VIDEO - हायपरलूपमधून पुढच्या फेरीत 'पुणेकर' करणार प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

अमेरिकेतील डेवलूप टेस्ट फॅसिलिटी येथे हायपरलूप पॉडमधून आज पहिल्या मानवी तुकडीने यशस्वी प्रवास केला असून व्हर्जिन हायपरलूपने आज इतिहास रचला.

नवी दिल्ली - अमेरिकेतील डेवलूप टेस्ट फॅसिलिटी येथे हायपरलूप पॉडमधून आज पहिल्या मानवी तुकडीने यशस्वी प्रवास केला असून व्हर्जिन हायपरलूपने आज इतिहास रचला. “गेली काही वर्षे व्हर्जिन हायपरलूपचा चमू आपले एकमेवाद्वितीय तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे,” असे व्हर्जिन समूहाचे संस्थापक सर रिचर्ड ब्रॅन्सन म्हणाले. कल्पकतेचा मंत्रच येणाऱ्या काही वर्षांमध्ये सगळीकडच्या लोकांचे राहणीमान, काम आणि प्रवासाचे स्वरूप बदलणार असल्याचे आजच्या यशस्वी चाचणीद्वारे आम्ही दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं.

सहसंस्थापक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोश गिगेल आणि प्रवासी अनुभवविषयक संचालक सारा लुचिअन हे प्रवासाच्या या नव्या साधनातून प्रवास करणारे जगातील पहिले प्रवासी ठरले. पुढल्या फेरीत आता व्हर्जिन हायपरलूपचे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तज्ज्ञ आणि पुण्याचे रहिवासी तनय मांजरेकर हे प्रवास करणार आहेत. “हायपरलूपवर काम करणे आणि यातून प्रथम प्रवास करणाऱ्यांपैकी एक असणे हे माझ्यासाठी स्वप्नच प्रत्यक्षात आल्यासारखे आहे,” असे व्हर्जिन हायपरलूपमधील पॉवर इलेक्ट्रॉनिर्स तज्ज्ञ तनय मांजरेकर म्हणाले. “भारत हे आव्हान स्वीकारून जगाच्या अनेक मैल पुढे जाण्याची आपल्यासमोर असलेली ही अपूर्व संधी ओळखेल आणि पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पाबाबतची प्रगती सुरू ठेवेल, अशी मला आशा आहे.”  
सुरुवातीच्या टप्प्यापासून आजच्या मानवी चाचणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया इंडस्ट्रीमान्य इंडिपेंडंट सेफ्टी असेसर (आयएसए) सर्टिफायर यांच्या देखरेखीखाली पार पडली. नवीन अनावरण करण्यात आलेले हे एक्सपी २ वाहन अत्यंत काटेकोर आणि व्यापक अशा सुरक्षितताविषयक प्रक्रियेतून तयार झाले असून व्यावसायिक हायपरलूप यंत्रणेमध्ये सुरक्षिततेविषयक काय खबरदारी घेतली जाईल, याचे दर्शन या वाहनातून घडते. अद्ययावत नियंत्रण यंत्रणेने हे वाहन युक्त असून असाधारण परिस्थिती निर्माण होत असल्यास तातडीने त्याचा अंदाज घेऊन त्यानुसार सुयोग्य अशी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा लगेचच कार्यान्वित होते.

जच्या यशस्वी प्रवासी चाचणीने आम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. प्रवाशाला निर्वात पोकळीत सुरक्षितरित्या पॉडमध्ये बसवण्याच्या व्हर्जिन हायपरलूपच्या क्षमतेबरोबरच सुरक्षिततेबाबत कंपनी किती विचारपूर्वक पावले उचलत आहे, ज्यावर स्वतंत्र तिसऱ्या पक्षानेही शिक्कामोर्तब केले आहे, हे आम्ही दाखवून दिले आहे असे व्हर्जिन हायपरलूपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे वॅल्डर म्हणाले.

हे वाचा - कोरोना लशीची घोषणा करणाऱ्या फायझर कंपनीवर ट्रम्प भडकले

प्रवाशांनी नव्याने अनावरण केलेल्या एक्सपी २ या वाहनातून आपला हा पहिला प्रवास केला. बियाका इंगल्स समूहाच्या आरेखनातून हे वाहन साकारले असून प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा यांचा विचार करून या वाहनाची रचना करण्यात आली आहे. व्यावसायिक स्वरुपात बनवण्यात येणारे वाहन आकाराने मोठे आणि २८ आसन क्षमतेचे असणार आहे; तर चाचणीसाठी वापरण्यात आलेले वाहन २ प्रवासी क्षमतेचे होते. हायपरलूप वाहनातून प्रवासी सुरक्षितरित्या प्रवास करू शकतात, हे दाखवून देणे हा याचा हेतू होता.

जगभरात या संदर्भात नियामक यंत्रणेच्या बाबत प्रगती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आजची ही घोषणा महत्त्वाची आहे. भारतात महाराष्ट्र सरकारने हायपरलूप प्रकल्प हा सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित केला असून मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पासाठी व्हर्जिन हायपरलूप-डीपी वर्ल्ड कन्सोर्शिअम यांना ओरिजिनल प्रोजेक्ट प्रपोनंट (ओपीपी) म्हणून मान्यता दिली आहे. पुणे-मुंबई हायपरलूप वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीसाठी ही लक्षणीय घोषणा असून सार्वजनिक वाहतुकीच्या अन्य पारंपरिक साधनांच्या बरोबरीने हायपरलूप तंत्रज्ञानालाही मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकन सरकारच्या वाहतूक मंत्रालयातील अपारंपरिक व उदयोन्मुख वाहतूक तंत्रज्ञान परिषदेने (एनईईटी) नियामक मार्गदर्शक दस्तावेज जारी केल्यानंतर व्हर्जिन हायपरलूप आता भारतात हायपरलूपसाठी नियामक चौकट तयार करण्यासंदर्भात भारताच्या केंद्रीय अधिकाऱ्यांसमवेत काम करण्यास उत्सुक आहे. 

हे वाचा - अमेरिकेच्या कोरोना लशीने दिलेय चांगली बातमी, पण भारताला कधी मिळणार?

“आजची चाचणी ही भारतात, कदाचित जगातील पहिलीच व्यावसायिक तत्त्वावर हायपरलूप सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. सध्याच्या द्रुतगती मार्गाला समांतर पद्धतीने पुण्याला मुंबईशी जोडले जाणार आहे,” असे व्हर्जिन हायपरलूपचे मध्य पूर्व व भारतासाठीचे व्यवस्थापकीय संचालक हर्ज धलिवाल यांनी सांगितले. “जगाला वाहतुकीच्या या नव्या पर्वात घेऊन जाण्याचे नेतृत्व करण्याची अपूर्व संधी भारताला आहे. या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रात खासगी पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक होणार असून १८ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या निर्मितीबरोबरच तब्बल ३६ अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या मूल्याचे सामाजिक व आर्थिक लाभ या प्रकल्पातून मिळणार आहेत.”

एकंदरीतच हायपरलूप सर्टिफिकेशन सेंटरमध्ये सुरू असलेली प्रगती आणि आज सुरक्षिततेबाबत जे ऐतिहासिक प्रात्यक्षिक झाले त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला गती आली असून जगभरात हायपरलूप यंत्रणेच्या प्रमाणीकरणाचा मार्ग त्यामुळे खुला होईल. अमेरिकेत या तंत्रज्ञानाची पहिली मानवी चाचणी होत असताना भारतासह अन्यत्र व्यावसायिक तत्त्वावर हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी ही महत्त्वाची पायरी आहे. “आपल्या स्पर्धकांऐवजी बाजारपेठेत जे बदल घडत असतात त्या बदलांशी स्पर्धा करण्यावर माझा अधिक विश्वास असून भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचे नेतृत्व करण्याची क्षमता व्हर्जिन हायपरलूपमध्ये आहे,” असे सिस्को सिस्टिम्सचे माजी कार्यकारी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जेसी२ व्हेंचर्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चेंबर्स म्हणाले. 

हे वाचा - #BoycottAmazon : नेटकरी संतापले; अॅमेझॉनवर हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्र, पायपुसण्या

“माझं घर असलेल्या वेस्ट व्हर्जिनिया या राज्यात स्थित असलेल्या हायपरलूप सर्टिफिकेशन सेंटरबाबत, तसेच जगभरात व्हर्जिन हायपरलूपच्या विविध प्रकल्पांबाबतच्या ताज्या घडामोडी पाहाता पारंपरिक रचना मोडून काढणारे हे तंत्रज्ञान भारतात व जगात अन्यत्र आणण्यासाठी विविध देशांशी भागिदाऱ्या करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत, असे म्हणता येईल. भारताकडून मला नेहमीच मोठ्या अपेक्षा असून यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून आजची ही घोषणा या देशातील प्रत्येक नागरिकासाठी किती महत्त्वाची आहे या जाणीवेने मी रोमांचित झालो आहे. कल्पकता, उद्यमशीलता आणि सर्वसमावेशकतेच्या नव्या पिढीला नवी स्वप्न पाहाण्यासाठी मदत करण्याच्या या प्रवासात व्हर्जिन हायपरलूपला मदत करण्यासाठी मी उत्सुक आहे असं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्राच्या पलिकडे देखील हा संपूर्ण उपखंड एकत्र जोडण्याची जबरदस्त क्षमता आहे. गेल्या महिन्यातच व्हर्जिन हायपरलूपने बीएलआर विमानतळापासून प्रस्तावित हायपरलूप कॉरिडॉरच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडसह भागिदारीची घोषणा केली. तांत्रिक, आर्थिक आणि मार्गिका व्यवहार्यतेवर भर देण्यात येणारा हा अभ्यास प्रत्येकी सहा महिन्यांच्या दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. १,०८० किलोमीटर प्रती तास इतक्या कमाल वेगासह हायपरलूप बीएलआर विमानतळापासून सिटी सेंटरपर्यंत प्रति तास हजारो प्रवाशांना अवघ्या १० मिनिटांत पोहोचवू शकते, असा प्राथमिक अंदाज आहे. व्हर्जिन हायपरलूपने डिसेंबर २०१९ मध्ये पंजाब सरकारच्या वाहतूक विभागाशीही सामंजस्य करार केला असून पंजाबसमवेतचे हे नाते अधिक बळकट होईल, अशी कंपनीला आशा आहे. उत्तर भारतात कंपनी सातत्याने संधींचा शोध घेत असून देशाच्या पश्चिम व दक्षिण भागातही कंपनीचे स्वतंत्रपणे काम सुरूच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hyperloop pod carries two humans through a tube