत्येक सरकारने निर्णय घेताना इतर राष्ट्रांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले तर गंभीर संकट येईल. आर्थिक निर्णयांसाठी एका जागतिक कृती योजनेची आवश्यकता असून ती लवकरात लवकर तयार करायला हवी. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सूचना देणारा जागतिक करार होणेही गरजेचे आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास अघोषित काळासाठी थांबविणे प्रचंड त्रासदायक ठरेल आणि कोरोना व्हायरसविरुद्ध युद्धाला अडथळा तयार होईल. देशांनी कमीतकमी आवश्यक प्रवाशांना सीमा ओलांडणे सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. यात वैज्ञानिक, डॉक्टर, पत्रकार, राजकारणी आणि व्यावसायिकांचा समावेश असावा. प्रवाशांची त्यांच्या मूळ देशात जागतिक करारानुसार ठरलेल्या पद्धतीने पूर्व-तपासणी करून हे केले जाऊ शकते. काळजीपूर्वक स्क्रीनिंग केलेल्या प्रवाशांनाच विमानात परवानगी आहे. मग त्यांना देशांनी स्वीकारण्यास तयार असावे. मागील जागतिक संकटांमध्ये म्हणजे २००८ चा Subprime mortgage crisis आणि २०१४ ची इबोलाची साथ आली तेव्हा अमेरिकेने जागतिक नेत्याची भूमिका स्वीकारली; परंतु सध्याच्या अमेरिकन प्रशासनाने या भूमिकेचा त्याग केला आहे. या प्रशासनाने अगदी जवळचे मित्रदेशही सोडले आहेत. जेव्हा युरोपातून सर्व प्रकारच्या प्रवासावर बंदी घातली, तेव्हा युरोपीय महासंघाला आगाऊ सूचना देण्याची तसदीही अमेरिकेने घेतली नाही.

ज्या प्रकारे कोव्हिड-१९ चे नामकरण व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेत चायनीज व्हायरस असे करण्यात आले, त्यावरून अमेरिकन प्रशासनाचा या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठळकपणे दिसून येतो. जर अमेरिकेच्या नेतृत्वाचा अभाव इतर देशांनी भरून काढला नाही तर सध्याची साथ नियंत्रित करणे फारच कठीण होणार आहे. सध्याची साथ मानवजातीस उद्भवणाऱ्या तीव्र धोक्याची जाणीव करून देईल. आपण मतभेदांच्या मार्गावरून जायचे की जागतिक एकतेच्या हे ठरविणे गरजेचे ठरले. मतभेद निवडल्यास हे संकट लांबणीवर पडेल. भविष्यात कदाचित आणखी वाईट आपत्तींना सामोरे जावे लागेल. जर जागतिक एकता निवडली तर केवळ कोरोना व्हायरसच नव्हे तर भविष्यातील सर्व साथीच्या आणि २१ व्या शतकातील मानवजातीला त्रास देणाऱ्या संकटांविरुद्धही विजयी होता येईल.

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...

प्रश्न - युरोपीय देश या संकटातून कोणता धडा घेतील?
राहुल वाघ - पहिला धडा
- २००८-०९ मधील आर्थिक संकटाच्या विपरीत परिणामातून युरोपियन अर्थव्यवस्था आत्ता कोठे सावरली होती; पण साधारण १० वर्षांच्या काळातच कोरोना व्हायरसमुळे संकट उभे राहिले आहे. १९२९ मध्ये महामंदी सुरू झाल्यानंतर लोकांनी शेअर बाजारातील अपयशाची भरपाई करण्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती. आता, कोरोना व्हायरस सरकारच्या हस्तक्षेपाला मोठ्या प्रमाणात परत आणेल. साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी लोक सरकारवर अवलंबून असतात. परत एकदा लोकांवरची सरकारची पकड मजबूत होईल. 
दुसरा धडा - कोरोना व्हायरस युरोपियन युनियनमधील राष्ट्रांच्या सीमा सुरक्षेच्या भूमिकेबद्दल पुनरुत्थान करण्यास मदत करेल. देशांदरम्यानच्या अनेक सीमारेषा बंद करण्यात आल्या आणि युरोपमधील प्रत्येक सरकार आपल्या लोकांवर लक्ष केंद्रित करत आहे. सामान्य परिस्थितीत सदस्य राष्ट्रांनी त्यांच्या आरोग्य प्रणालीतील रुग्णांच्या राष्ट्रीयतेत भेदभाव केला नाही; परंतु या संकटात ते बहुधा इतरांपेक्षा आपल्या नागरिकांना प्राधान्य देतील म्हणून कोरोना व्हायरस वांशिक राष्ट्रवादाऐवजी राष्ट्रवाद मजबूत करेल. 
तिसरा धडा - दुसऱ्या देशात एखादी घटना घडत असल्यास त्याकडे डोळेझाक करणे यापुढे कधीच परवडणारे नाही. कारण युरोपियन युनियनचे बॅकबोन म्हणून ओळखले जाणारे देश आता आर्थिक खाईत जाण्याची शक्यता आहे अन् हे इतर देशासाठी धोक्याची घंटा असू शकते.

 हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

प्रश्न - चीनकडे लोक कोणत्या नजरेने बघताहेत?
राहुल वाघ -
प्रत्येक देशाचा चीनकडे बघण्याच्या दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. चीनची जगावरची मजबूत होत असलेली पकड पाहता चीनला कोणाच्या दृष्टिकोनाचा तेवढा फरक पडणार नाही. जनमानसात प्रतिमा सुधारावी, यासाठी चीन प्रयत्न करताना दिसत आहे. इटलीमधील वैद्यकीय मदत असो की स्पेनला केलेला वैद्यकीय उपकरणाचा पुरवठा, हा त्याचाच भाग आहे. कोरोना व्हायरस हा वुहानच्या एका लॅबमध्ये तयार करण्यात आला, असा दावाही काही जण करताहेत; पण याला कोणताही पुरावा नाहीये अथवा तो बायो इंजिनिअर्ड नाहीये म्हणून त्यात किती तथ्य असेल हे कोणीच सांगू शकत नाही. पण चीनने सुरवातीला या व्हायरसविषयीची संपूर्ण माहिती लपवून ठेवली. कदाचित चीनला या रोषाला सामोरे जावेच लागेल. जर सुरवातीला या संदर्भात सगळ्यांना सूचित केले असते तर जगावर ही वेळ आली नसती. सध्या चीन  बिघडलेली प्रतिमा जमेल तशी सुधरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे; पण बुंद से गयी वो हौद से नही आती अशी सध्याची अवस्था आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com