Divine Qualities of Sri Rama : काय होते श्रीरामांचे दैवी गुण? वनवास आणि भारतीय मूल्यांची पुनर्स्थापना

वनवास काळ हा धैर्यवान व्यक्तीस काय शिकवतो, तर प्राप्त परिस्थितीत वचनबद्ध राहणे, येणाऱ्या संकटांना तोंड देताना नीती न सोडणे, शत्रूचा जो बलवान शत्रू असेल त्याच्याशी मित्रता करणे, सामान्य जनांच्या अस्मितेला फुंकर घालून त्यांचे संघटित सैन्यात रूपांतर करणे, शत्रूचे घर भेदून त्याचे मनोबल खच्ची करणे, शत्रूच्या प्रदेशात घुसून त्याचे पारिपत्य करणे आणि स्वातंत्र्याची द्वाही फिरवणे.
ayodhya ram mandir tracing its roots and significance cultural tapestry ramayana ram vanvas idol lord ram
ayodhya ram mandir tracing its roots and significance cultural tapestry ramayana ram vanvas idol lord ramSakal
Updated on

।। जय श्रीराम ।।

रामरायाचा वनवास मार्ग अभ्यासण्यासारखाच आहे. या मार्गात प्रभु, रामचंद्रांनी सामाजिक समरसतेचा संदेश दिला आहे. सज्जन शक्तीचा उदय विकास आणि प्रकाश पसरवत असतानाच सर्वदूर अक्षय जीवनमूल्यांचे रक्षण कसे करावे, याचा वस्तुपाठ श्रीरामायणातील 'वनवास पर्व' जगाच्या अंतापर्यंत देत राहील. जीवनातील संघर्ष स्वीकार करीत त्यावर मात करणे वनवास पर्व शिकवते.

- विवेक सिन्नरकर

एकश्लोकी रामायण

आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्।

वैदेहीहरणं जटायुमरणं, सुग्रीवसंभाषणम् ।।

बालीनिर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरीदाहनम् ।

पश्चाद् रावण कुम्भकर्ण हननम्, एतद्धि रामायणम् ।।

भावार्थ : प्रथम प्रभू श्रीराम वनवासात गेले. तिथे त्यांनी स्वर्णमृगाचा पाठलाग केला आणि त्याचा वध केला. त्याचवे ळेस त्यांची पत्नी वैदेही (माता सीता) यांचे रावणद्वारा हरण झाले. त्यांचे रक्षण करताना पक्षीराज जटायू यांचा मृत्यू झाला.

यानंतर श्रीराम यांची मित्रता सुग्रीव (आणि हनुमंत) यांच्यासोबत झाली आणि श्रीराम यांनी त्यांच्याशी (परस्पर सहकार्याची) चर्चा केली. त्यांनी (सुग्रीवाचा दुष्ट बंधू ) वालीचा वध केला. मग समुद्रावर सेतू बांधून (वानर सेनेसह) समुद्र पार केला.

हनुमानजींनी (तत्पूर्वी) लंकापुरीचे पूर्ण दहन केले. यानंतर (राक्षसकुलासह) कुंभकर्ण व रावण यांचा (श्रीरामांनी) वध केला. ही (सीता मुक्तीपर्यंत) पूर्ण रामायणाची संक्षिप्त कहाणी आहे. या एक श्लोकी रामायणात ‘वनवासी रामाचे पराक्रम’ प्रामुख्याने आहेत. त्यांचे नित्य स्मरण केल्यास आपणही जीवनात विजयी होतो.

भारतीयांचे श्वास, निःश्वास

वाल्मीकीकृत श्रीरामायण मध्ये कमीत कमी २४,००० श्लोक आहेत. त्यांचा अभ्यास आणि पारायणे देशात हजारो वर्षे अखंड चालूच असतात. वरील संस्कृत ‘एकश्लोकी रामायण’ही आहे. ज्यात मात्र एका श्लोकामध्ये संपूर्ण रामायण पाठ केल्याचे पुण्य सहज प्राप्त होऊ शकते. हा श्लोक जपल्याने श्रीराम आणि श्रीहनुमान यांची कृपा प्राप्त होऊन रामायण आत्मसात होते. वरील एक श्लोक म्हणजे भारतीयांचा ‘श्वास आणि निःश्वास’ आहेत. रामायण कथामृत हजारो वर्षे भारत आणि भारतीय उपखंडात सर्वांना प्रेरणा देत आहे आणि अखंड देत राहील.

भारतीय मूल्यांची पुनर्स्थापना

वनवास काळ हा धैर्यवान व्यक्तीस काय शिकवतो, तर प्राप्त परिस्थितीत वचनबद्ध राहणे, येणाऱ्या संकटांना तोंड देताना नीती न सोडणे, शत्रूचा जो बलवान शत्रू असेल त्याच्याशी मित्रता करणे, सामान्य जनांच्या अस्मितेला फुंकर घालून त्यांचे संघटित सैन्यात रूपांतर करणे,

शत्रूचे घर भेदून त्याचे मनोबल खच्ची करणे, शत्रूच्या प्रदेशात घुसून त्याचे पारिपत्य करणे आणि स्वातंत्र्याची द्वाही फिरवणे. ‘निजबळे निजशक्ती सोडवली सीता । म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथां ।।’’ सीता माता यांची सन्मानपूर्वक सुटका स्वबळावर केली म्हणून श्रीराम अयोध्येत सन्मानाने परत आले हे महत्त्वाचे सार आहे.

ही उत्कंठा वनवासाच्या काळातील कथेचा उत्कलबिंदू आहे. ते कथानक सर्वांना मार्गदर्शक आहे. हे वनवासपर्व भारतीय मूल्यांची पुनर्स्थापना करण्याचे महान कार्य करीत आहे. सज्जन शक्तीचा उदय विकास आणि प्रकाश पसरवत असतानाच सर्वदूर अक्षय जीवनमूल्यांचे रक्षण कसे करावे, याचा वस्तुपाठ श्रीरामायणातील ‘वनवासपर्व’ जगाच्या अंतापर्यंत देत राहील.

वनवासी राम ते पुरुषोत्तम राम

पृथ्वीपालन आणि धर्म अर्थ, काम, मोक्ष यांचे रक्षण व संवर्धन करणे मानव जन्मातच शक्य आहे. देवांसह मानवांनी देखील हे आद्य कर्तव्य कसे पार पाडावे हे, श्रीरामायण रसाळ कथेत गुंफून आपल्याला सहज सांगते. तेही कठोर वनवास सहन करीत करीत श्रीरामांसह सर्वांनीच वनवास भोगला.

अग्निपरीक्षा दिली, आक्षेप झेलले, त्यातून रामायण हे सोने अधिकच झळाळत गेलेले आज दिसते. त्यातील चरित्रे ही आपलीशी वाटतात. आजच्या तरुण पिढीने ही श्रीराम सीता, लक्ष्मण तत्त्वनिष्ठा, संयम, ध्येयासक्ती शिकावी. त्यानेच ते जीवनात यशस्वी होतील.

श्रीरामायणातील परमोच्च रोमांचक, जीवनदायी आणि वरदायनी काळ म्हणजे श्रीराम-सीता आणि लक्ष्मण यांचा वनवास. मुळात मोठ्या नव सायासाने प्राप्त झालेली दशरथ राजाची ही मुले स्त्रीहट्ट आणि पुत्रप्रेम यांच्यामुळे महाराज दशरथ यांच्या देखत विभागली गेली.

राज्यलोभ आणि जनमताचा विसर पडल्यावर सत्ता संघर्षाची ठिणगी पडूनही संयम आणि वचनबद्धता यांचे धीरोदात्त दर्शन प्रभू श्रीराम, साध्वी सीता, वीर लक्ष्मण, महात्मा भरत आणि खंबीर शत्रुघ्न हे देतात.

त्यातून रामायणाची उंची अंतापर्यंत वर्धिष्णू होत राहते. ऋषिमुनी आणि वेदप्रणीत संस्कृतीस मान्य असे हे आर्ष काव्य. श्री नारदकथित आणि मुनी वाल्मीकीरचित अक्षय मुक्ती देणारा रामायण हा पवित्र ग्रंथ आहे. जीवनातील संघर्ष स्वीकारून त्यावर मात करणे वनवासपर्व शिकवते.

स्वदेश भक्तीचे आद्यप्रणेते जननी जन्म भूमी च स्वर्गादपि गरीयासी।

म्हणून भरतभूमीचा गौरव करणारे श्रीराम हे खरे राष्ट्रपुरुष म्हणावे लागतील. सोन्याची लंका जिंकूनही श्रीराम म्हणतात, ‘‘मला माझी माता आणि मातृभूमी अयोध्या स्वर्गाहून श्रेष्ठ वाटते.’’ स्वदेश भक्तीचे आद्यप्रणेते श्रीराम देशभक्तीचे प्रकटीकरण करतात.

ayodhya ram mandir tracing its roots and significance cultural tapestry ramayana ram vanvas idol lord ram
Ayodhya Ground Report: सुप्रीम कोर्टाचा निकाल ते प्राणप्रतिष्ठापना, अयोध्येत पाच वर्षात काय बदल झाले?

उत्तर भारत व दक्षिण, पूर्व-पश्चिम भारत जोडण्याचे कार्य रामायण सहज करते. ऋषिमुनी, नावाडी, भिल्ल, वनवासी, वानर जातीपासून वन्यप्राणी, लता, वृक्ष, पर्वत, नद्या, शिळा, पतित शबरीसह अनेक साधक मुनी, राक्षस, शापित असुर, वानर, पक्षी, प्राणी या सर्वांना मुक्तीसह अभय दिले. श्रीरामांनी वनवास प्रवासात जनसामन्यांची दखल घेऊन एकप्रकारे सामाजिक समरसता आणली.

श्रीरामांचे दैवी गुण

श्रीरामांनी रघुकुलनीतीने पिताश्री दशरथांचे वचन खरे करण्यासाठी हे सर्व वनवास गमन सहज स्वीकारले. नुसते स्वीकारले नाही तर संकटाचे सुसंधीत परावर्तन केले. सज्जन शक्तीला जागविले. त्यांनी दंडकारण्यात राक्षसपीडित ऋषिमुनी यांचे रक्षण केले.

हजारो दुष्ट राक्षस मारले. रघुकुलाचे महत्त्व वाढविले. वानर आणि वन्य प्राणी यांचे संघटन केले. हनुमंत, सुग्रीव यांना बंधुवत प्रेम दिले. बिभीषणास मित्र बनवून राज्य दिले. बंधुप्रेम, एक पत्नीव्रत, शौर्य आणि अंगभूत प्रभुता, राजाचे कर्तव्य, शरणागतास अभय देणे आणि सुवर्णमयी लंकेचा मोह त्यागून, आपली जननी व जन्मभूमी यांचा गौरव करणे या धीरोदात्त दैवी गुणांचे, स्वआचरणातून दर्शन दिले.

ही वनवास पर्वाची देणगी आहे. श्रीराम वनवासात जेथे जेथे गेले, तेथे तेथे अयोध्येचा विस्तार झाला. श्रीरामांच्या चौदा वर्षे वनवासाने भारतवर्ष आसेतुहिमाचल अखंड झाला. आजच्या भारताची सांस्कृतिक आणि भौगोलिक एकात्मता श्रीराम यांचे वनवासाचे फलित आहे.

ayodhya ram mandir tracing its roots and significance cultural tapestry ramayana ram vanvas idol lord ram
Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर नटले; गोदाआरती, तर कुठे गीत रामायण

श्रीरामांचा वनवास मार्ग

अयोध्या ते श्रीलंका या वाटचालीत श्रीरामांनी उत्तर भारतातील तमसा नदी, कोशल प्रांत, शृंगवेरपूर, प्रयाग, गंगा-यमुना खोरे, चित्रकूटमार्गे भयानक दंडकारण्यात प्रवेश केला. शृंगवेरपूरचा निषादराज गुह याचे आतिथ्य स्वीकारले. या बालमित्राकडून गंगा पार करण्यास श्रीरामांनी साह्य घेतले. येथून पुढे राजपुत्र राम तपस्वी राम झाले.

पुढे प्रयागमध्ये भारद्वाज मुनींचा आश्रम, यमुना नदी पार करून चित्रकूट पर्वतावर वाल्मीकी मुनींच्या सूचनेप्रमाणे माल्यवती नदीकाठी पर्णकुटी बांधून भरत भेटीपर्यंत राहिले. तेथून प्रयाग, शृंगवेरपूरजवळील कुराई येथून गंगा पार करून चित्रकूटपासून दक्षिणेकडे, अत्री ऋषी व श्रीदत्तमाता अनसूया यांचे आश्रमात मुक्काम केला.

अनसूया मातेने सीतेला दिव्य अलंकार भेट दिले. शरभंग ऋषी, सूतीक्ष्ण मुनी, वालखिल्य मुनी, अगस्त्य मुनी यांच्या भेटी घेतल्या. सनातन संस्कृतीचे, यज्ञ व आश्रम व्यवस्था यांचे रक्षण केले.

योद्धा संन्यासी अगस्ती मुनींनी श्रीरामांना विश्वकर्मानिर्मित अमोघ धनुष्यबाण संच व सुवर्ण तलवार भेट दिली. त्यामुळे हा वनवास श्रीरामांना सुसह्य झाला. दक्षिण दिग्विजय करून त्यांनी धर्म स्थापना व दुष्टांचे निर्दालन केले हे विदितच आहे.

ayodhya ram mandir tracing its roots and significance cultural tapestry ramayana ram vanvas idol lord ram
Ayodhya Ram Mandir : काळाराम संस्थानच्या ‘आनंद उत्सवा’स सामुहिक ढोल प्रदक्षिणेने प्रारंभ

पंचवटी येथे दीर्घ वास्तव्यात लोकसंग्रह, राक्षस मर्दन करताना शूर्पणखा, मारिच आणि कपटी रावण यांनी केलेले सीताहरण याने प्रक्षुब्ध झालेल्या राम यांनी श्रीहनुमंतासह वानरसेनेच्या साह्याने रावण वध केला.

सीतामाईसह वनवास पूर्ण करून अयोध्येत विजयी प्रवेश केला. या प्रदीर्घ प्रवासात जेथे जेथे सीतारामांचे पवित्र चरण लागले, निवास झाला ती स्थळे आणि सर्व वनवास मार्ग पवित्र तीर्थक्षेत्र झाला आहे. त्यात आत्ताचे प्रयाग, जबलपूर, रामटेक, पंचवटी, लोणार तळे, हम्पी, अनेगुंदी, केरळ, तमिळनाडूतील महेंद्रगिरी प्रदेश, त्रिचनापल्ली, रामनाथपुरम, रामेश्वरम्, धनुष्यकोडी सेतुबंध ही स्थळे मोक्षदाई आहेत.

श्रीरामांचे कठोर नियम पालन

श्रीरामास चौदा वर्षे वनवास म्हणजे नक्की काय होते? त्या चौदा वर्षांच्या काळात कुठल्याही नागरी भागात जाण्यास बंदी, वल्कले नेसून विजनवासात राहणे, कोणाशीही संपर्क टाळणे, कंदमुळे फळे खाऊन कुटीमध्ये कष्टात राहून जिवंत राहणे, कुठलेही सुखोपभोग न घेणे, संयत आणि संन्यस्त वृत्तीने राहणे या सर्व माता कैकयीच्या कठोर अटी होत्या.

कदाचित त्या प्रभू श्रीरामांच्या धैर्याची कसोटी पाहत असतील. याचा व्यावहारिक अर्थ असा होतो की, श्रीरामांचा अयोध्येच्या राज्यावरील अधिकार कायमचा काढून घेणे. संपत्ती, मानसन्मान आणि सैन्य हिरावून घेणे. साधारण बारा-चौदा वर्षांनी माणसाचे कायदेशीर अधिकार संपुष्टात येतात.

त्यांचे अस्तित्व संपल्याचे घोषित करता येते असा पूर्वापार चालत आलेला लोक व्यवहार होता आणि आहे. अर्थात श्रीरामांनी त्याचे कठोर पालन केलेले दिसते. ते कंदमुळे खाऊन राहिले. जमिनीवर झोपले. जटा, वल्कले भगवी वस्त्रे परिधान केली. किष्किंधानगरी वा शेवटी श्रीलंकेत स्वतः प्रवेश केला नाही. युद्धात अयोध्येचे सैन्य मागवले नाही. वानरसेना उभी करून स्वबळावर रावण वध केला.

ayodhya ram mandir tracing its roots and significance cultural tapestry ramayana ram vanvas idol lord ram
Ayodhya Ram Mandir : धार्मिक कार्यक्रमांमुळे धुळे भक्तिरसात चिंब

श्रीराम मंदिर संकुल : चरित्र निर्माण केंद्र व्हावे

देशापुढे असलेली आव्हाने पेलण्याची शक्ती आणि बुद्धी श्रीराम आम्हाला देवो ही प्रार्थना. आजचा आधुनिक भारत आणि युवा संभ्रमित आहे. राष्ट्रधर्म, कर्तव्य, नेतृत्व, संवेदनशीलता, स्वपराक्रम, स्वाभिमान याबाबत तत्त्वाला मुरड घालून क्षणिक लाभासाठी स्वत्व पणाला लावण्याचा धोका पत्करत असेल तर,

तेथे श्रीरामांच्या प्रामुख्याने वनवास काळातील जीवनाचा अभ्यास, युवा पिढीला योग्य मार्गावर आणू शकेल. आजचे युग हे नवनिर्मितीचे आहे. त्याच वेळी ‘चरित्रनिर्मितीचा’ विसर पडत आहे. त्यावर रामायण अभ्यास हे रामबाण उत्तर आहे. नूतन श्रीराम मंदिर संकुल युवाशक्तीचे चरित्र निर्माणाचे केंद्र व्हावे ही अपेक्षा.

(लेखक आर्किटेक्ट व रामायणाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com