दिल्लीत गोंधळ कायम; दोन संघटनांची माघार

नवी दिल्ली - हिंसाचारानंतर लाल किल्ला परिसरातील बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
नवी दिल्ली - हिंसाचारानंतर लाल किल्ला परिसरातील बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

नवी दिल्ली - प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील गोंधळ सुरूच होता. राष्ट्रीय किसान मजदूर संघटना आणि भारतीय किसान युनियन या दोन संघटनांनी या आंदोलनातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या हिंसाचारामुळे १ फेब्रुवारी रोजी संसद भवनावर काढण्यात येणारा मोर्चाही रद्द करण्यात आला. शेतकरी आंदोलनास बदनाम करण्यासाठीच हे कारस्थान रचण्यात आले होते, असा आरोप किसान संघर्ष समन्वय समितीने केला आहे.

दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेत या हिंसाचाराचे खापर आंदोलकांवर फोडले आहे. शेतकरी नेत्यांनी आमचा विश्‍वासघात केला. ठरलेल्या वेळेच्या आधीच त्यांनी ट्रॅक्टर मार्च काढल्याने हा संघर्ष झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आज ३७ शेतकरी नेत्यांविरोधात एफआयआर दाखल केले असून दोनशेजणांना अटक केली आहे. या आंदोलनानंतर देखील केंद्र सरकारने चर्चेची भूमिका कायम ठेवली आहे. आंदोलनानंतर सावध झालेल्या  सरकारने राजधानी क्षेत्रातील बंदोबस्तात आणखी वाढ केली असून पोलिसांबरोबर निमलष्करी दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

शेतकरी नेते व्ही.एम. सिंग हिंसाचारावर नाराजी व्यक्त करताना म्हणाले की, ‘‘ राजधानातील हिंसाचाराची जबाबदारी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी घ्यायला हवी. ज्या व्यक्तीची दिशाच वेगळी आहे अशासोबत आम्हाला पुढील वाटचाल करता येणार नाही.’’  भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भानुप्रताप सिंह म्हणाले की, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारामुळे मला मोठा धक्का बसला आहे. कालच्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेते राकेश टिकैत व योगेंद्र यादव यांच्यासह सरकारशी चर्चेत सहभागी असलेल्या अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यातील काही गुन्हे दरोडा घालण्याच्या कलमाखाली दाखल केले गेले आहेत. 

दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी पंतप्रधान मोदींनी तातडीने गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा. गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे हे आंदोलन भडकले. समाजकंटकांना जाणीवपूर्वक लाल किल्ल्यात प्रवेश देण्यात आला होता.
- रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते काँग्रेस

आंदोलन सुरूच राहणार
शेतकरी संघर्ष समन्वय समितीने कालच्या हिंसाचाराबद्दल आज बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. दिल्लीच्या सीमांवरील शांततापूर्ण आंदोलन कृषी कायदे रद्द होईपर्यंत चालू राहील असे जाहीर करण्यात आले. बलवीरसिंग राजेवाल, दर्शन पाल आदी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात केंद्र सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राकेश टिकैत यांनी,  दिल्लीतील हिंसाचारास सरकारच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. संघर्ष समितीच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘ दिल्लीच्या सीमांवर गेले  २ महिने चाललेल्या शांततापूर्ण आंदोलनामुळे हे सरकार मुळापासून हादरले आहे. त्यामुळे या शांततापूर्ण ट्रॅक्‍टर रॅलीच्या विरुद्ध एक घाणेरडे कारस्थान रचण्यात आले.

आंदोलन सुरू झाल्यावर १५ दिवसांनी ज्यांनी आपापले गट दिल्लीच्या सीमांवर आणले अशा दीप सिद्धू व इतरांशी समन्वय समितीचा व शेतकरी आंदोलनाचा काहीही संबंध नाही. २६ जानेवारीची ट्रॅक्‍टर रॅली उधळण्यासाठी रचलेल्या कारस्थानात सिद्धू व काही समाजकंटकांसह काही संघटनाही सहभागी होत्या. हेच लोक निर्धारित वेळेआधी २ तास आपापले ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत घुसले व हिंसा पसरवीत पुढे निघाले होते. हिंसाचाराबद्दल दोषी असलेल्यांविरूध्द कठोर कारवाई करावी.’’

दिवसभरात

  • अभय चौतालांनी आमदारकी सोडली
  • राकेश टिकैतांवर नियमभंगाचा ठपका
  • लाल किल्ल्यावर आता ड्रोनची नजर
  • हरियानात हजारो शेतकऱ्यांवर एफआयआर
  • आंदोलकांनी शस्त्रे पळविली - पोलिस
  • साडेपाचशेपेक्षा अधिक ट्विटर अकाऊंट बंद
  • दगडफेकीमध्ये तीनशे पोलिस जखमी
  • अभिनेता दीप सिद्धू यंत्रणेच्या रडारवर

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com