धुडगूस घालणाऱ्यांना का रोखले नाही? : राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाच्या नावाखाली दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराच्या निमित्ताने राहुल गांधींनी सरकारवर हल्ला चढविताना, असून लालकिल्यावर धुडगूस घालणाऱ्यांना न रोखण्यामागे गृहमंत्रालयाचा नेमका उद्देश काय होता, अशी खोचक विचारणा केली. हे कायदे शेतकऱ्यांसाठी हानिकारक असून आंदोलन शहरातून गावांपर्यंत पोहोचविले जाईल, अशीही घोषणा त्यांनी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वादग्रस्त कृषी कायदे आणि दिल्लीतील हिंसक घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती अभिभाषणावर बहिष्कार घालून असंतोषही व्यक्त केला असून सरकारला जाब विचारण्याची संयुक्त रणनीतीही ठरविली आहे. त्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर तोफ डागली.  कृषी कायदे बाजार व्यवस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व मिटवणारे आहेत. यामुळे देशातील तीन चार उद्योगपती हवे तेवढे धान्य साठवून ठेवू शकतील, त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसेल. एवढेच नव्हे तर हे कायदे शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागण्याची मुभा नाही आणि मोदी सरकार शेतकऱ्यांना मारायला निघाले आहे, असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले. या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले असून शेतकऱ्यांवर हल्ले करून मोदी सरकार संपूर्ण देशालाच दुबळे बनवायला निघाले आहे. पंतप्रधान पाच उद्योगपतींसाठी काम करणारे असून त्यांच्यासाठी नोटाबंदी आणि जीएसटीचे निर्णय झाले. त्यांच्यासाठीच कृषी कायदेही आणले आहेत. पण शेतकऱ्यांनी माघार घेण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत केली जाईल. आंदोलन संपले या भ्रमात पंतप्रधान मोदींनी राहू नये आंदोलन शहरांमधून गावांपर्यंत जाईल, असा इशाराही गांधींनी दिला.

पंतप्रधानांकडून देशाचे नुकसान
लाल किल्ल्यात झालेल्या प्रकाराबद्दल गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करताना राहुल गांधी म्हणाले, की ५० शेतकऱ्यांना लाल किल्ल्यात कोणी जाऊ दिले. त्यांना रोखण्याचे गृहखात्याचे काम नाही काय, यामागची नेमकी कल्पना काय होती हे गृहमंत्र्यांनी सांगावे. तत्पूर्वी, राहुल यांनी ट्विटद्वारेही पंतप्रधानांवर शरसंधान केले. शेतकरी, मजुरांवर वार करून मोदी भारताचे नुकसान करत आहेत. याचा फायदा फक्त देशविरोधी शक्तींना होईल. वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला रसातळाला कसे न्यावे हे मोदी सरकारकडून शिकावे, असा चिमटाही त्यांनी ट्विटद्वारे काढला.

आता स्थानिक विरुद्ध आंदोलक
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये आता स्थानिकांचा आंदोलकांशी संघर्ष सुरू झाला आहे. सिंघू सीमेवरील अडथळे ओलांडून अनेक स्थानिक  नागरिक आज प्रदर्शनस्थळी पोहोचले होते. त्यांनी  आंदोलकांना तेथून निघून जाण्यास बजावताना घोषणाही दिल्या. काही नागरिकांनी गद्दार गद्दार अशा घोषणा देत सिंघू सीमा भाग शेतकऱ्यांना रिकामा करण्यास बजावले. काहींनी शेतकऱ्यांच्या तंबूंमध्ये जाऊन ते उखडून टाकले तर काहींनी वॉशिंग मशीनचीही नासधूस केली. येथील तेगबहादूर स्मारकावरील शेतकरी संघटनांचे झेंडे काढून तेथे राष्ट्रध्वज लावण्यात आले. यावेळी येथे दगडफेकही झाली. यामुळे आंदोलकांपैकी काहींना संताप अनावर झाला. त्यातील एका युवकाने तलवारीने प्रतिहल्ला चढविला त्यात अलीपूरच्या पोलिस ठाणे प्रमुखांसह दोन पोलिस जखमी झाले. पोलिसांनी स्थानिक जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला.

घराघरातून एकाने यावे - योगेंद्र यादव
शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने गेल्या ७२ तासांत अनेक प्रयत्न केले त्याचा आम्ही निषेध करतो असे आंदोलकांचे नेते योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. या कारस्थानाला जोरदार उत्तर म्हणून व पुढच्या ७२ तासांत हे कारस्थान अयशस्वी करण्यासाठी देशाच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातून  एकाने दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनस्थळी येऊन आंदोलन मजबूत करावे असे जाहीर आवाहन त्यांनी केले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com