वाढत्या प्रदुषणाने कोरोनाचा प्रादुर्भावही वाढेल; AIIMS चे संचालक रणदीप गुलेरियांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा प्रदुषणाची वाढती पातळी चिंताजनक ठरली असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

नवी दिल्ली : गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जगाला वेठीस धरले आहे. भारतातदेखील कोरोनाचा हाहाकार अद्याप थांबलेला नाहीये. भारतातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा कहर अजूनही सुरुच आहे. भारतातच नव्हे तर जगभरात अनेकांच्या मृत्यूला कोरोना कारणीभूत ठरला आहे. त्याला आळा घालण्यासाठी  लागू करण्यात आलेला लॉकडाऊनदेखील आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्ववत होण्यास आता सुरवात झाली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवरच दिल्लीमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे (AIIMS) संचालक रणदीप गुलेरिया यांनी कोरोना प्रादुर्भाव आणि प्रदुषण यासंदर्भात एक महत्वपूर्ण असा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, जर वायू प्रदुषणात वाढ झाली तर कोरोना प्रादुर्भावात देखील वाढ होऊ शकते. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा प्रदुषणाची वाढती पातळी चिंताजनक ठरली असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

हेही वाचा - Corona Updates: दिलासादायक! देशात 60 लाखांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त

एम्सचे डायरेक्टर असलेले डॉ.  रणदीप गुलेरिया यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात वाढत्या प्रदुषणाबाबत चिंता व्यक्त केलीय. तसेच दिल्लीकरांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. वायू प्रदुषण जितके वाढेल, तितक्याच प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होईल, असा इशारा त्यांनी दिला. कारण हवेतील प्रदुषण हे कोरोना व्हायरसला अधिक शक्तीशाली बनवणारे ठरेल. व्हायरस अधिक काळ ऍक्टीव्ह राहू लागला तर त्याचा माणसांवर असलेला  परिणामदेखील त्याच प्रकारे वाढेल, असं संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे लोक ज्यावेळेला श्वास घेतात तेंव्हा त्यांच्या श्वसनाद्वारे प्रदुषित घटकांसोबतच व्हायरस जाण्याचीही शक्यता असल्याचे ते म्हणाले. 

हेही वाचा - Bihar Election : असाही एक चहावाला; हटके पद्धतीने मतदानाविषयी करतोय जागृती

कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतुक पूर्णत: बंद होती. सर्वप्रकारचे उद्योग-धंदे बंद होते. त्यामुळे देशातील प्रदुषणाचा स्तर अत्यंत कमी होता. प्रदुषण इतके कमी झाले होते की जंगलातले प्राणी रस्त्यांवर फिरतानाचे फोटोही समोर आले होते. मात्र आता अनलॉक सुरु होत असल्याने पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. आणि त्याचमुळे प्रदुषणाची समस्या आपल्या पुर्ववत मार्गावर येत असल्याचे दिसून येत  आहे. असं असलं तरी कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र कमी झालेला नाहीये. उलट तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर प्रदुषणातील वाढ ही मोठ्या समस्यांना जन्म देणारी ठरू शकते. 

हेही वाचा - तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच! भारत बायोटेककडून माहिती गोळा करणे सुरु

या साऱ्या पार्श्वभूमीवर गुलेरिया यांनी ज्या लोकांना आधीपासूनच श्वसनाचे आजार आहेत, त्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच इटली आणि चीनमधील काही बातम्यांचा आधार घेत त्यांनी सांगितलंय की, ज्या ठिकाणी QI 2.5 पेक्षा अधिक आहे तेथे कोरोनारुग्णांची संख्या ही 8 ते 9 टक्क्यांनी वाढल्याची बाब समोर आली आहे, असंही त्यांनी सांगितलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aiims director Randeep Guleria says increases in air pollution lead to increase in corona cases