कोरोनाच्या भीतीने ICC ने बदलले नियम, आता 'असे' होतील सामने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जून 2020

कोरोनाची खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाच्या नियमात तात्पुरते बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली, ता.09 :  कोरोना संकटामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून क्रिकेटजगत पूर्णतः थांबले होते. त्यानंतर पुन्हा सावरत का होईना खेळाचे आयोजन सुरु झाले आहे. त्यामुळे कोरोनाची खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाच्या नियमात तात्पुरते बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये चेंडूला चमकण्यासाठी लाळ वापरण्यावर बंदी आणि सामन्यांसाठी पंचांच्या नियुक्तीसंदर्भात बदल करण्यात आले आहेत.  

सामन्यात चेंडूची चमक टिकून रहावी म्हणून, तसेच  चेंडूला स्विंग करण्यासाठी खेळाडू आपल्या लाळेचा अथवा घामाचा वापर करतात. परंतु सध्या जगभरात करोनाचे संकट आहे. त्यामुळे याचा फटका क्रिडा क्षेत्राला देखील बसला असून, कोरोनाची खबरदारी म्हणून आयसीसीने खेळण्याच्या नियमांमध्ये अंतरिम बदलांची पुष्टी केली आहे. ज्यामध्ये चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सामन्यात पंच म्हणून यजमान देशाच्याच पंचाची नियुक्ती करण्यासंदर्भात आणि सामना चालू असताना इतर खेळाप्रमाणे क्रिकेट मध्ये देखील एका खेळाडूच्या बदल्यात दुसरा बदली खेळाडू मैदानावर उतरवण्यास परवानगी देण्याचा निर्णय आयसीसीकडून घेण्यात आला आहे.      

सॅटेलाइट फोटोंमधून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर, चीनमध्ये काय घडलं?    

क्रिकेट सामन्यात गोलंदाज चेंडूला स्विंग करण्यासाठी, तसेच चमक आणण्यासाठी आपल्या थुंकीचा वापर करत असतात. परंतु यामुळे करोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. यावर उपाय म्हणून आयसीसीने नेमलेल्या अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीने चेंडूला लाळ लावण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली होती. यासोबतच सामन्यात पंच म्हणून यजमान देशाच्याच पंचाची नियुक्ती करण्यासंदर्भात या समितीने आयसीसीला सुचविले होते. त्यानुसारच आयसीसीने आज निर्णय घेत चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घातली आहे.

कोरोनाबाबत अमित शहांचा विरोधकांनाच सवाल; सोशल मीडियावर झाले ट्रोल

सामन्यासाठी यजमान देशाच्याच पंचाची नियुक्ती करण्याला परवानगी देत, इत्तर खेळांप्रमाणे क्रिकेट मध्ये देखील एका खेळाडूच्या बदल्यात दुसरा बदली खेळाडू मैदानावर उतरवण्याची परवानगी देण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. जेणेकरून सामन्याच्या वेळेस एकाद्या खेळाडूंमध्ये कोरोना संबंधित लक्षणे दिसल्यास अथवा त्रास झाल्यास, तात्काळ त्या खेळाडूच्या बदल्यात दुसरा खेळाडू मैदानात उतरवता येणार आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक डावात प्रत्येक संघासाठी डीआरएस पुनरावलोकनचा निर्णय देखील वाढवून देण्याचा प्रस्ताव आयसीसीने मान्य केला आहे.    

कोरोनावरील उपचाराची नवी उमेद; भारतात सुरु झाला हा प्रयोग         

याआधी क्रिकेट सामन्यात सर्वांच्याच सुरक्षितेसाठी आयसीसीच्या वैद्यकीय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. पीटर हार्कोर्ट यांनी दिलेल्या अहवालानुसार, चेंडूला लावण्यात येणाऱ्या थुंकीमुळे करोना विषाणू संसर्गाच्या वाढीबाबत जोखीम असल्याचे म्हंटले होते. त्यावर उपाय म्हणून तात्पुरते बदल करण्यासंदर्भात अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीने एकमताने काही बदल आयसीसीकडे प्रस्तावित केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICC change rule for precaution in corona pandemic