केंद्र सरकारच्या संकेतस्थळाची नक्कल करून व्यावसायिकांची लूट, तुम्हीही अशा संकेतस्थळावर नोंदणी करत नाही ना?

central government original website copy making fraud with traders
central government original website copy making fraud with traders

नागपूर : नवउद्योजक, उद्योजक, व्यावसायिकांच्या उत्पादनाला ऑनलाइन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने संकेतस्थळ सुरू केले. या संकेतस्थळाची हुबेहूब नक्कल करून त्यावरून लूट सुरू असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. आत्तापर्यंत अनेकांची फसवणूक करून या संकेतस्थळाने कोट्यवधी रुपये नोंदणीशुल्क वसूल केल्याचे समोर आले आहे. 

केंद्र सरकारने उत्पादने विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी https://gem.gov.in/ हे संकेतस्थळ सुरू केले. यावर विविध कंपन्यांचे संगणक, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांसह नवउद्योजक, व्यावसायिकांना उत्पादनाची येथे नोंदणी करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या या संकेतस्थळावर नोंदणी निःशुल्क आहे. देशभरातील उद्योजक, व्यावसायिक यावर नोंदणी करीत असून आत्तापर्यंत ८ लाख ६९ हजार ९७९ विक्रेते व सेवापुरवठादारांनी सरकारच्या संकेतस्थळावर नोंदणी केली. या संकेतस्थळावर १७ लाख ११ हजार ७५ उत्पादनांची नोंद झाली आहे. दररोज यावर उद्योजक, व्यावसायिक नोंद करताना दिसून येते. परंतु, या संकेतस्थळाची हुबेहूब कॉपी असलेले संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे. https://www.gemregistrationgov.in/index.php हे हुबेहुब नक्कल केलेले संकेतस्थळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या संकेतस्थळाप्रमाणेच लोगो तसेच केंद्राच्या संकेतस्थळाच्या नावातील gem असे लिहिलेले असल्याने अनेकजण हे संकेतस्थळ केंद्र सरकारचेच असल्याचे समजून त्यावर नोंदणीसाठी पुढाकार घेतात. परंतु, नोंदणीसाठी संकेतस्थळावर पैशाचे  'ऑप्शन' आल्यानंतर जाणकारांची फसगत टळते. परंतु, केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर निःशुल्क नोंदणी शक्य असल्याचे ज्यांना माहीत नाही, ते बनावट संकेतस्थळाच्या लुटीला बळी पडत आहेत.

या बनावट संकेतस्थळावर व्यवसाय, उत्पादन, विक्रेत्याचे नाव, त्यांचे बँक खाते, शहराचा पत्ता, पॅनकार्ड तसेच आधारकार्ड क्रमांक टाकल्यानंतर केल्यानंतर 'प्रोसिड अ‌ॅन्ड पे' ऑप्शन येते. त्यामुळे केंद्र सरकारचे संकेतस्थळ निःशुल्क असल्याची माहिती असलेले सावध होत आहेत, तर या माहितीपासून अनभिज्ञ असलेले विक्रेते, व्यावसायिक, उद्योजक या लुटीला बळी पडत आहे. नागपुरातील तरुण व्यावसायिक 'सर्व्ह अ‌ॅड्स'चे संचालक लोकेश शाहू यांना या बनावट संकेतस्थळाचा अनुभव आला. केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर नोंदणी निःशुल्क असल्याची माहिती असल्याने त्याची फसगत टळली. सरकारच्या संकेतस्थळावरून पैसे भरायचे असल्यास ते थेट भरता येते. परंतु, या संकेतस्थळावर 'थर्ड पार्टी इन्स्टा मोझो'द्वारे शुल्क भरण्यास सांगितले. सरकारी यंत्रणा असे 'थर्ड पार्टी'द्वारे शुल्क भरण्यास सांगत नाही, असे लोकेश शाहू म्हणाले. 

८३ कोटी घशात - 

केंद्र सरकारच्या संकेतस्थळाची हुबेहूब कॉपी असलेल्या https://www.gemregistrationgov.in/index.php या संकेतस्थळावर ४ लाख १८ हजार ८८० जणांनी नोंदणी केली आहे. एका जणाकडून किमान दोन हजार रुपये नोंदणी शुल्क घेतले जात असल्याचे समजते. त्यामुळे या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाने आत्तापर्यंत ८३ कोटी रुपये नोंदणीतून वसूल केले. 

केंद्र सरकारकडून सावधानतेचे आवाहन -

https://gem.gov.in/ या संकेतस्थळाची नक्कल करून काहींनी बनावट संकेतस्थळ सुरू करून नोंदणी शुल्काच्या नावावर पैसे उकळत असल्याचे केंद्र सरकारच्याही लक्षात आल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने याच संकेतस्थळावरून बनावट तसेच फसवणूक करणाऱ्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन केले असून gem कुठलेही नोंदणी शुल्क घेत नसल्याचेही स्पष्ट केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com