यूपीत सोन्याचे घबाड; ३३५० टन सोन्याची सापडली खाण!

Sonbhadra-UP
Sonbhadra-UP

नवी दिल्ली : तब्बल दोन दशकांच्या शोधमोहिमेनंतर उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात सोन्याच्या दोन खाणी सापडल्या आहेत. भारतातील सोन्याच्या साठ्याच्या पाचपटीहून अधिक सोने या खाणीत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (जीएसआय) आणि उत्तर प्रदेश भूगर्भशास्त्र व खाण संचालनालय विभागाला या खाणी सापडल्या आहेत. या खाणींमधील सोन्याचा साठा जवळपास ३५६० टन इतका आहे. हा साठा देशातील सध्याच्या सोन्याच्या साठ्याच्या पाचपट आहे. भारताचा सध्याचा सोन्याचा साठा जवळपास ६२६ टन इतका आहे.

‘या खाणी भाडेतत्त्वार देण्यासंदर्भात सरकार विचार करते आहे. दोन ठिकाणी सोन्याचे साठे सापडले आहेत. सोनपहाड आणि हर्दी या दोन ठिकाणी हे साठे आहेत. जीएसआयच्या अंदाजानुसार सोनपहाड येथील सोन्याचा साठा २९१३.२६ टन इतका असून, हर्दी येथे ६४६ टन सोन्याचा साठा अपेक्षित आहे,’ अशी माहिती खाण अधिकारी के. के. राय यांनी दिली. 

भूगर्भशास्त्र व खाण संचालनालय विभागाचे संचालक रोशन जेकब यांनी या खाणींसाठी टेंडर काढण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सात सदस्यांच्या समितीकडे सोपविले आहे. ही समिती सोन्याच्या खाणींचे नकाशे बनवून पुढील प्रक्रिया करणार आहे. सोन्याव्यतिरिक्त युरेनियमसारख्या इतर दुर्मीळ खनिजांचाही शोध घेतला जातो आहे. बुंदेलखंड आणि विंध्य विभाग सोने, हिरे, प्लॅटिनम, चुनखडी, ग्रॅनाइट, फॉस्फेट, क्वार्ट्‌झ आणि चिनी माती या खनिजांनी संपन्न आहेत.

भारताकडे ६२६ टन सोन्याचा साठा असून, परकी गंगाजळीच्या तो ६.६ टक्के इतका आहे. जगात सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेकडे असून, तो ८१३३.५ टन आहे. त्याखालोखाल जर्मनीकडे ३३६६ टन सोन्याचा साठा आहे. तर इटलीकडे २४५१.८ टन, फ्रान्सकडे २४३६ टन, रशियाकडे २२४१.९ टन, चीनकडे १९४८.३ टन, स्वित्झर्लंडकडे १०४० टन आणि जपानकडे ७६५.२ टन सोन्याचा साठा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com