
चीनने गलवान खोरे, हॉट स्प्रिंग एरिया आणि गोगरा इथले सैन्य कमी केलंय. या तिनही भागात सुरुवातीच्या डिसएंगेजमेंटचं काम पूर्ण झालं आहे.
नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरु असलेला संघर्ष आता कमी होत आहे. सीमेवरील सैन्य चीन हळू हळू मागे घेत असल्याचं आता समोर येत आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने गलवान खोरे, हॉट स्प्रिंग एरिया आणि गोगरा इथले सैन्य कमी केलंय. या तिनही भागात सुरुवातीच्या डिसएंगेजमेंटचं काम पूर्ण झालं आहे. पेगोंग त्सोमध्येही चीन त्यांचे सैन्य मागे घेत आहे. सध्या भारताने यावर करडी नजर ठेवली आहे की चीन कधीपर्यंत आणि कशा प्रकारे मागे हटत आहे?
लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर 30 जूनला भारत आणि चीनचे लेफ्टनंट जनरल लेवलच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये गलवान व्हॅली, हॉट स्प्रिंग, पेंगोंग त्सो आणि गोगरामध्ये तणाव कमी करण्याबाबत करार झाला होता. याअंतर्गंत दोन्ही बाजुंनी दीड ते दोन किमी मागे हटण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गलवान आणि हॉट स्प्रिंगमधून चीनी सैन्य मागे हटल्याचे सॅटेलाइट इमेजमध्ये दिसलं आहे. या प्रक्रियेअंतर्गंत भारतीय सैन्यसुद्धा चर्चा पूर्ण होईपर्यंत पीपी14 वर पेट्रोलिंग अनिश्चित काळासाठी थांबवण्यास तयार झाले आहे. मात्र ड्रोनच्या माध्यमातून सर्व हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे.
हे वाचा - पाकिस्तानचा कुलभूषण जाधवप्रकरणी 'यूटर्न'; आता म्हणतो
भारत आणि चीन यांच्यात 15 जूनला गलवान खोऱ्यात सैनिक आमने सामने आले होते. यामध्ये दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान हुतात्मा झाला होते. तर चीनचे जवळपास 45 सैनिक मारले गेले. तसेच अनेक सैनिक गंभीर जखमी झाले होते. दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर सैन्य मागे घेण्यास आणि तणाव कमी व्हावा यासाठी पावले उचलण्याची तयारी दर्शवण्यात आली.
हे वाचा - कोरोनाचा चुकीचा रिपोर्ट देणाऱ्या पुण्यातील लॅबवर कारवाई
परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितलं की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चिनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. यामध्ये दोन्ही बाजुने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता राखणे आणि भारत चीन सीमा वाद चर्चेतून सोडवण्याबाबत सहमती दर्शवली होती.