केंद्र सरकारने आडमुठेपणा सोडावा आणि माघार घ्यावी : मायावती

वृत्तसंस्था
Sunday, 22 December 2019

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान भारतीय रेल्वेच्या मालमत्तेचे देशभरात एकूण 88 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

लखनौ : सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) याबाबतची आडमुठेपणाची भूमिका केंद्र सरकारने सोडून या दोन्ही बाबतीत माघार घ्यावी, असे आवाहन बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या विरोधात राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधूनच विरोधाचे सूर येत असल्याने आणि जनभावनाही प्रखर होत असल्याने सरकारने आपले निर्णय मागे घ्यावेत, असे मायावती यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे. आंदोलनकर्त्यांनी शांततापूर्ण मार्गाने आपले म्हणणे मांडावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

- CAA : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 'भीम आर्मी' प्रमुख अटकेत!

ममतांच्या तोंडी पाकची भाषा : घोष 

कोलकता : नागरिकत्व कायद्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली सार्वमत घेण्याची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आज केली. पाकिस्तानदेखील वारंवार संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची मागणी करत असतो. ममतादेखील असेच करत असल्याचे घोष यांनी म्हटले आहे. ममता यांना सरकारमध्ये राहण्याचा काहीही अधिकार नसून, त्यांचा न्यायव्यवस्था आणि संसदेवर विश्‍वास नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांचे सरकार हटवावे, अशी मागणीही घोष यांनी केली आहे. 

- ...म्हणून भाजप घेणार आता 250 पत्रकार परिषदा!

कायदा मुस्लिमविरोधी नाही : हुसेन 

देशातील विरोधी पक्ष अकारण नागरिकत्व कायद्याला विरोध करत असून, हा कायदा कोणत्याही प्रकारे मुस्लिमविरोधी नाही, असा दावा भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी आज केला. या कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व जाणार नसल्याचे विरोधी पक्षांना माहीत असतानाही ते चुकीची माहिती देत आंदोलन करत आहेत, असा आरोप हुसेन यांनी केला. तसेच, कॉंग्रेस पक्ष जनतेला शांततेचे आवाहन करण्याऐवजी 'हा कायदा गरिबांच्याविरोधात आहे' अशी चुकीची माहिती सांगत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

- शेतकऱ्यांनो सावधान, सरकारने दिलेले पैसे घेतले जाताहेत परत!

रेल्वेचे 88 कोटींचे नुकसान 

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान भारतीय रेल्वेच्या मालमत्तेचे देशभरात एकूण 88 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पूर्व विभागात 72 कोटी, दक्षिण-पूर्व विभागात 13 कोटी, तर ईशान्य विभागात तीन कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSP leader Mayawati criticized central government about CAA and NRC