सनकी पतीने पत्नीसह तीन मुले आणि 2 मुलींवर केला कुऱ्हाडीने हल्ला; 4 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

दोन मुले आणि एका मुलीचा घटनास्थळी मृत्यू झाला. उपचारासाठी नेत असताना वाटेतच एका मुलाचा मृत्यू झाला. 

पाटणा- बिहारमधील सिवान येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. सिवान जिल्ह्यातील बलहा गावात एका माथेफिरु पतीने आपल्या मुलामुलींसह सहा जणांवर केलेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याने आपली पत्नी, तीन मुले आणि दोन मुलींवर कुऱ्हाडीने सपासप वार केला होता. यातील पत्नी आणि एक मुलगी गंभीर जखमी असून उपचारासाठी त्यांना पाटणा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये तीन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. दोन मुले आणि एका मुलीचा घटनास्थळी मृत्यू झाला. उपचारासाठी नेत असताना वाटेतच एका मुलाचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतर आरोपी पतीने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे आजूबाजूच्या गावातही खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा- 26/11 Mumbai Terror Attacks: भारताला मोठे यश, तहव्वूर राणाचे होणार प्रत्यार्पण

या विक्षिप्त पतीने मुलगी ज्योतिकुमारी, मुलगा अभिषेक कुमार, मुकेश कुमार आणि भोला कुमार यांना ठार केले. तर एक मुलगी अंजली कुमारी आणि पत्नी रिता देवी हे गंभीर जखमी आहेत. आरोपी पतीने वेगळाच दावा केला आहे. आम्ही सर्वजण बाहेर जाऊन आलो. तेव्हा अचानक माझ्या शरीरात काहीतरी प्रवेश केल्यासारखे झाले. प्रवेश केलेल्याने मला कुऱ्हाड उचलण्यास सांगितले आणि कुटुंबातील सर्वांना मारण्यास सांगितले. मी कुऱ्हाड उचलली आणि सर्वांवर वार केला. 

हेही वाचा- 'व्याख्याच स्पष्ट नसलेला 'लव्ह जिहाद'वरील कायदा मानवी स्वातंत्र्याविरोधात'

संपूर्ण कुटुंबावर हल्ला केल्यानंतर आपण सिवानच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिस ठाण्यालाही फोन केला. पण कोणीच फोन उचलला नाही. नंतर गस्ती पथकाने माझ्या घरी येऊन मला अटक केली, असे आरोपी पतीने सांगितले. 

हेही वाचा- 'अन्नदाता धरणे देतोय आणि 'असत्य' टिव्हीवर भाषण'; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

तत्पूर्वी, एक दिवस आधी बिहारमधील नवादा जिल्ह्यात एका सेवानिवृत्त फौजदाराने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. प्राणचक गावातील विनोबा नगर टोला येथे ही घटना घडली होती. तिघांचे मृतदेह एका पलंगावर आढळून आले होते. तिघांनी आत्महत्या केल्याचे स्वरुप देण्याच प्रयत्न केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband murdered a daughter and three sons