esakal | ढिंग एक्सप्रेस बनली DSP, एक स्वप्न पूर्ण; हिमाचा संघर्षमय प्रवास 

बोलून बातमी शोधा

Hima Das}

एक दिवस वडिलांसोबत शेतात फुटबॉल खेळताना गावातच राहणाऱ्या प्रशिक्षकाने तिचा वेग हेरला. त्यांनीच तिला ॲथलेटिक्समध्ये जाण्याचा सल्ला दिला. तिच्या पुढच्या करिअरला मार्गदर्शक मिळाला पण एक अडचण होती.

ढिंग एक्सप्रेस बनली DSP, एक स्वप्न पूर्ण; हिमाचा संघर्षमय प्रवास 
sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - भारताची स्टार धावपटू, ढिंग एक्स्प्रेस अशी ओळख असलेल्या हिमा दासची पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उफस्थितीत ही नियुक्ती झाली. यानंतर हिमाने भावना व्यक्त करताना म्हटलं की, लहान असल्यापासूनच मी पोलिस होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. दुर्गा पूजेच्यावेळी मी आईकडे बंदूक घेऊन देण्याचा हट्ट करत असे. तिचंही स्वप्न होतं की मी पोलिस व्हावं. आता आसामला हरियाणासारखंच क्रीडा क्षेत्रात ताकदवान बनवण्याचं ध्येय असल्याचंही हिमा म्हणाली.

वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी हिमा दास डीएसपी बनली. वर्दीतले फोटो शेअर करताना हा खूप अभिमानाचा क्षण आहे असं हिमाने सोशल मीडियावर म्हटलं. तसंच यापुढेही अॅथलेटिक्समध्ये करिअर करणार असल्याचंही तिने सांगितलं. एका शेतकऱ्याची मुलगी, लहानपण खेड्यात गेलेल्या हिमाचा या पदापर्यंतचा प्रवास संघर्षाने भरलेला होता. 18 व्या वर्षी तिने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत 51.46 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावलं होत. त्यांनतर पुढच्याच वर्षी तिने युरोपियन स्पर्धेत 19 दिवसांत सलग सहा सुवर्णपदकांची कमाई केली होती. त्याआधी एक वेळ अशी होती की पायात घालायला बूट नव्हते. अनवाणी पायांनी हिमा शेतातून धावायची. आज तिच्याच नावाने शूज ब्रँड आहे.

हे वाचा - Viral Video: नातीला शिकवण्यासाठी घर विकणाऱ्या आजोबांची गोष्ट; मदतीला आले हजारो हात

आसाममधील ढिंग या लहानशा गावातून आलेल्या हिमा दासने जागतिक स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत मोठं यश मिळवलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि खडतर काळ तिने अनुभवला.  खेडेगावातून आलेल्या हिमाने स्वप्नांची शिखरे वेगाने पादाक्रांत केली. तिची आसाममध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. इथपर्यंतचा तिचा प्रवास हा एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी असाच आहे.

चांगले बूट घ्यायला पैसे नव्हते
हिमा तिच्या भावंडांमध्ये सर्वात लहान. हिमा दासने खूप उशिरा धावण्याच्या शर्यतीत पाऊल टाकले. धावपटू म्हणून नावलौकिक मिळवणारी हिमा सुरुवातीला वडिलांबरोबर शेतात फुटबॉल खेळत होती. एक दिवस वडिलांसोबत शेतात फुटबॉल खेळताना गावातच राहणाऱ्या प्रशिक्षकाने तिचा वेग हेरला. त्यांनीच तिला ॲथलेटिक्समध्ये जाण्याचा सल्ला दिला. तिच्या पुढच्या करिअरला मार्गदर्शक मिळाला पण एक अडचण होती.  चांगले बुट घेण्यासाठी हिमाकडे पैसे नव्हते. तेव्हा स्वस्तात मिळणारे बुट घालून तिने आंतरजिल्हा स्पर्धेत 100 आणि 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशामुळे तिचे प्रशिक्षक निपुन दास यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. पुढे निपुन दास हिमाला घेऊन गुवाहटी येथे घेऊन आले. तिथे तिला महागडे आणि चांगले बुट घालायला मिळाले. त्यानंतर हिमाने जो वेग वाढवला तो कमी केलाच नाही. 

हे वाचा - भारतात पुन्हा वेगानं का वाढतोय कोरोनाचा संसर्ग? जाणून घ्या यामागील पाच प्रमुख कारणं

प्रशिक्षकांनी ओळखली प्रतिभा
आसाममधील नौगाव जिल्ह्यातील गावात एका शेतकरी कुटुंबात हिमाचा जन्म झाला. तिचे वडील रंजीत दास यांच्याकडे दोन एकर जमिन आहे. त्यावर सहाजणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवायचे. अशा परिस्थितीत तिला स्पर्धेसाठी चांगले बुट घेऊन देणं त्यांना शक्य नव्हतं. तिला पुढच्या तयारीसाठी गुवाहाटीला पाठवण्याबाबत प्रशिक्षकांनी वडिलांना विचारले होते. तेव्हा त्यांनी नकार दिला होता. पण प्रशिक्षकांनी हिमा काय कमाल शकते हे ओळखले होते. तिच्या वडिलांना प्रशिक्षकांनी पटवून दिले की ती नक्की इतिहास घडवेल. त्यानंतर शेतात फुटबॉल खेळणाऱ्या हिमाने जी भरारी घेतली ते हिमालयाचीच उंची गाठायची या इराद्यानेच.

जागतिक अॅथलेटिक्समध्ये इतिहास
हिमाने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले तेव्हाचा निकाल हा धक्का देणारा होता. सुरुवातीच्या ३५ सेकंदात ती पहिल्या तीनमध्येही नव्हती. त्यांनतर तिने असा काही गिअर टाकला की सर्वांनाच मागे टाकले आणि सुवर्णपदकावर नाव कोरले. विजयानंतर देशाचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले तेव्हा हिमाला अश्रू रोखता आले नव्हते.

अशी कामगिरी करणारी पहिलीच
वर्ल्ड ज्युनिअर ॲथलेटिक्समध्ये भारताला तीनच पदके मिळवता आली होती. यामध्ये धावपटू म्हणून सुवर्णपदक मिळवणारी पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये ती एकमेव आहे. फ्लाइंग सिख मिल्खा सिंग आणि सुवर्णकन्या पी.टी. उषा यांनाही अशी कामगिरी करता आली नव्हती.

श्रीलंकेचा चीनच्या कोरोना लशीवर नाही विश्वास, भारतीय लशीला दिली पसंती

आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकली
आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमा दासने 400 मीटर शर्यत 50.79 सेकंदात पूर्ण रौप्य पदक पटकावलं होतं. रिलेमध्ये ती ज्या टीममध्ये होती त्या टीमने सुवर्णपदक पटकावलं होतं. 

पूरग्रस्तांना केली होती मदत
एका गरीब कुटुंबातून आलेल्या हिमाला लोकांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं याची जाणीव आहे. दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये आसामला पुराचा तडाखा बसला होता. तेव्हा हिमा दासने तिला महिन्याला मिळणाऱ्या वेतनातील अर्धी रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली होती. तेव्हा तिचं खूप कौतुकही झालं होतं.