'मोदी आहेत म्हणूनच हे शक्‍य'; दिल्ली कोर्टातील राड्यात घुसले राजकारण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

राजधानीत पोलिसांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घटना देश स्वतंत्र झाल्यापासून प्रथमच घडत आहे. हा भाजपचा "नवा भारत' आहे का? भाजप देशाला आणखी कोठे घेऊन जाणार आहे?'' अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

नवी दिल्ली : दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात वकील व पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षावरून राजकीय आखाड्यातही आरोप-प्रत्यारोपांचे डाव टाकण्यास सुरवात झाली आहे. ""राष्ट्रीय राजधानीत पोलिसांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घटना देश स्वतंत्र झाल्यापासून प्रथमच घडत आहे. हा भाजपचा "नवा भारत' आहे का? भाजप देशाला आणखी कोठे घेऊन जाणार आहे?'' अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. गृहमंत्री अमित शहा कुठे बेपत्ता आहेत. मोदी आहेत म्हणूनच हे सर्व शक्‍य आहे, असा टोला त्यांनी एका ट्विटमध्ये लगावला आहे.

प्रदूषणाच्या विळख्यात राजधानी दिल्ली

काँग्रेसची टीका
काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री आरपीएन सिंह म्हणाले की, ज्यांच्यावर दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, तेच आंदोलन करीत आहेत. हा कोणता कायदा आहे. गृहमंत्रालय आणि गृहमंत्री कोठे आहेत? भाजपच्या राज्यात राज्यांपासून राजधानीपर्यंत कोठेही कायद्याचे राज्य नाही. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी आंदोलन करणाऱ्या पोलिसांना पाठिंबा दिला. "पोलिसांच्या कामात अपेक्षेला वाव नसतो. त्यांचे काम कायमच दुर्लक्षित राहते, असे ट्‌विट त्यांनी केले होते. मात्र, काही वेळाने त्यांनी हे ट्‌विट काढून टाकले. एका स्वतंत्र ट्‌विटमध्ये रिजीजू यांनी, "कोणीही कायदा हातात घेऊ नये, तर कायद्यानुसार गोष्टी घडू द्या,' अशी विनंती केली आहे. वरिष्ठ पोलिस (आयपीएस) अधिकारी अस्लम खान यांनी तीस हजारी न्यायालयात शनिवारी (ता. 2) वकिलांकडून पोलिसांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला असून, यावर कोणाचे काही मत आहे का, असा प्रश्‍न केला आहे. "ही वादाची एक ठिणगी आहे, ज्याचा मला अंदाज होता. कारण, कोणाचाही पाठिंबा आणि नेतृत्व नाही म्हणून शेवटी पोलिस किती सहन करणार,' अशी विचारणा त्यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री; भाजपच्या कोअर कमिटीत ठरलं

काय घडली होती घटना?
दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात पार्किंगमध्ये गाडी लावण्यावरून पोलिस आणि वकील यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसण हाणामारीत झाले. त्यावरून पहिल्यांदा वकिलांनी तर, आता पोलिसांनी काम बंद आंदोलन छेडले आहे. हाणामारीची घडना कशी घडली? याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यात चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केल्यानंतर त्यांना हटविणाऱ्या पोलिसांना वकिलांनी मारहाण केली होती. तेथून या वादाला सुरुवात झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi police vs lawyers congress blames pm narendra modi and amit shah